राजकारण निवडणुकीपुरते असते. आता सर्वाना बरोबर घेऊन विकासासाठी काम करायचे आहे, त्यामुळे प्रकल्प मंजुरीत राजकारण नाही, या भूमिकेचा केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू यांनी पुनरुच्चार केला. मुंबईच्या मेट्रो प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन मंगळवारी नायडू आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. पंतप्रधान मोदी यांच्या सभाप्रसंगीच्या मुख्यमंत्री चव्हाण यांच्या मानापमान नाटय़ावर पडदा टाकण्याची संधी साधत नायडू यांनी ‘विकास मंत्रा’चा उच्चार केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची खबरदारी आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या असंतोषाचे सावट वेळीच दूर होऊन मेट्रोच्या भूमिपूजनाचा समारंभ विनाव्यत्यय पार पडला.  
अपमानास्पद वागणूक दिल्याने आणि सोलापूर येथील सभेत भाजप कार्यकर्त्यांनी भाषणात गोंधळ घातल्याने मुख्यमंत्र्यांनी नागपूर येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमावर बहिष्कार घातल्यानंतर केंद्र व राज्य सरकार संबंधांत काहीसा तणाव निर्माण झाला होता. या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या निमंत्रणावरूनच मेट्रो प्रकल्पाच्या भूमिपूजन समारंभास नायडू यांनी हजेरी लावल्याने, कार्यकर्त्यांनी संयम पाळावा अशा सक्त सूचना देण्यात आल्याने, सुरुवातीचे काही क्षण वगळता कार्यक्रम सुरळितच पार पडला. पुणे मेट्रो प्रकल्पाचा अभ्यास सुरु असून त्यालाही लवकरात लवकर मंजुरी दिली जाईल, अशी ग्वाही नायडू यांनी दिली. राज्य सरकारने केंद्राकडे पाठविलेल्या सर्व प्रकल्पांना त्वरेने मंजुरी दिली जाईल, त्यात कोणतेही राजकारण किंवा भेदभाव होणार नाही. केंद्र व राज्य सरकारने आणि सर्वच पक्षांनी एकत्रितपणे देशाच्या विकासासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे नायडू म्हणाले. मुंबईची मेट्रो अगदी ठाण्यापर्यंत जोडावी, मुंबईत रिंग रुट पध्दतीने मेट्रो जाळे असावे, त्यासाठी आवश्यक ते सर्व सहाय्य केंद्र सरकारकडून देण्यात येईल, अशी ग्वाही नायडू यांनी दिली.  
केंद्रात एका राजकीय पक्षाचे व राज्यात दुसऱ्या पक्षाचे सरकार अशी परिस्थिती असली तरी प्रत्येकाचा योग्य सन्मान राखला जाईल, याची काळजी सर्वानी घेतली पाहिजे, असे मत मांडून उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, पंतप्रधानांच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी हजर रहायला हवे. कोणाचाही अपमान होणार नाही, याची खबरदारी घेतली जावी आणि हीच भारतीय संस्कृती आहे. मुख्यमंत्री चव्हाण यांनीही नायडू यांचे सहकार्याबद्दल आभार मानले.

मानापमान नाटय़ावर वेंकय्या नायडूंकडून पडदा
नायडू यांच्या भाषणात गोंधळ घालण्यासाठी काँग्रेसचे काही कार्यकर्ते तयारीत होते. त्यांच्या हातात सोनिया गांधी व मुख्यमंत्री चव्हाण यांच्या प्रतिमांचे फलक होते.  कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच त्यांनी घोषणाबाजी सुरु केली होती. त्यामुळे नायडू यांचे भाषण सुरळीत होणार की त्यात अडथळे येणार, अशी शंका होती. पण काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांनी सूचना दिल्यावर आणि पोलिसांनी या कार्यकर्त्यांभोवती कडे करुन वेळ पडल्यास त्यांना बाहेर काढण्याची तयारी केल्यावर नायडू यांचे भाषण शांततेत पार पडले. कार्यक्रम झाल्यावर मात्र मुख्यमंत्र्यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी झाली.