scorecardresearch

चावडी: मशालीची धग कुणाला?

आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे नेते मोर्चेबांधणी करू लागले आहेत.

chavdi
चावडी: मशालीची धग कुणाला?

आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे नेते मोर्चेबांधणी करू लागले आहेत. रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू किरण सामंत हेही या रिंगणात उतरण्याच्या मन:स्थितीत आहेत. स्वत: मंत्री सामंत यांनी तसे सूतोवाच वारंवार केले आहे. त्यातच गेल्या आठवडय़ात किरण सामंत यांनी आपल्या व्हॉट्सअ‍ॅपच्या स्टेटसवर मशाल पाजळल्याने खळबळ माजली. कारण सध्या ठाकरे गटाचे मशाल निवडणूक चिन्ह आहे. जोडीला, जो होगा वो देखा जाएगा!ही टॅगलाइन. थोडय़ाच वेळात त्यांनी तो काढून टाकला. पण तोपर्यंत त्यांना अपेक्षित गोंधळ उडालेला होता. या प्रकाराबाबत सामंत यांनी, जोरदार फटकेबाजी करत संबंधित भंपकांह्णना जागा दाखवण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांचे त्यांनी नाव घेतले नाही. पण राज्यात सत्तेच्या केंद्रस्थानी असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांबद्दल आदर व्यक्त करताना, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नावसुद्धा घेतले नाही. त्यामुळे हा रोख त्यांच्यावर असावा, अशी नंतर चर्चा सुरू झाली आणि राजकीय वर्तुळातून तशी पुष्टीही मिळाली आहे.

सामंत बंधूंचे राजकारण मुख्यत: रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यांपुरते असताना आता किरण सामंत यांनी थेट अजितदादांना का भिडावे, असा प्रश्न साहजिक आहे. पण त्याचे मूळ अजित पवारांच्या कार्यपद्धतीमध्ये आहे.

Tejasvi Surya commented on INDIA
“हे तर साप अन्…”, भाजपा खासदाराची ‘इंडिया’ आघाडीवर टीका
Madhya Pradesh assembly election
विश्लेषण : मध्य प्रदेशात भाजपचे ज्येष्ठ नेते रिंगणात; शिवराजसिंह चौहान अस्वस्थ?
mayawati appeal party workers for bsp party strength
ना ‘रालोआ’, ना ‘इंडिया’, बसपची ताकद वाढवा! मायावती यांचे पक्ष कार्यकर्त्यांना आवाहन
mallikarjun kharge bjp flag
हिंसाचाराच्या आगीत भाजपकडून तेल -खरगे; काँग्रेस कार्यकारी समिती बैठकीत निवडणुकांसंदर्भात विचारमंथन

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना अजितदादांकडे अर्थ खाते होते. त्याचा वापर त्यांनी मुख्यत: राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री- आमदारांसाठी केल्याची सार्वत्रिक तक्रार होती. आता महायुतीमध्ये सहभागी झाल्यानंतरही अजित पवारांचे तेच उद्योग चालू असल्याची तक्रार सत्ताधारी गोटात होऊ लागली आहे. पण सतत गुरगुरत राहणाऱ्या दादांना कोण सांगणार, अशी स्थिती आहे. म्हणून अखेर किरण सामंतांनी पारंपरिक पद्धतीने मशाल पेटवून इशारा दिला असल्याचे बोलले जात आहे. आता या मशालीची धग दादांपर्यंत पोहोचणार का, हे बघायचे.

 तुमचा पक्ष तुमची जबाबदारी!

कोल्हापुरातील शेतकरी संघाचा इतिहास वैभवशाली. संघात राजकारण शिरले आणि पतन सुरू झाले. परिस्थिती पाहून राज्य शासनाने अशासकीय प्राधिकृत मंडळाची नियुक्ती केली. अर्थात हाही राजकीयच निर्णय. पण बरे झाले. तेव्हापासून का असेना कारभार काहीसा सुधारतो आहे. नवरात्रीत महालक्ष्मी मंदिराच्या शेजारी असलेली शेतकरी संघाची तीन मजली वास्तू गर्दीच्या नियोजनासाठी जिल्हा प्रशासनाने रातोरात ताब्यात घेतली आहे. पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या आदेशाने जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती अधिनियमाचा वापर करून तातडीने कुलपे तोडून इमारत ताब्यात घेतली, असा आरोप करीत विरोधकांनी मोर्चे, आंदोलन आरंभले आहे. साहजिकच शेतकरी संघाच्या एका कार्यक्रमात हा प्रश्न मांडून शेतकरी संघाची वास्तू वाचवण्याचे साकडे प्रमुख अतिथी वैद्यकीय शिक्षणमंत्री मुश्रीफ यांना घातले गेले. मुश्रीफ तसे पैलवान. त्यांनी हा मुद्दा काही अंगाला लावून घेतला नाही. उलट त्यांनीच उपस्थित अन्य पाहुण्यांचा राजकीय संदर्भ देत कर्तव्याची जाणीव करून दिली. पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, प्राधिकृत मंडळाचे अध्यक्ष सुरेश देसाई हे सारेच मुख्यमंत्री शिंदे गटाचे. असे असताना कुलूप तोडण्याचे धाडस होतेच कसे? असे म्हणत मुश्रीफ यांनी तुमचा पक्ष तुमची जबाबदारी! जे काही घडते आहे ते तुमचे तुम्हीच पाहून घ्या, असे संकेत देऊन जबाबदारी शिंदे सेनेवर ढकलून या वादातून सहीसलामत बचाव केला.

फलटणच्या निंबाळकरांचे पायात पाय..

साताऱ्यातील फलटणला श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले. आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर जोरदार टीका केली. त्या दोघांमध्ये कायम दंद्वयुद्ध सुरू असते. दोघेही एकमेकांवर जिव्हारी लागणारी टीका करत असतात. साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत बोलताना रामराजे म्हणाले, आमचा कारखाना आता कर्जमुक्त झाला आहे. आमचे काम व कारखाना बघवत नाही त्यांनी आमच्या पायात पाय घालण्याचा प्रयत्न करू नये. जो पायात पाय घालण्याचा प्रयत्न करेल. त्याचा पाय निघेल, असा इशारा रामराजेंनी खासदार निंबाळकर यांना दिला. त्यावर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, तुमची मस्ती जिरवायची वेळ आणू नका, अन्यथा फलटणची जनता तुम्हाला माणसात ठेवणार नाही.

युवराजांच्या आमदारकीसाठी?

सांगलीचे जिल्हाधिकारी कार्यालय म्हणजे नेहमीचेच आंदोलनाचे ठिकाण. वेगवेगळे राजकीय पक्ष, संघटना आपल्या मागण्यांसाठी या ठिकाणी आंदोलन करीत असतात. महात्मा गांधींनी सत्तेविरुद्ध लढा देण्यासाठी उपोषण, सत्याग्रह ही आंदोलनाची हत्यारे दिली. याच गांधी जयंतीदिनी सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक आंदोलन सुरू झाले. मात्र, आंदोलनासाठी उभारण्यात आलेला शामियाना, शामियान्यामधील आलिशान बैठक व्यवस्था, ऐन पावसाळी वातावरणात उन्हाचे चटके बसू नयेत यासाठी पंख्यांची करण्यात आलेली व्यवस्था पाहता करण्यात आलेली व्यवस्था कोणा तरी युवराजाच्या लग्नासाठीच आहे का, अशी शंका आली नसती तर नवल नाही.

मात्र, हा सारा खटाटोप होता तो केवळ युवराजाच्या आमदारकीसाठीच. आणि यासाठी शामियान्यात छायाचित्रे लावण्यात आली होती, आधुनिक गाडगेबाबा म्हणून ख्यातनाम झालेले आबा आणि महात्मा गांधी यांची  .आता हा सारा लोकशाहीतील संस्थान राखण्याचा इव्हेंट होता आणि तोही तासगाव-कवठेमहांकाळच्या पाठपोट एकच झालेल्या दुष्काळग्रस्तांसाठीच.

(सहभाग : दिगंबर शिंदे, सतीश कामत, दयानंद लिपारे, विश्वास पवार)

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chawdi upcoming lok sabha elections guardian minister uday samant mahavikas aghadi govt amy

First published on: 03-10-2023 at 02:41 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×