सोप्या मराठी भाषेत वैज्ञानिक विषयांवर ६० हून अधिक पुस्तके लिहिणारे, ‘प्राचीन भारतीय वैज्ञानिक संस्कृतीचा विश्वसंचार’, ‘कणाद ते कलाम’ अशा विविध विषयांवर मनोरंजक तितकीच माहितीपूर्ण व्याख्याने देणारे  प्रा. मोहन आपटे यांचे हे अमृतमहोत्सवी वर्ष. स्वत:च्या अमृतमहोत्सवापेक्षा भास्कराचार्याच्या ९००व्या जयंतीचे भान समाजात यावे यासाठी झुंजणारा हा ‘युवक’.. या निमित्ताने त्यांच्याशी केलेली बातचीत..
आपण विज्ञानाकडे कसे काय वळलात? म्हणजे काही घरची पाश्र्वभूमी की व्यक्तिगत आवड?
माझा जन्म राजापुरातील कुवेशी गावचा. हे असे गाव आहे की जिथे सायकलसारखे वाहनसुद्धा जाण्यासारखे रस्ते नव्हते. २२ वर्षांपूर्वी त्या गावांत पहिली एसटी आली. अशा ग्रामीण भागातून आलेलो असलो तरीही मुळात विज्ञानाची आवड होतीच. त्यातही भौतिकशास्त्राकडे माझा विशेष कल होता. म्हणून विज्ञान..
 पण मग मराठीतून विज्ञानविषयक लिखाण करावं असं कसं काय वाटलं? म्हणजे एखादा विशेष अनुभव किंवा घटना?
खरं तर मातृभाषेतून कोणताही विषय समजून घेणे सोपे जाते तसंच ‘आपल्या’ भाषेत कोणताही विषय शिकताना त्यात आपोआपच रस निर्माण होतो. शिवाय विज्ञानाबद्दल मराठीतून तपशीलवार आणि रंजक पद्धतीने माहिती देणारी फारशी पुस्तके उपलब्ध नव्हती. म्हणून मग ठरवलं की मराठीत लिहायचं. किंबहुना आजही माझा अनुभव आहे, की इंग्रजी या भाषेला पर्याय नाही ही वस्तुस्थिती मान्य केली तरीही, संकल्पनात्मक बाबी स्पष्ट होण्यासाठी मातृभाषा आणि घरगुती संवादाची भाषाच मदत करते. त्यामुळे आजही मी मराठीतून लिहिण्याबाबत आग्रही आहे. शिवाय मराठी ही ज्ञानभाषा होण्यासाठी त्या भाषेत सर्वच विषयांमध्ये वाङ्मयनिर्मिती होणे गरजेचे आहे.
 मराठी भाषेत वाङ्मयनिर्मिती करताना त्याच्या प्रसारावर मर्यादा येऊ शकतील, किंबहुना मराठी पुस्तकांच्या एका आवृत्तीतील प्रतींची संख्या लक्षात घेता या मर्यादा अधिक तीव्र ठरतील अशी शंका किंवा भीती नाही वाटली?
खरे तर नाही, कारण माझी पुस्तके राजहंस प्रकाशकाने प्रसिद्ध केली आहेत. त्यांचा महाराष्ट्रातील संपर्क दांडगा होता. शिवाय वैज्ञानिक व्याख्यानांच्या निमित्ताने माझा महाराष्ट्रभर जो प्रवास झाला त्यात मला जाणवत होतं की, शहरी भागापेक्षाही निमशहरी किंवा ग्रामीण भागातील युवक आणि एकूणच सामान्य माणसांना मराठीतून विज्ञान ‘जाणून’ घेण्याची उत्सुकता आहे. त्यामुळे मला ही भीती वाटली नाही. शिवाय मराठीतून वैज्ञानिक वाङ्मय लिहायचेच ही माझी ठाम भूमिका होतीच. त्याशिवाय एक अडचण होती पारिभाषिक शब्दांची.. पण त्यावर उपाय म्हणून मी स्वत: काही नवीन शब्द तयार केले. हे शब्द तयार करताना ते संस्कृतप्रचुर न राहता मराठी वाटतील याची दक्षताही मी घेतली.
 आज जेव्हा आमच्यासारख्या तरुणांना प्रेरणा शोधावी लागते, पण ७५व्या वर्षीही एखाद्या तरुणाला लाजवेल, असा उत्साह आणि प्रेरणा तुम्हाला कोठून मिळते?
 खरं तर प्रेरणा शोधावीच लागत नाही. महर्षी कणाद, भास्कराचार्य, आर्यभट्ट, गणेश दैवज्ञ एक नाही अनेक.. किती भारतीय वैज्ञानिकांची नावे घेऊ? हे सगळे वैज्ञानिक भारताला विज्ञानात प्रचंड आघाडीवर घेऊन गेले होते. पृथ्वीचा परीघ मोजायचे भास्कराचार्याचे सूत्र असो किंवा त्यांचीच पायथागोरसने मांडलेल्या प्रमेयाची, हे प्रमेय मांडण्यापूर्वी तयार केलेली सिद्धता असो, गणित-अवकाशशास्त्र, स्थापत्यशास्त्र, धातुशास्त्र, नाटय़शास्त्र, आयुर्वेद, योगशास्त्र, भाषाशास्त्र, भौतिकशास्त्र, म्हणाल त्या विषयात भारत आघाडीवर होता. किंबहुना इतिहासाचा नीट अभ्यास केला तर दिसेल की, भारतात जागतिक कीर्तीची किमान ८ ते ९ विद्यापीठे एकाच वेळी कार्यरत होती. पण १२व्या शतकात परकीय आक्रमणानंतर या विद्यापीठांमध्ये एकसंधपणे आणि लिखित स्वरूपात असलेले सर्व साहित्य-वाङ्मय पद्धतशीरपणे नष्ट केले गेले. त्याचे पुनरुज्जीवन प्रत्येक भारतीय नागरिकाच्या मनात आत्मविश्वास जागृत होऊ शकतो. ही कल्पनाच मला वाटतं प्रेरणादायी आहे.
भारतीय संविधानामध्ये मूलभूत कर्तव्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याबाबत उल्लेख आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे नेमके काय? तो विकसित करण्यासाठी काय करावे लागेल? आणि मुख्य म्हणजे एकीकडे वैज्ञानिक वाङ्मय वाचले जात असताना, तंत्रज्ञानाचा प्रसार झपाटय़ाने होत असताना आजही भोंदू-बाबा अशा प्रवृत्तींकडे समाजमन आकर्षित होते, हा विरोधाभास का?
 माझं या बाबतीत थोडं वेगळं मत आहे. मन आणि विज्ञान यांच्यात मुळातच तफावत आहे. त्यांचा परस्परांशी संबंध नाही. समुपदेशनासारखे मार्ग हा कायमस्वरूपी उपाय मानता येणार नाही आणि त्यामुळेच मनाचे प्रश्न सोडविण्याचे वैज्ञानिक मार्ग असतीलच असे मला वाटत नाही. म्हणजे, मनाचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करता येऊ शकेल, पण सर्व प्रश्न समान पद्धतीने सोडविता येतीलच असे मात्र मला वाटत नाही. काही दिवसांपूर्वीचीच बातमी आहे, की कुंभमेळ्यामध्ये ७० तुर्की लोक स्नानासाठी आले होते तसेच काही युरोपीय व्यक्तीसुद्धा यासाठी आल्या होत्या. आज आपण पाश्चिमात्य देशांतील लोकांना विज्ञाननिष्ठ मानतो, पण मग कुंभमेळ्यातील स्नानाचा मोह त्यांना का पडावा? थोडक्यात सांगायचे तर, अगतिक परिस्थितीत- आतुर मानसिकता झालेली साशंकता आहे. मात्र विज्ञानात रस निर्माण होण्यासाठी अनेक गोष्टी करता येऊ शकतात. जसे लोकांना खिळवून ठेवू शकणाऱ्या भाषेत विज्ञान असताना, वैज्ञानिक दृष्टिकोन कोलमडतो हे सत्य आहे. त्यामुळे सर्वस्वी वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होईल का, याबद्दल माझ्या मनात हा विषय मांडता येईल असे युवक-युवती तयार करणं, विज्ञान विषयातील उत्तम लेखक तयार करणं, गावागावांत प्रसार करण्यासाठी वैज्ञानिक संस्था उभ्या करणं, वैज्ञानिक घडामोडींबाबत लिखाण करू शकतील असे पत्रकार तयार करणं, प्राचीन भारतातील विज्ञान सामान्य माणसांपर्यंत पोहोचविणं, विद्यापीठांनी एकत्र येऊन लोकांना वापरायला सुलभ जाईल असा पारिभाषिक शब्दकोश तयार करणं- त्याचा प्रसार करणं, गरजेनुसार नव्या शब्दांची रचना करणं अशा अनेक मार्गानी हे शक्य आहे आणि मला वाटतं, विरोधाभास का हे यातच आले.
 विज्ञानासारखा विषय आणि त्याचा अभ्यास रंजक कसा काय करता येऊ शकेल?
 कोणत्याही विषयाचा अभ्यास हा जर तौलनिक पद्धतीने केला तर निश्चितच सोपा होतो. मी स्वत:चेच उदाहरण देतो. भास्कराचार्याचा अभ्यास करताना मी त्या-त्या वेळची जागतिक परिस्थिती लक्षात घेतो. म्हणजे त्या काळी जगभरात वैज्ञानिक क्षेत्रांत काय-काय घडत होते हे मी पाहतो. मग लक्षात येतं की, भास्कराचार्याइतका विद्वान आणि सर्वशास्त्रपारंगत असा शास्त्रज्ञ त्या काळी जगभरांत नव्हता किंवा शिवाजी महाराज आणि त्यांच्या मोहिमा यांचा अभ्यास करताना शिवरायांनी ज्योतिषशास्त्राचा आधार घेतला असेल का, असा प्रश्न मला पडला. मग मी एका सॉफ्टवेअरच्या मदतीने महत्त्वपूर्ण मोहिमांचे अवकाश नकाशे पाहिले. अफझलखानाचा वध, आग्य्राहून सुटका, पन्हाळगडावरून विशाळगडाकडे केलेले कूच, शाहिस्तेखानाची कापलेली बोटे अशा अनेक घटनांच्या वेळी आकाशस्थ ग्रहगोलांची-नक्षत्रांची स्थिती तंतोतंत समान होती असे मला आढळले. त्यावरून शिवराय ज्योतिषशास्त्राचा आधार घेत होते, असा निष्कर्ष मी काढला. मग साधारण १७व्या शतकांतच गणेश देवज्ञ या ज्योतिषशास्त्रज्ञाने शिवछत्रपतींच्या आग्रहास्तव आपण खगोलविषयक दिनदर्शिका पुनर्रचित करीत असल्याचे लिहिले आहे अशी नोंद मला सापडली. थोडक्यात, वेगवेगळ्या विषयांचा स्वतंत्र अभ्यास न करता तौलनिक अभ्यास केल्यास तो अधिक सोपा होतो.
 आपल्याशी बोलताना जाणवलं की आपलं जर्मन, संस्कृत भाषांवर प्रभुत्व आहे. हे कसं काय साधलं?
मुळात संस्कृत हे आमच्या घराण्यातच आहे. त्यामुळे माझ्या गुणसूत्रांतच ते उतरले आहे, असे म्हटले तरी चालेल. शिवाय प्राचीन भारतातील सर्व वैज्ञानिक वाङ्मय हे संस्कृतमध्ये आहे. त्यामुळे जर ते समजून घ्यायचे असेल तर मुळातून ही भाषा यायला हवी हे मला जाणवले. म्हणून मी त्याचा अभ्यास केला. शिवाय, या भाषेची एक गंमत आहे. ज्यांना आज विज्ञान- वैज्ञानिक संकल्पना यांची उत्तम जाण आहे, अशा व्यक्तींना संस्कृत भाषा येत नाही आणि संस्कृत भाषा येणाऱ्या व्यक्तींना वैज्ञानिक संकल्पना कळतातच असे नाही. त्याचा विपरीत परिणाम भाषा आणि त्या भाषेत उपलब्ध असलेले प्राचीन ज्ञान यांच्या प्रसारावर होतो. यावर मात करायला हवी. माझे त्यासाठीसुद्धा प्रयत्न सुरू आहेत.
 आपण वैज्ञानिक लिखाण करता, पण खुद्द आपला आवडता वैज्ञानिक लेखक कोणता?
मराठीत असा लेखक ठरविणे अवघड आहे, पण सुमारे २०० पुस्तके विज्ञानावर लिहिणारा आयझ्ॉक अ‍ॅसिमॉव्ह हा माझा आवडता लेखक आहे. मराठीत सध्या वैज्ञानिक लिखाण करणाऱ्यांमध्ये हेमंत लागवणकर यांचे लिखाण आशादायी आहे असे मला वाटते. मात्र त्याच वेळी तरुणांनी स्वत:हून अशा लेखनाकडे वळण्याची गरज आहे. नियमित व्यायाम, मनोरंजनावर नियंत्रण, इंटरनेटचा सदुपयोग, बहुआयामी आणि विविध विषयांचे वाचन आणि इतिहास जिवंत करणाऱ्या ठिकाणी भ्रमंती हे पंचशील तरुणांनी आत्मसात करण्याची गरज आहे.

भास्कराचार्याचे विस्मरण नको!
सन २०१४ हे भास्कराचार्याचे ९००व्या जयंतीचे वर्ष आहे. चाळीसगावजवळील पाटणगाव येथे सापडलेल्या शिलालेखाच्या संदर्भाने असे म्हणता येते की, भास्कराचार्य हे जगद्विख्यात शास्त्रज्ञ महाराष्ट्रातीलच होते. किंबहुना त्यांच्या आठ पिढय़ा राजांच्या पदरी मार्गदर्शक म्हणून वावरत होत्या. दुर्दैवाने आज त्यांच्या विद्वत्तेचे विस्मरण झाले आहे. पाटणगाव येथील शिलालेखही दुरवस्थेत आहे. त्याचे जतन करण्यासाठी निधीची तसेच दुर्दम्य इच्छाशक्तीच्या तरुणांची गरज आहे. मी स्वत: या कामी लागलो असून मला यासाठी सर्वतोपरी सहकार्य करावे, असे आवाहन या ७५ वर्षांच्या युवकाने केले.

संस्कृतच्या जतनासाठी..
कोणतीही भाषा केव्हा टिकते, तर जगाला चालविणारा ‘ड्रायव्हिंग फोर्स’ ओळखून त्या-त्या विषयाच्या अनुषंगाने त्या भाषेत लिखाण होते तेव्हा.. आज संस्कृतमध्ये वैज्ञानिक लिखाणाची आणि तीसुद्धा लोकांना सहज उमगू शकेल अशा सोप्या वाक्यरचनेतील वैज्ञानिक लेखांची गरज आहे. मी स्वत: भास्कराचार्याच्या ९००व्या जयंतीचे निमित्त साधून संपूर्ण संस्कृत भाषेतील भास्कराचार्यावरील लेखांची पुस्तिका त्या दृष्टीने लिहीत आहे, असे प्रा. आपटे यांनी नमूद केले.

भास्कराचार्याचे पृथ्वी परीघ मोजण्याचे सूत्र-
कोणतीही दोन शहरे घ्या. त्या दोन शहरांमधील प्रत्यक्ष अंतर मोजा. आता त्या दोन शहरांची अचूक रेखावृत्ते काढा. त्या रेखावृत्तांमधील तफावत मोजा. मग, ही तफावत समजा ‘क्ष’ इतके अंश आली आणि दोन शहरांमधील अंतर ‘य’ कि.मी. असेल तर, ‘क्ष’ अंश म्हणजे ‘य’ कि.मी. तर ३६० अंश म्हणजे किती किलोमीटर हे त्रराशिक म्हणजे पृथ्वीचा परीघ मोजण्याचे सूत्र.