छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र आपल्या अमोघ वाणीने फक्त महाराष्ट्रातच नाही तर भारतात आणि परदेशातही पोहोचविणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे ‘लोकसत्ता वक्तृत्व स्पर्धे’च्या आज होणाऱ्या vv02महाअंतिम फेरीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्या निमित्ताने बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेल्या ‘राजा शिवछत्रपती’ ग्रंथातील ‘प्रलयाची पहिली लाट’ आणि ‘द्वारका बुडाली’ या दोन प्रकरणांचा संपादित भाग. या लेखमालेसाठी दादर सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथपाल अश्विनी फाटक, कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आचार्य अत्रे सार्वजनिक ग्रंथालयाचे (डोंबिवली) ग्रंथपाल अनिल भालेराव, केशव कलेक्शनचे (डोंबिवली) संस्थापक व चालक कमलाकर कुलकर्णी, विदर्भ साहित्य संघाचे उपाध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांचे पुस्तकेउपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य लाभले.

खरोखरच महाराष्ट्रावर वर्षांतील बाराही पौर्णिमा सुखाचे चांदणे शिंपीत होत्या. अन् घात झाला. चंद्राला अकस्मात खळे पडले. कसे पडले, केव्हा पडले ते कुणाला समजलेच नाही. विंध्याचलाच्या मागून धुळीचे लोट उठले. आठ हजार घोडय़ांच्या बत्तीस हजार टापा वाढत्या वेगाने आणि आवेशाने खडाडत महाराष्ट्रावर चालून आल्या. त्यांचा आवेश कत्तलबाजांचा होता..
त्यांचा म्होरक्या होता अल्लाउद्दीन खलजी पठाण. त्याचा युद्धपुकार अस्मान फाडीत होता. ती पठाणी फौज नर्मदा ओलांडून सातपुडय़ाच्या माथ्यावर चढली. पठाणांची पहिली झडप पडली एलिचपुरावर. हंबरडे आणि किंकाळ्या फुटल्या. परचक्र आले. महाराष्ट्रावर परचक्र आले. थोडे दिवसच आधी महाराष्ट्रातील संतांची दिंडी उत्तर हिंदुस्थानात यात्रांना जाऊन आली होती. त्यांनी सुलतानांची सत्ता पाहिली, काही कठोर कडवट अनुभव घेतले. लोकांना सांगितले होते. तरीही राजा आणि राज्य गाफील होते.. अल्लाउद्दीनचे हे वादळी आक्रमण राजा रामदेवराव यादवाला उशिरा कळले. स्वराज्यात तो कमीतकमी शंभर कोस (म्हणजे सव्वाशे किलोमीटर) घुसला तरी त्याला कुणीच अडवले नाही? मग आमचे सैन्य होते कुठे? आमचा राजा बेसावध होता. पण सेनापती काय करत होता? सेनापती होता राजा रामदेवाचा युवराजच. त्याचे नाव शंकरदेव ऊर्फ सिंघणदेव. तो आपल्या सैन्यासह दूर कोठेतरी गेला होता. यात्रेला गेला होता म्हणे. अल्लाउद्दीनची फौज देवगिरीच्या रोखाने दौडत येत होती. रामदेवरावाला आपले भयंकर भविष्य दिसू लागले.
खलजी आणि यादवसेना यांचे देवगिरीभोवती युद्ध झाले. अवघ्या पंधरा दिवसांत देवगिरीचे सार्वभौमत्व संपले. (इ. १३०९) राजा रामदेवराव मरण पावला. शंकरदेव देवगिरीच्या सिंहासनावर राजा झाला आणि त्याने अल्लाउद्दीनाचे मांडलिकत्व झुगारून दिले. खंडणी बंद केली (इ. १३०९ पासून पुढे). अल्लाउद्दीनाने आपली फौज मलिक काफूरबरोबर देवगिरीवर पुन्हा पाठविली. खलजीने मलिकला, तू देवगिरीच्या फौजेचा फडशा पाड आणि ते राज्यच जिंकून घे. तू तिथेच राहा. एक जुम्मा मशीद बांध आणि आपल्या धर्माचा प्रसार कर, असा हुकूम दिला. युद्धाचा वणवा पेटला. शंकरदेव मराठय़ांच्या क्षात्रधर्माला शोभेसा लढत होता. अन् घात झाला. महाराष्ट्राच्या वर्मी घाव बसला. शंकरदेव ठार झाला. मलिक काफूरने त्याला मारले. कत्तल सुरू झाली. महाराष्ट्राच्या वैभवाचा, स्वातंत्र्याचा, सद्धर्माचा, सुसंस्कृतीचा, दराऱ्याचा तो गरुडध्वज कडाडून मोडून पडला. स्वातंत्र्याचा शेवटचा आक्रोश उठला. कणा मोडला आणि महाराष्ट्राची सोन्याची द्वारका बुडाली..
कारण महाराष्ट्राची दंडसत्ता आणि विवेकसत्ता ही गाफील राहिली. दंडसत्ता म्हणजे राज्यकर्ते आणि विवेकसत्ता म्हणजे शिकलेसवरलेले ज्ञानी लोक. उत्तर हिंदुस्थानात सुलतानी सत्तेचा केवढा प्रचंड धुमाकूळ चालू आहे आणि त्या हालअपेष्टात सत्ता, धर्म, संस्कृती आणि इतिहासही कसा चिरफाळून गेला आहे, हे आमच्या देवगिरीच्या यादवराजांना माहीत नसावे? उद्या किंवा परवा हा वरवंटा महाराष्ट्रावरही रोरावत येणार आहे हे यादव सत्ताधीश आणि पंडितांना माहितीच नसावे? तरीही इथले राज्यकर्ते आणि पंडित झोपेतच होते. आमचा देवगिरीचा पंतप्रधान हेमाद्री हा राज्यकारभारी होता. निदान त्याला तरी या भावी संकटाची जाणीव झाली होती का? नव्हती. तसे पुसटसेही चिन्ह त्याच्या ग्रंथात आणि राज्यकारभारात दिसत नाही. त्याने याच काळात ‘व्रताचार शिरोमणी’ हा ग्रंथ लिहिला. म्हणजे व्रतवैकल्ये कशी करावीत, उपासतापास कसे करावेत, प्रसाद सव्वाशेराचा करावा की पावशेराचा पुरे याचा विचार करीत आमचे पंतप्रधान शिक्कामोर्तब उठवीत बसले होते. आळंदीच्या एका संन्याशाच्या तीन पोरांच्या मुंजी कराव्यात की न कराव्यात याचाच खल पैठणसारख्या विद्यानगरीत विद्वान करीत होते. संस्कृत धर्मग्रंथांच्या होळ्या पेटत होत्या. किनाऱ्यापासून पाच कोस कुणी समुद्र ओलांडला, तर ओलांडणाऱ्याला ते धर्मभ्रष्ट ठरवीत होते. सरहद्द ओलांडून दीडदीडशे कोस खलजींच्या पठाणी सेना स्वराज्यात घुसल्या, तरी आमच्या राजाला आणि सेनापतीला त्याचा पत्ता लागत नव्हता. आश्चर्य काय, महाराष्ट्र गुलामगिरीत पडला तो? आश्चर्य काय, धर्म मृत्यूच्या दाढेत सापडला तर?
(पुरंदरे प्रकाशन प्रकाशित आणि बाबासाहेब पुरंदरे लिखित ‘राजा शिवछत्रपती’ या ग्रंथावरून साभार)

संकलन – शेखर जोशी

नाथे समूह प्रस्तुत आणि पृथ्वी एडिफाइस व भारतीय आयुर्विमा मंडळ यांच्या सहकार्याने आणि जनकल्याण सहकारी बँक लिमिटेड व तन्वी हर्बल्स यांच्या मदतीने राज्यातील आठ केंद्रांवर झालेल्या ‘लोकसत्ता’ वक्तृत्व स्पर्धेची अंतिम फेरी आज आहे.