आनंद करंदीकर

वुहानमधील संचारबंदी उठवली गेली, त्याला ८ एप्रिल रोजी वर्ष पूर्ण झाले. जुलैपर्यंत ५० कोटी लोकसंख्येचे लसीकरण करण्याचा चंग चीनने बांधला आहे आणि उदाहरणार्थ पाच दिवसांत १०.९ कोटी तपासण्या करण्यासारखी आव्हानेही पेलली आहेत. ‘द लॅन्सेट’ या आरोग्यविषयक संशोधनाला वाहिलेल्या जगातील मान्यवर नियतकालिकाने १० एप्रिल २०२१ च्या अंकातील संपादकीयात चीनचे यशापयश मांडले; त्यावर आधारित हे टिपण…

कोविड- १९ ची साथ प्रथम चीनच्या वुहान प्रांतात फैलावली. ३१ डिसेंबर रोजी ती जगाला कळेपर्यंत चीनचे काय चालले होते हे कुणाला माहीत नाही; परंतु ८ एप्रिल २०२१ रोजी,  चिनी सरकारने वुहान प्रांतातील टाळेबंदी उठवल्याला एक वर्ष पूर्ण झाले. म्हणजे, वुहानमधील टाळेबंदी उठवल्यानंतरही चीनमध्ये कोविड-१९ साथीचा मोठा फैलाव रोखण्यात चीन यशस्वी झाला आहे. अनेक ठिकाणी, बीजिंग आणि क्विन्डाओ ही शहरे धरून,  कोविड-१९ ची लागण झाली हे खरे. पण तिथेही साथीचा फैलाव वेळीच रोखण्यात चीनला यश आले. चीनमध्ये आर्थिक व्यवहार आणि सामाजिक अभिसरण पूर्ववत सुरू झाले आहे. परदेशातून नव्या, बदललेल्या स्वरूपातील विषाणूअवतार चीनमध्ये यायला अटकाव करण्यातही चीन, आत्तापर्यंत तरी, यशस्वी झाला आहे. चीनमध्ये कोविड-१९ चा फैलाव रोखण्यात चीनला यश कसे आले? एकूण जगातील जनतेला आणि शास्त्रज्ञांना या अनुभवातून काय शिकता येणे शक्य आहे?

चिनी रोग फैलाव नियंत्रण केंद्राच्या (सेंटर फॉर डिसीज कंट्रोल) सांगण्याप्रमाणे, चीनमध्ये रोग फैलाव नियंत्रणाचे जे तंत्र वापरण्यात आले त्यात पुढील सूत्रे होती : (१) कोविड-१९ ची लागण झालेले रुग्ण लवकरात लवकर शोधून काढणे. (२) कळलेल्या रुग्णांवर योग्य प्रकारे औषधोपचार करणे. (३) रुग्णाच्या सान्निध्यात आलेल्यांचे  विलगीकरण करणे आणि (४) धोक्याचा अंदाज घेऊन बंदी शिथिल करणे.

म्हणजे प्रत्येक संशयित रुग्णाची आणि त्याच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाची लवकरात लवकर तपासणी करणे यावर भर देण्यात आला. उदाहरणार्थ, क्वीनडाओमध्ये पहिले तीन कोविड-१९ चे रुग्ण आढळल्यानंतर सामूहिक तपासण्यांचा फार व्यापक आणि काटेकोर कार्यक्रम राबविण्यात आला. सरकारी यंत्रणा आणि नागरिक यांनी चांगले सहकार्य करून पाच दिवसांत जवळपास १,०९० लाख लोकांची, म्हणजे त्या प्रांतातील सर्वच्या सर्व रहिवासी आणि बाहेरून आलेल्यांची, कोविड-१९ तपासणी पूर्ण केली! त्यानंतर जरी कोविड-१९चे रुग्ण फारसे आढळले नसले तरीसुद्धा सर्वसामान्य नागरिक विनाऔषध-उपचार पाळायची पथ्ये, म्हणजे लोकांनी गर्दी न करणे, मुखपट्टी वापरणे हे कसोशीने पाळताना दिसतात. सरकारने जनतेला प्रवास टाळण्याचे आवाहन केले आणि जनतेनेही साथ दिली. चिनी नववर्ष दिनाच्या अगोदरच्या दोन आठवड्यांत प्रवासाला निघालेल्या लोकांमध्ये आदल्या वर्षीच्या तुलनेत ७० टक्के घट झाली!  सार्वजनिक आरोग्यासाठी चिनी सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी अंमलबजावणीत आणलेले नियम आणि सरकारवर विश्वास ठेवून जनतेने केलेले सहकार्य यांमुळेच चीनमधील कोविड-१९ फैलाव आटोक्यात राहिला आहे.

लोक कुठे जातात, कुठे प्रवास करतात, याचा मागोवा सातत्याने घेऊन लोकांच्या हालचाली नियंत्रित करणे हे चीनमध्ये शक्य झाले. व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या अनेक पाश्चिमात्य देशांना असे करणे रुचणारे नाही हेही खरेच. परंतु चीनला स्वदेशात कोविड-१९चे नियंत्रण करण्यात जे यश आले, त्यापासून इतर देशांनी सार्वजनिक आरोग्य सुरक्षिततेसाठी जे धडे घेता येतील ते घेतले पाहिजेत.

तरीही आंतरराष्ट्रीय पातळीवर चीनकडे बघण्याच्या दृष्टिकोनात संशयाचे प्रमाण खूप मोठे आहे. काही देशांत तर चीनविरोधी मानसिकता बळावली आहे. वैज्ञानिक माहितीबद्दल चीन गोपनीयता पाळतो किंवा कसे, हा प्रश्न शिल्लकच आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि चीन यांनी एकत्रित अभ्यास करून एक अहवाल प्रसिद्ध केला. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस घेब्रियेसस म्हणाले, ‘‘आंतरराष्ट्रीय शोध पथकाला प्राथमिक माहिती (रॉ डेटा) मिळायला अडचणी आल्या.  यापुढील एकत्रित अभ्यासात सगळी माहिती वेळेवर मिळेल अशी मी आशा करतो.’’

चीनमध्ये कोविड-१९ च्या विरोधात ज्या लसी निर्माण करण्यात आल्या, त्यांबाबतही माहितीच्या पारदर्शकतेचा प्रश्न आहे. २७ मार्च २०२१ पर्यंत चीनने देशात बनवलेल्या लसीने दहा कोटी लोकांचे लसीकरण केले आणि जुलै २०२१ पर्यंत ५० कोटी लोकांचे लसीकरण करण्याचा चीनचा निर्धार आहे. चीनमधल्या ‘सिनोफार्म’ या कंपनीने चीनमध्ये बनवलेल्या लसीला ३० डिसेंबर २०२० रोजी चीन सरकारने मान्यता दिली.  त्यानंतरच्या महिन्यांमध्ये आणखी काही लसींना सरकारने मान्यता दिली आहे. पण अजून तरी या लसींचे परिणाम सांगणारे शास्त्रीय शोधनिबंध कुठल्याही मान्यताप्राप्त आंतरराष्ट्रीय शोध-मासिकांमध्ये प्रसिद्ध झालेले नाहीत. चिनी शासन यंत्रणेने लसींचे परिणाम काय होतात यावर आपण सातत्याने लक्ष ठेवून आहोत, असे सांगितले आहे; पण त्याबद्दलची कुठलीही उपयुक्त माहिती अद्याप चिनी सरकारने प्रसिद्ध केलेली नाही. व्यापक आणि नेमकी माहिती, वेळच्या वेळी आणि विश्वसनीयरीत्या उपलब्ध होणे हे लसीकरणाबाबत विश्वास वाढवण्यासाठी आवश्यक आहे, असे ‘द लॅन्सेट’च्या संपादकांनी म्हटले आहे; ते भारतालाही तितकेच लागू आहे.

विज्ञान आणि आरोग्य यांचा जिथे संबंध आहे तेथे सहकार्य हे संशय आणि विरोध यापेक्षा कितीतरी जास्त महत्त्वाचे आहे. असे सहकार्य पूर्वीपेक्षा आता खूपच जास्त आवश्यक ठरते आहे. सरकारने जनतेला शिक्षा म्हणून आपण टाळेबंदी जाहीर करत आहोत अशा स्वरूपात बोलता कामा नये; त्यातून जनता आणि सरकार हे एकमेकांच्या विरोधी आहेत अशी मानसिकता निर्माण होते. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून राजकीय कुरघोडी करण्याचा प्रयत्न करणे याचा हा काळ नव्हे, याची ही वेळही नव्हे.

आरोग्य क्षेत्रातील जाणकार आणि कार्यक्षम नेतृत्वाखाली शासन, प्रशासन आणि नागरिक यांनी एकदिलाने काम करून सहकार्याने कोविड-१९ साथीचा सामना केला, तर कोविड-१९ ला आळा घालता येतो हे चिनी अनुभवातून आपण शिकले पाहिजे.

या लेखातील सर्व आकडेवारीला ‘द लॅन्सेट’च्या संपादकीयाचा (१० एप्रिल) आधार आहे.

anandkarandikar49@gmail.comX