समकालीनतेच्या ‘आदिम’ खुणा

जागतिक पातळीवरच्या प्रदर्शनांमध्ये या कलाप्रकारांचा समावेश होतो आहे.

आज मेदिनीपूर, मधुबनी किंवा बस्तरमधले लोककलाकार किंवा आदिवासी चित्रकार अनेकदा संग्रहालयांत आणि खासगी-व्यावसायिक कलादालनांत कला प्रदíशत करताना दिसतात. त्यांच्या ‘समकालीन’ अस्तित्वाची दखल घेतली जात आहे. केवळ भारतातच नव्हे तर जागतिक पातळीवरच्या प्रदर्शनांमध्ये या कलाप्रकारांचा समावेश होतो आहे. हस्तकला किंवा आदिवासी कलांचा विचार हा आशयापेक्षा त्याचे कौशल्य, कलेची साधनं/ माध्यमं आणि कलावस्तूंची उपयोगिता यांच्या संदर्भात केला जातो. तसंच विकास, उत्पन्नाचं साधन आणि उच्चभ्रूंचा खरेदी करणारा वर्ग यापलीकडे त्याचा कला म्हणून विचार फार कमी वेळा केला जातो. पण प्रत्यक्षात पाहायला गेलं तर आधुनिक कलेला ओळख मिळण्यात तिचा आदिवासी कलेशी आमनासामना होण्याचा फार मोठा वाटा होता.

आधुनिक व समकालीन कलेचा अभ्यास करताना कला-इतिहासात ‘राष्ट्र’ या संकल्पनेभोवती भारतीय कलेची मांडणी झाली. त्यातून तेव्हा वगळले गेलेले कलाकार व कलाव्यवहार यांच्याकडे आज चिकित्सक दृष्टिकोनातून पाहिलं जातं. अर्थात, याचा अर्थ असा नाही की ‘प्रादेशिक’ कलेचा समावेश यात झालाच नाही. भारतीय कला असा विचार करताना शांतिनिकेतन, मुंबई, बडोदा ही ठिकाणं त्या त्या वेळी भारतीय कलेला आकार आणि रूप देणारी ठरली. त्याव्यतिरिक्त उरलेल्या ठिकाणच्या कलाप्रकारांवर मात्र ‘प्रादेशिक’ किंवा ‘व्हर्नाक्युलर’चा शिक्का बसला. या ‘इतर’ ठरलेल्या कलाव्यवहाराला कलेतिहासात आज महत्त्वाचं स्थान मिळालं आहे. त्यातून कलेतिहासाची नवी कथनं तयार होत आहेत. उदाहारणार्थ, ज्योतीन्द्र जैन यांच्या ‘अदर मास्टर्स’सारख्या प्रदर्शनातून आदिवासी कलाकारांचं ‘पुनशरेधन’ करण्याचा प्रयत्न केला गेला.

आदिवासी आणि लोककलांची म्हणून एक चिन्हव्यवस्था असते. जगदीश स्वामिनाथन यांनी त्यांच्या चित्रकलेत ती सामावून घेण्याचा प्रयत्न केला. हे कलाप्रकार हे पारंपरिक आहेत असा जरी सार्वत्रिक समज असला तरी यातले आकृतिबंध हे समकालीनतेशी मिळतेजुळते असतात. ही मांडणी पुढे नेत त्यांनी आधुनिक कला आणि आदिवासी कला यांत पूल बांधायचा प्रयत्न केला. त्यांची धडपड ही समकालीन मूल्यांचा शोध भारतातल्याच कलाप्रकारांत घेण्याची होती. त्यातून या कलाभाषा आणि व्यवहार यात एक प्रकारचं सातत्य दाखवण्याकडे त्यांचा कल होता. नवी माध्यमं वापरताना नवे शोध घेत व आशयाच्या नावीन्यपूर्ण मांडणीतून आदिवासी कलाकारांचं आत्मत्व चित्रातून आकाराला येत गेलं. हे करताना त्यांनी आधुनिक कलेच्या चौकटीतून आदिवासी व लोककलेचं आकलन करण्याचा प्रयत्न केला. सामूहिक आविष्काराचा भाग असलेल्या आदिवासी कलेचं त्यांनी निराळ्या प्रकारे अर्थघटन केलं. यात गंगादेवी भट, शांतीदेवी, रीना उंबरसडा या कलाकारांचं काम हे आदिवासी कला म्हणजे साधी, सुटसुटीत किंवा सामुदायिकतेतून आलेली अशा रूढ समजांना आव्हान देणारं ठरतं.

उदाहरणार्थ, दळणाची दगडी जाती कालबाह्य़ होत होत हळूहळू लोककला किंवा आदिवासी कलावस्तूंच्या संग्रहालयाचा भाग बनत गेली. आज ती बऱ्याच ठिकाणी, खासकरून शहरांमध्ये आणि मोठय़ा गावांमध्ये, काही धार्मिक विधींपुरती वापरली जातात. पण हे आता अप्रचलित झालेलं साधन रोजच्या वापरात टाकाऊ होत गेलं असलं तरी बेंगळूरुमधील शीला गौडा यांनी ते घेऊन काम केलं. शहराच्या जुन्या भागात नवीन बांधकामं येत असताना लोकांनी टाकून दिलेली ही दगडी जाती त्यांनी गोळा केली. फ्रान्समधल्या शहराच्या रस्त्यावर मांडली गेली. गौडा त्याकडे विस्थापनाचं आणि शहरी बदलांचं रूपक म्हणून पाहतात. स्वयंपाकघरातून रस्त्याच्या कडेला टाकून दिलेल्या अवस्थेत त्यांना ती जाती सापडली. आपली समकालीनता रचली जाते तीच मुळात परंपरेच्या आणि गतकाळाच्या आधारावर. त्यातले निरनिराळे धागे जपत आणि त्यातून नव्या गुंतागुंतीच्या रचना करत या व्यामिश्रतेवर शीला गौडा भाष्य करतात.

नवज्योत अल्ताफसारख्या कलाकार प्रत्यक्ष बस्तरच्या आदिवासी भागात जाऊन काम करतात. आदिवासी कलेकडे इतर ‘मास प्रॉडक्शन’सारखं न बघता त्या कलाकारांना अभिव्यक्तीसाठीचं, प्रयोगशील आविष्कार करण्याचं अवकाश या संवादातून तिथं उभं राहिलं आहे. गंगादेवी आणि इतर अनेक कलाकारांनी मुंबई आणि कोकणातील कलादालनांत आपापल्या कलाकृतींचं प्रदर्शनही त्यानिमित्ताने केलं आहे. समकालीन शहरी कला आणि आदिवासी कला यातल्या संवादी प्रक्रियेतून ‘शिल्पीग्राम’ प्रकल्प उभा राहिला. गंगादेवी भट्ट यांनी विरेचनात्मक अशी ‘व्यक्तिगत इतिहास’ ही चित्रमालिका रंगवली. यात नवज्योत यांच्या शैलीचा प्रभाव जाणवत असला तरी चित्रकल्पना, रंगसंगती आणि पोत हे गंगादेवीच विकसित करीत गेल्या. न विसरता येणाऱ्या कटू आठवणी किंवा कुणाला न सांगितलेली गुपितं हे त्यांच्या रेखाटन आणि जलरंग किंवा अ‍ॅक्रिलिक रंगातल्या चित्रांचा आणि लाकडातल्या कोरीव कामाचा भाग बनत गेलं. आदिवासी भागातल्या, खासकरून बस्तरमधल्या सामाजिक रचना आणि त्यातले अनेक पलू यांतून त्यांनी ते मांडले. तिथली हिंसा, सामाजिक बहिष्कार, तुटलेपण हे सगळं आदिवासी समाजाबद्दलच्या शहरी समजुतींना मोडून काढणारं होतं.

माध्यम आणि आशय दोन्हीतले प्रयोग हे आज आदिवासी आणि लोककलांचा मौलिक हिस्सा बनले आहेत. या शहरी समकालीन कलाकारांच्या आदिवासी कलाकारांबरोबरच्या संवादातून नवे प्रश्न उभे राहतात. त्यातून एकीकडे समकालीनतेची व्याख्या ठरावीक शहरी चौकटीत न राहता अधिक व्यापक आणि बहुपदरी बनत जाते. तसंच, बऱ्याचदा ही पारंपरिक साधनं हे गतकाळाला त्यांच्या आजशी जोडणारं ‘माध्यम’ बनतात. बंगाली पटचित्रकार मणिमाला चित्रकार यांच्या ‘भाषा दिवस’ या पटचित्रातून बंगाली भाषा अस्मिता, भाषेची आजची परिस्थिती, भाषेवरून बांगलादेशात (तेव्हाचा पूर्व पाकिस्तान) झालेला लढा यांचं चित्रण येतं. शाळेतली बंगाली शिकणारी मुलं, बंगमातेची प्रतिमा, पूर्व पाकिस्तानातील भाषा चळवळ यांचे संदर्भ या पटचित्रात येत राहतात. उलगडणाऱ्या पटावर तुकडय़ांमध्ये या चित्राची रचना त्या करतात जेणेकरून पाहणाऱ्याला त्यातलं कथन सहजपणे उमगेल. त्यांच्या पटचित्रात मिथकंही दिसतात आणि आजच्या काळातली कथनंदेखील. ठाण्याच्या तलासरी भागातल्या रीना उंबरसडा बहुतेक वेळा बाजारपेठेच्या मागणीनुसार बदलत जाणाऱ्या वारली कलेला ‘आदिवासी’ मानण्यापेक्षा ‘पारंपरिक’ मानतात. स्वत धर्माने ख्रिश्चन असलेल्या रीना यांनी बायबलमधील रूथ, ईव्ह, मेरी मॅग्डालीन इत्यादी स्त्रियांच्या चित्रप्रतिमा नव्याने वारली चित्रकलेत आणल्या. त्यांचे प्रयोग फक्त आशयापुरते मर्यादित नसून निराळी कथनं, कथनशैली आणि प्रतिमा त्यांनी या चित्रप्रकाराला दिल्या आहेत. या मिथकीय प्रतिमा आणि प्रगल्भ सामाजिक जाणीव यांच्या संयोगातून त्यांनी वारली चित्रकलेला नवा आयाम प्राप्त करून दिला आहे.

हे कलाकार जाणीवपूर्वक ही पारंपरिक माध्यमं वापरतात किंवा त्यात बदल घडवतात. काही वेळा हे बदल सरकारी किंवा तत्सम योजनेतूनही येतात. आणि आदिवासी शैलीत सामाजिक विषयांवर चित्रं काढून प्रचारासाठी ती वापरली जातात. किंवा कलाबाजारात ठरावीक शैलीतील आदिवासी कलेला भाव जास्त मिळतो. या दोन्हीच्या प्रभावाखाली ही कला आज दिसत असली तरी कलाकार आपापल्या परीने त्याची पुनर्रचना करताना, तिला नवी दिशा देत आहेत. हे प्रयत्न वासाहतिक काळात तयार झालेल्या कला-हस्तकला, ललित कला-लोककला, पारंपरिक किंवा आदिवासी कला अशा कोटी ओलांडून त्या अधिक प्रवाही आणि एकमेकींत सहजपणे मिसळणाऱ्या अशा असाव्यात याकडे कल आहे. हे करताना चालत आलेल्या चिन्हव्यवस्था मोडत किंवा आस्वादव्यापाराच्या नव्या खुणा शोधत आजच्या दृक्संस्कृतीच्या विचारात त्याची मांडणी होते आहे. ही कृती बऱ्याचदा जाणीवपूर्वक नसली तरी त्यामुळे समकालीनतेची व्याख्या नव्याने घडायला मदत होत आहे. समकालीनतेचे अनेकविध अर्थ समोर येत आहेत आणि यातलं अर्थघटन नेमकं कसं आणि कुठं घडतं असे प्रश्नही विचारले जात आहेत.

नूपुर देसाई

noopur.casp@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Artist sheela gowda ganga devi and roller coaster painting

ताज्या बातम्या