17 February 2020

News Flash

व्हायरलची साथ: सामान्य ज्ञान की अज्ञानात सुख?

स्पर्धा परीक्षांच्या गाइडमधले संभाव्य प्रश्न वाटतात ना? पण तसलं काहीही नाही.

माहिती असणं, अपडेट राहणं ही स्मार्टपणाची लक्षणं आहेत. इंटरनेट आक्रमणानंतर तर एक्स्पर्ट होणं सोपं झालंय. पण हा माहितीचा सोस चांगला की आपण बरं, आपलं काम बरं ही नॅरो माइंडेड भूमिका उत्तम तुम्हीच ठरवा..
महेंद्र नागामुट्टू नावाचे सद्गृहस्थ काय करतात?
करणजीत कौर व्होरा हे कोणाचे मूळ नाव?
इकिलिलायू धौइनी कोण आहेत?

स्पर्धा परीक्षांच्या गाइडमधले संभाव्य प्रश्न वाटतात ना? पण तसलं काहीही नाही. दिल्ली बहौत दूर है हमें, आमची झेप ढेभळी पिंपळगाव बुद्रुकपर्यंत. मल्टीटास्किंग आणि ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ यातला फरक धुसर असतो. अगदी त्याच सिमेट्रीवर ज्ञान आणि माहिती परस्परसंबंधांचं झालंय राव. गुगलजींमुळे स्वयंघोषित ज्ञानऋषींची पैदास होऊ लागली आहे. प्लेन रँडम असते ती माहिती आणि व्यासंग, सखोल अभ्यासाला ज्ञान म्हणतात. आता मायक्रो स्पेशलायझेशन करण्यासाठी आपण फक्त माहितीवर फोकस करूया. टेक्नोसॅव्ही युगात, सकाळी डोळे उघडताक्षणी व्हॉट्सअप चेक करणे मस्ट आहे. रात्री आपण झोपल्यापासून सकाळी जागे होईपर्यंत जगात केवढी उलथापालथ घडलेली असते. त्यामुळे अपडेट आवश्यकच. डेस्कटॉप, लॅपटॉप, नोटबुक, किंडल, स्मार्टफोन, टॅब, पेनड्राइव्ह, हार्डडिस्क ही सगळी मंडळी दिमतीला असतातच. पण एवढं होऊनही काही माणसं बॅकवर्ड राहतात. आता आपापल्या वकुबाप्रमाणे मेंदूत कोंबावी ठासून माहिती होईल तेवढी पण लोकांचा इनिशिएटिव्ह कमी पडतो. रोममध्ये रोमन्स सारखं वागावं असं म्हणतात. पण रोमच ठाऊक नसेल तर अवघड होतं सगळं.

परवाची गोष्ट- लाँस एंजेलिसमध्ये ‘द नाइस गाय’ (येथे गायीचा उल्लेख पाळीव प्राणी संदर्भात नसून, एका तुपाशी गटाच्या स्टायलिश बारचे नाव आहे) हे उच्चभ्रूंचे गजाली रंगवण्याचे ठिकाण. या ठिकाणहून नोव्हाक जोकोव्हिच एका ललनेसह बाहेर पडत असल्याचे दृश्य पापराझ्झी पत्रकारांना दिसले. वर्ल्ड रँकिंगमध्ये टॉप आणि अकरा ग्रँड स्लॅम टायटल नावावर असणारा जोकोव्हिच कोणी सोम्या गोम्या नाही. त्यामुळे जोकोव्हिच बरोबरची ही तरुणी कोण यावर खल झाला. ‘लेगी ब्रुनेट’ आणि जोकोव्हिचची ‘फिमेल कम्पॅनिअन’ असे संबोधत ‘डेली मेल’ नामक वृत्तपत्राने फोटोसकट बातमी देऊन टाकली आणि कल्ला उडाला एकदम सोशल मीडियावर. काय म्हणून काय विचारता- जोकोव्हिचबरोबर होत्या आपल्या दीपिकाजी. प्रभादेवीत सिद्धिविनायकासमोर स्वकर्तृत्वाच्या बळावर मालकीची अपार्टमेंट घेणाऱ्या बॉलीवूड अभिनेत्री. भारतातल्या सेलेब्रेटी आणि युथ आयकॉन असणाऱ्या दीपिकाजींबद्दल माहिती नसल्याने नेटिझन्सनी ‘डेली मेल’चा उद्धार केला. भारताचं सोडा दीपिकाजी अमेरिकेतच ‘एक्सएक्सएक्स’ या हॉलीवूड व्हेंचरमध्ये काम करत आहेत. व्हिन डिसेलबरोबर त्यांचे फोटो त्या ट्विटर हँडलवर टाकतातही. आणि तरीही त्यांचा अनामिकासारखा यकश्चित उल्लेख.. दीपिकाजींच्या चाहत्यांनी तर बातमी देणाऱ्या पेपरचे वाभाडे काढले. सगळ्या देशांवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणाऱ्या तुम्हाला दीपिकाजी ठाऊक नाहीत. माहिती नसणं हाही गुन्हा नाही, पण बातमी छापण्यापूर्वी जोकोव्हिचबरोबरची व्यक्ती कोण याचा छडा लागला असता. पण एका प्रतिक्रियेने उल्टा सोचणारं कुणी आहे याचं आम्हाला बरं वाटलं. दीपिकाचे टपराट चित्रपट फक्त भारतीयच पाहू शकतात. त्यामुळे अमेरिकेत तिला कोणी न ओळखल्यास वावगं काहीच नाही. दीपिकाजींच्या बाजूने आणि डेली मेलच्या समर्थनार्थ अशा परस्परभिन्न प्रतिक्रियांनी आमचं पुष्कळ मनोरंजन झाले. तिकडे आयती प्रसिद्धी मिळाल्याने दीपिकाजी खूश झाल्या ते वेगळंच.

हा किस्सा ज्या अमेरिकेत घडला तिथे काही दिवसांपूर्वीच सौंदर्यवती मारिया शारापोव्हाजींनी उत्तेजके घेतल्याची कबुली दिली. मेलडोनियम (मेडिकल डिक्शनरी पाहून आम्ही बायहार्ट केलं हे नाव) हे औषध आणि पुढचं रामायण तुमच्यापर्यंत आलंच आहे. पण यानिमित्ताने शारापोव्हाजींचा एक किस्सा व्हॉट्सअॅपी धुमाकूळ घालू लागला. जोक असा- ‘शारापोव्हा उत्तेजकं घेते याची मला खात्री पटली ज्या दिवशी तिने सचिन तेंडुलकर कोण माहिती नाही सांगितलं’. २०१४ मध्ये प्रख्यात विम्बल्डन स्पर्धेत साक्षात सचिनने शारापोव्हाजींचा सामना पाहिला. मॅच झाल्यावर तिला सचिनबद्दल विचारण्यात आलं- ती म्हणाली मला माहिती नाही. सचिनभक्तांनी एकच कल्लोळ माजवला. ऑल टाइम ग्रेट स्पोर्ट्समन सचिनविषयी थोडी माहिती असती शारापोव्हाजींना तर उचित दिसलं असतं. पण आता क्रिकेट त्यांचा ‘कप ऑफ टी’ नाही, काय करणार?

याच आठवडय़ात रे टॉमलिन्सन गेले. ते गेल्यावर त्यांची महती कळली. आपल्या रुटिनचा इंटिग्रल पार्ट झालेल्या ई मेलचे ते जनक. सगळंच माहिती असण्याचा हट्ट कशाला, अज्ञानातही सुख असतं की. ‘सामान्य’ दर्जाच्या ज्ञानापेक्षा अज्ञान परवडलं..
(जिज्ञासूंनी टॉमलिन्सन यांना स्मरून सुरुवातीला मांडलेल्या तीन प्रश्नांची उत्तरं जरूर मेल करावीत. कोणतंही बक्षीस, गिफ्ट हॅम्पर, सोव्हेनियर मिळणार नाही. तेवढीच तुमची टॉमलिन्सन यांना श्रद्धांजली)

First Published on March 18, 2016 1:12 am

Web Title: general knowledge or ignorance pleasure
Next Stories
1 व्हायरलची साथ: प्रकाशझोतातला ‘स्पॉटलाइट’
2 व्हायरलची साथ: दुनिया ‘गोल’ हैं
3 ‘स्टार्टअप’ प्रवासाची जर्नी
Just Now!
X