आधी पाकिस्तानशी शेजारधर्माची भाषा, शरीफ यांच्या नातवाच्या लग्नासाठी त्या देशास अनियोजित भेट.. आणि लहानमोठय़ा कुरापतींकडे काणाडोळा.. मग पठाणकोट, उरी हल्ल्यांनंतर अखेर सर्जिकल स्ट्राइक’.. हा प्रवास भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ता म्हणून कसा दिसतो, हे सांगणारी नोंद..

भारतास आजवर एक ‘सॉफ्ट स्टेट’ म्हणजे उदार लोकशाही म्हणून पाहिले जात होते. असे सॉफ्ट स्टेट असणे ही मुळात वाईट बाब नव्हेच. पण पाकिस्तानने ही बाब म्हणजे भारताचा कमकुवतपणा समजून, भारतात दहशतवादी हल्ले वाटेल तसे सुरू केले होते. नेहमीच एक छुपे युद्ध पाकिस्तान लढत होता. सन १९७८ च्या नंतर हा खेळ अव्याहत चालू होता. आधी पंजाबात आणि नंतर काश्मीरमध्ये त्या देशाने भारताची चिंता भरपूर वाढवली. आणि भारत काहीच करू शकत नव्हता. प्रत्येक दहशतवादी हल्ल्याच्या नंतर भारतीय शासकांनी काही धमकी द्यावी आणि पाकिस्ताननेही ती पोकळच समजावी, असे चालले होते. या प्रकारे थोडय़ाच दिवसांत पुन्हा शांतता आली, असे होई. आधीचे पाकिस्तानी राज्यकर्ते या घटनांवर काही टिपे तरी गाळत, अफसोस वाटत असल्याचे जाहीर करीत; परंतु अलीकडे तर या हल्ल्यांना खुले समर्थन देण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. ज्या प्रकारे बुरहानुद्दीन वानी याच्या मृत्यूनंतर त्यांनी अश्रू ढाळले आणि हा मुद्दा संयुक्त राष्ट्रांपर्यंत नेण्याचा आटापिटा केला, ते सारे जगाने चक्रावून जावे असेच होते. अखेर कोणाही देशाने आपल्या शेजारी देशाला अशा प्रकारे किती काळ सहन करायचे. यामुळे २९ सप्टेंबरच्या रात्री जगाला दाखवून दिले की, आता भारत सॉफ्ट स्टेट राहिलेला नाही. पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी आल्यानंतर देशाच्या प्रतिमेत हे क्रांतिकारी परिवर्तन झालेले आहे.

या सर्जिकल स्ट्राइकमुळे देशात एकीकडे उत्सवी वातावरण आहे, आम जनमानस दीर्घकाळापासून ज्या प्रकारच्या कारवाईची वाटच पाहात होते; त्याच वेळी काँग्रेससहित काही विरोधी पक्ष याकडे राजकारणातील नफा आणि नुकसानाच्या नजरेने पाहात आहेत. विरोधी पक्षीय नेत्यांच्या वक्तव्यांतून सैन्याच्या शौर्याचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न व मनोबल खच्ची करण्यासारखे होते आहे हे दु:खद आहे.

श्री. नरेंद्र मोदी यांनी मे २०१४ मध्ये जेव्हा सत्तासूत्रे हाती घेतली, तेव्हा त्यांना पाकिस्तानच्या या चालचलणुकीची चांगलीच माहिती होती. तरीदेखील त्यांना वाटले की शेजाऱ्याशी शेजारधर्मानेच वागले पाहिजे. म्हणून त्यांनी आपल्या शपथविधी सोहळ्यास दक्षिण आशियातील सर्व सरकारप्रमुखांसह पाकिस्तानच्या पंतप्रधानांनाही बोलावले. त्यांच्याशी बातचीत केली आणि नियतीने आपल्याला शेजारी बनवले आहे त्यामुळे आपण चांगल्या शेजाऱ्यांप्रमाणेच राहिले पाहिजे, ही जाणीव दिली. या शेजारधर्माची अभिव्यक्ती करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी एकही संधी सोडली नाही. त्या देशाकडून होणाऱ्या लहानमोठय़ा कुरापतींकडे प्रसंगी त्यांनी काणाडोळा केला. दहशतवादी भारताविरुद्ध विष फैलावत राहिले तरीही नवाज शरीफ गप्पच होते. परंतु मोदी यांनी संवादाची एकही संधी चुकवली नव्हती. इतके की, नवाज शरीफ यांच्या नातवाच्या विवाहासाठी ते अचानक पाकिस्तानलाही गेले. इतिहासात असे कोणतेही उदाहरण मिळणार नाही, जेथे एखादा सरकारप्रमुख आपल्या शत्रुराष्ट्राशी असे वागला होता. तरीही पाकिस्तानी राज्यकर्ते मात्र भूतकाळाच्या चष्म्यातूनच भारताकडे पाहात राहिले. ते ही बाब विसरले की, या वेळी भारतात नरेंद्र मोदी यांची सत्ता आहे, जे सत्तेत आल्यापासून लगोलग जगभरात निव्वळ एकच अजेंडा घेऊन धावपळ करीत आहेत.. तो म्हणजे दहशतवादाचा अंत.

पाकिस्तानची फूस असल्याने दहशतवादी लागोपाठ भारताला भडकावणारी कृत्ये करीत राहिले. लाहोरभेटीनंतर अचानक पठाणकोटमध्ये भारतीय सैन्याच्या ठिकाणावरच हल्ला करण्यात आला. भारताने या घटनेबद्दल हरप्रकारचे पुरावे पाकिस्तानला उपलब्ध करून दिले. इतके की, पाकिस्तानी तपासपथकालाही पठाणकोटला येण्याचे निमंत्रण दिले. भारताच्या सहनशीलतेला पाकिस्तान मात्र भारताचा कमकुवतपणा समजत राहिला. आपल्याच घरात बसलेल्या दहशतवाद्यांविरुद्ध त्याने कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. तो देश भारतीय पुरावे खोटे असल्याचे सांगत खिल्ली उडवत राहिला. हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुरहानुद्दीन वानी हा मारला गेल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड झाल्याचे स्पष्टच बाहेर आले, तेव्हा मात्र हद्दच झाली. स्वत: नवाज शरीफ संयुक्त राष्ट्रसंघात पोपटाप्रमाणे दहशतवाद्यांनी ठरवल्याप्रमाणेच बोलत सुटले आणि त्यातच बुरहान वानी याला त्यांनी शहीद ठरविले.

त्यानंतर उरी क्षेत्रातील सीमेवर रात्री झोपलेल्या भारतीय जवानांच्या तंबूंवर हल्ला चढवून १८ जवानांचे प्राण घेण्यात आले, ही तर नीचपणाची पराकोटीच होती. पाकिस्तानकडून केवळ काश्मीरमधील फुटिरांनाच विविध प्रकारची मदत दिली जात होती एवढेच नव्हे, तर सीमेच्या पलीकडून दहशतवाद्यांना भारतात घुसवून चकमकी घडवून आणण्याची कारस्थानेही रचली जात होती. ते आदल्या एक महिन्यापासून दररोज सीमेवरील शस्त्रसंधीचे (सीझफायर) उल्लंघन करून हल्ले घडवीत होते. म्हणूनच भारताला वाटले की, आता तर पाकिस्तानी छुप्या युद्धाचे ‘ऑपरेशन’ करावेच लागेल.

उरी येथील हल्ल्यानंतर तातडीने संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी सांगितले होते की, उरी येथील हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. फक्त पंतप्रधानांच्या आदेशाचीच वाट पाहिली जाते आहे. पंतप्रधान मोदी यांनीदेखील भाजपच्या कोझिकोड येथील मेळाव्यात पाकिस्तानला उद्देशून थेट शब्दांत सांगितले की, शहिदांच्या बलिदानाचा बदला घेतला जाईल. आणि जेव्हा जेव्हा भारतीय सेनेच्या जवानांनी टिपून-टिपून दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण शिबिरांवर सर्जिकल स्ट्राइक्सने लक्ष्यभेद केला, तेव्हापासून तर पाकिस्तानी राज्यकर्ते जणू चळलेच आहेत. त्यांची वक्तव्ये दिवसागणिक बदलू लागली आहेत. कधी म्हणतात, हल्ला तर झालेलाच नाही, कधी म्हणतात- आम्हीच भारतीय सैनिकांना मारून टाकले. आणि कधी कधी या हल्ल्याचे प्रत्युत्तर अणुबॉम्बने देण्याची भाषाही ते करत आहेत.

वास्तव हे आहे की मोदी यांची मेहनत आणि मोदी यांचे नियोजन यांच्यासमोर पाकिस्तानचा हा आटापिटा कस्पटासमान उडून जाणारा ठरेल. आदल्या दोन वर्षांत मोदी यांनी जेवढी मेहनत केली आहे, जगभरात भारताची प्रतिमा सुधारली आहे आणि मित्र मिळविले आहेत, त्या तुलनेत नवाज शरीफ खुजेच दिसू लागले आहेत. आज पाकिस्तानच्या परंपरागत मित्रांनीदेखील त्या देशाची साथ सोडून दिली आहे. अमेरिका त्या देशाच्या साथीला नाही. त्यांचा चीनसारखा मित्रदेखील काही बोलू शकत नाही. अफगाणिस्तान हा पाकिस्तानच्या विरोधात ठामपणे उभा आहे, बांगलादेशही सामोरा फिरून त्याच्या विरुद्ध आहे. श्रीलंकादेखील विरोधातच आहे, इराण हा पाकिस्तानला साथ देत नाही. संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया आणि बाकीचे मुस्लीम देशसुद्धा पाकिस्तानचे समर्थन करत नाहीत, अशी स्थिती आहे.

याआधी जेव्हा केव्हा सीमेवर तणावाची स्थिती उद्भवत असे तेव्हा जगभरातील देशांच्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात करीत, परंतु आज पाकिस्तानात घुसून कार्यवाही केल्यानंतरसुद्धा सर्व देशांकडून सकारात्मक वक्तव्येच येत आहेत. जेव्हा मोदीजी सर्व जगात संबंधांचा विस्तार करीत होते, तेव्हा देशातील काही लोक प्रश्न विचारू लागले होते. आज संपूर्ण देशात उत्सवाचे वातावरण आहे, देशवासी मान्य करीत आहेत की देशगौरवाला अनुरूप असेच काम झालेले आहे. इतके की, सर्वच्या सर्व विरोधी पक्षांनी यासाठी नरेंद्र मोदी यांच्या साहसाचे कौतुकच केलेले आहे. यातून हेच स्पष्ट होते की, मोदी यांची लोकप्रियता कशा प्रकारे चरमबिंदूपर्यंत वाढू लागली आहे. अर्थातच, या साऱ्यातून मोदी यांच्याप्रमाणेच साऱ्या देशाची इभ्रत आणि प्रतिष्ठादेखील एका नव्या उंचीवर पोहोचली आहे. आता खरोखरच भारताने नव्या युगात पाऊल टाकलेले आहे. ते आहे- मोदीयुग.

लेखक  भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते म्हणून कार्यरत आहेत .