राज्यसभेची खासदारकी पदरात पडली. पुढे कुरघोडीच्या खेळात राज्यमंत्री पद मिळाले. अर्थखात्यातील बँकिंगचा विषय हाती आला. पण अर्थविषयक घडामोडी म्हणजे फक्त पंतप्रधानांच्या नावच्या योजना अशी कार्यव्याप्तीची व्याख्या ठरवून मग मंत्रिमहोदय कामाला लागले. मग रोज मीटिंगा, कधी ही योजना तर कधी ती. मंत्रीपद मिळाले पण भविष्यात खासदारकी कशी टिकवायची याची चिंता त्यांच्या मनातून काही जात नव्हती. मग महिलांचा पाठिंबा मिळविण्यासाठी एक बैठक घेण्यात आली, पण या बैठकीकडे अनेक जणी आल्याच नाहीत. खुच्र्या रिकाम्याच राहिल्या. आजकाल लोकच येत नाहीत, असं आता भाजपच्या कार्यकर्त्यांना सांगावं लागत आहे. पण आता गर्दीची हमखास गॅरंटी म्हणून तर महाराजांचा कार्यक्रम आखण्यात आला आहे. या महाराजांच्या तारखा आणखी एका मंत्र्याला हव्या होत्या. पण ही तारीख मिळविण्यावरून बरीच धुसफुस चालली म्हणे. आता गर्दी होणार म्हणून केंद्रातले मंत्री खूश झालेत. एवढे दिवस गर्दी काही जमत नव्हती. आता भाजपचे कार्यकर्ते उठा उठा निवडणूक आली, महाराज मिळविण्याची वेळ झाली, असे नवे सूत्र घोकू लागले आहेत.

हेच का ते गोरे ?

 पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्रीपदी असताना आमदार जयकुमार गोरे हे त्यांचे साताऱ्यातले कट्टर समर्थक आमदार  होते. चव्हाण यांच्यासारखा हुशार आणि कर्तबगार मुख्यमंत्री कुठे शोधूनही सापडणार नाही असे ते सर्वत्र सांगत. चव्हाण यांच्या माध्यमातून त्यांनी दुष्काळी माण-खटाव मतदार संघात रस्ते, पाणी, समाज मंदिरे, बंधारे, तलाव आदी अनेक मोठी कामे केली. पृथ्वीराजबाबांची मोठी कृपा गोरे यांच्यावर होती. गावाकडचा आमदार असल्याने त्यांनी गोरेंना  मोठी ताकद आणि  स्थैर्यही दिले. त्यामुळे ते त्यांची त्यावेळी नेहमी स्तुती करत. अगदी माण तालुक्यात बांधलेल्या बंधाऱ्यांनाही त्यांनी पृथ्वी बंधारेह्ण असे गोंडस नावही दिले होते. पुढे गोरे भाजपवासी झाले. गेल्याच आठवडय़ात फडणवीस यांनी कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द केला. त्यावर जनतेच्या रेटय़ामुळे आणि मागणीमुळे भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी सरकारला कंत्राटी भरतीचा निर्णय मागे घ्यावा लागला, असा दावा पृथ्वीराजबाबांनी केला. लगेचच गोरे यांनी पत्रकार परिषद घेत चव्हाण यांच्यासारख्या सुसंस्कृत व्यक्तीने असे विधान केल्यामुळे त्यांच्या असलेल्या विश्वासाला तडा गेल्याचा आरोप केला. कोणे एकेकाळी पृथ्वीराजबाबांचे किती कोडकौतुक करणारे हेच का ते गोरे, असा प्रश्न नागरिकांना पडला.

Bandi Sanjay Kumar interview
“लोकसभा निवडणूक IPLसारखीच अन् काँग्रेसकडे कर्णधार नाही,” भाजपाचा हल्लाबोल
Pimpri, eknath shinde, eknath shinde latest news,
पिंपरी: मुख्यमंत्री आले अन् काहीही न बोलता निघून गेले…
Balasaheb Thorat, Amar Kale, wardha,
माजी मंत्री मामा आहेच, आता माजी मंत्री असलेले मामसासरेही जावयाच्या दिमतीस, कोण हे उमेदवार?
odisha assembly elections BJD chief Naveen Patnaik chosen to contest from two seats
ओडिशाचे मुख्यमंत्री दोन जागांवर लढवणार निवडणूक; काय आहेत डावपेच?

आशीर्वाद कसा मिळणार ?

गणेशोत्सवाबरोबरच नवरात्रही जोरदारपणे साजरी होते.  अशा उत्सवाच्या प्रसंगी राजकारणी मंडळींची हजेरी हमखास ठरलेलीच असते. मंडळाच्या खर्चाचा आर्थिक भार हलका करण्यासाठी राजकीय कार्यकर्त्यांची उत्सवाच्या ठिकाणी आरतीही महत्त्वाची ठरते.  कार्यकर्त्यांच्या हस्ते आरतीचे नियोजनही करण्यात येते. प्रचाराची नामी संधी समजून प्रसंगी खिशाचा अल्पसा भार हलका करून राजकीय मंडळी या आरतीला हजर राहतात. यंदा मात्र, निवडणुकीचा हंगाम असल्याने राजकीय कार्यकर्त्यांच्या नियोजित दौऱ्यामध्ये मंडळांच्या आरतीचाही समावेश करण्यात आला होता. मात्र, बदलत्या राजकीय मांडणीमध्ये एका वजनदार नेत्यांना मंडळांकडूनच आमच्या मंडळाची आरती नुकतीच झाली आहे, पुढच्यावेळी नक्की या असे सांगण्यात आले. आता खिशाचा भार हलका होण्यापासून वाचला म्हणून समाधान मानायचे तर अगोदरच वर्गणीचे पाकीट कार्यकर्त्यांकडे पोहचलेले. आता   देवीचा आशीर्वाद कसा मिळणार याचीच चिंता लागली आहे. 

आंदोलनातून नसती आफत

मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सध्या तर गावोगावी आंदोलने सुरू आहेत. इचलकरंजी येथेही सोमवारी सकल मराठा समाजाचे आंदोलन सुरू होते. अराजकीय स्वरूपाचे हे आंदोलन होते. राजकीय बाधा होईल असे काही करायचे नाही हे आधीच सर्वानुमते ठरलेले. अशातच आंदोलन स्थळापासून एक एसटी निघाली होती. त्यावर पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या प्रतिमा आणि शासकीय योजनांची माहिती देणारी जाहिरात होती. एसटी पाहून भाजपविरोधातील काही उत्साही कार्यकर्ते अचानक तिकडे धावले. हातातील रंग एसटीवरील जाहिरातीवर मारण्याचा प्रयत्न मनसेह्ण झाला. इतक्यात पोलीस आणि कार्यकर्ते धावले. त्यांनी हा प्रयत्न तातडीने थांबवला. याचा दुसरा अंक सुरू झाला. आंदोलनात सहभाग असलेले भाजपचे जिल्हा महानगर अध्यक्ष पै. अमृत भोसले यांची गोची झाली. त्यावरून त्यांची आणि रंग फासण्यास गेलेल्या कार्यकर्त्यांत आंदोलनस्थळी वादावादी झाली. या प्रकाराबद्दल पक्ष नेतृत्वाला खुलासा करता करता तालमीतून तयार झालेल्या या बलदंड व्यक्तिमत्त्वाची पुरती दमछाक झाली.

(संकलन : सुहास सरदेशमुख, दयानंद लिपारे, विश्वास पवार, दिगंबर शिंदे)