|| प्रताप भानू मेहता

पाकिस्तान नावाची प्रवृत्ती ठेचली जायला हवी, तिची सुरुवात स्वत:पासून करण्याची वेळ आली आहे..

पुलवामा येथील घटनेनंतर भारतात घुसमट दिसून येते. तिचे वर्णन अगदी ढोबळपणे करायचे तर, पाकिस्तानची सरशी तर झालेली नाही ना, असा घोर लागलेला दिसतो. पाकिस्तानविषयीचा राग हा योग्यच आहे. पण भारतात आताच्या घडीला जो काही भावनोद्रेक घडतो आहे तो सात्त्विक संतापाचा असण्यापेक्षा आत्मवंचनेचा, स्वत:विषयीच्या रागाचा असल्याप्रमाणे दिसतो; कारण समस्येवरील उपाय शोधण्याऐवजी येथे समस्येबद्दल दोषी कोण हे शोधले जाते आहे. आपल्या जवानांनी प्राण गमावले एवढीच पुलवामाची शोकांतिका नसून, त्यानंतर आपण पाकिस्तानच्या सरशीचे किल्मिष मनात दाटून आल्यासारखे वागू लागलो, हीदेखील आहे.

पाकिस्तानची सरशी असे शब्द मी वापरतो आहे कारण हिंसाचार घडवणाऱ्यांना जेव्हा काहीच शिक्षा न देता उलट पाठीशी घातले जाते, तेव्हा असे- पाठीशी घालणाऱ्यांचीच सरशी झाल्याचे- किल्मिष मनात येते. पाकिस्तानवर कितीही आंतरराष्ट्रीय दबाव आणा, कितीही राजनैतिक पावले उचला, अगदी ‘सर्जिकल स्ट्राइक’ करा, पाकिस्तानची वर्तणूक काही बदलत नाही. बरे, दहशतवादाची दलदल अशी की, अमेरिकेसारख्या महासत्ताही अफगाणिस्तानात दिङ्मूढ झाल्या. ही समस्याच अशी की, तीवर तातडीचे उत्तर नाही.

पाकिस्तानची सरशी झाल्याचे किल्मिष मनात येत असल्यास त्यामागे अन्य कारणही आहे. असल्या हिंसेचा प्रतिकार करणे हा आपला हक्क आहेच, नव्हे ते आपले कर्तव्यच मानले पाहिजे. परंतु लोकभावना शांत करण्याच्या उपायांपेक्षा व्यापक अशी जरब आपण बसवू शकलेलो नाही, हे खरे आहे. अप्रत्यक्ष युद्धाचा बीमोड करण्याइतपत चोख गुप्तचर किंवा गुप्तवार्ता यंत्रणा, गोपनीय मोहिमा, त्यासाठीची तंत्रज्ञान-क्षमता हे सारे आपण उभारू शकलेलो नाही. अशी क्षमता उभारणे हे मनात आले आणि केले इतके सोपे नसते. त्यासाठी धीर ठेवून वर्षांनुवर्षे राष्ट्रउभारणी करावी लागते. जेथे मूलभूत संरक्षणविषयक करारदेखील धडपणे होत नाहीत अशा देशांसाठी तर हे अधिकच कठीण असते. ‘भारताने (किंवा भारतातल्या उदारमतवादय़ांनी) संरक्षणाचा कधी विचारच केला नाही,’ वगैरे टीका भंपकच ठरेल, कारण विचार आजवर झालेला आहे आणि तो प्रगतही आहे. त्याहून अधिक खरे हे की, हा विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी पैशाचा विनियोग केला गेला नाही.

काश्मीरमध्ये फुटीरतावादाची विषवल्ली वाढली ही वस्तुस्थिती आहे आणि काश्मीरचे दुरावलेपण सर्वव्यापी ठरते आहे. ‘भ्याड पाकिस्तानी फौजांचे वर्दीधारी म्होरके बिनावर्दीतल्या तरुणांना हाताशी धरतात, घुसखोरी करवून हिंसाचार घडवतात, पण आपल्याशी प्रत्यक्ष युद्धात ते कदापिही जिंकू शकत नाहीत,’ असे स्पष्टपणे म्हटल्यावर आपल्याला बरे वाटते. पण आपल्या ऊरबडव्या नेत्यांना खरीखुरी शांतता प्रस्थापित करणे क्वचितच जमू शकेल, हेदेखील स्पष्ट नाही का? काश्मिरींवर राग काढणे आपल्यासाठी सोपे आहे; मात्र गेल्या पाच वर्षांत काश्मीरची स्थिती अतिशय बिघडल्याचे सत्य मान्य करणे आपल्याला फारच जड जाते. अटलबिहारी वाजपेयींपासून पुढे मनमोहन सिंग यांच्या काळातही आपण काश्मिरात जे काही अलवार लाभ मिळवलेले होते, ते काही तरी शौर्यपराक्रम गाजवल्याचे समाधान मानणाऱ्यांमुळे सारे ओसरून गेले आहेत.

आपल्या प्रतिक्रियांमधून आपण पाकिस्तानचेच कसे अनुकरण करतो आहोत हे दिसू लागले, तर सरशी पाकिस्तानची झाली असे म्हणावे लागेल. या प्रवृत्ती आपल्याकडे आधी नव्हत्याच असे नव्हे, पण त्यांचा प्रचार-प्रसार वाढलेला दिसतो. नागरिकत्व आणि राजकीय अधिकार यांना धार्मिक ओळखीच्या खुंटय़ास बांधणे हा पाकिस्तानचा आवडीचा खेळ. परंतु तोच खेळ खेळू पाहणारे, तसलीच भाषा (धर्मद्रोही ठरवणे, धर्माधारित ओळख हा शिक्का मारणे, विरोधी बोलणारा राष्ट्रवादी नसल्याचे जाहीर करण्याचा कोतेपणा आदी प्रकारांतून) वापरणारे भारतीय राजकारणीदेखील हल्ली अधिक प्रमाणात दिसू लागलेले आहेत. भारतातील काही डाव्या गटांना असेही वाटू लागलेले आहे की, या असल्या विखारी राष्ट्रवादाचा फैलाव रोखण्यासाठी जालीम उपाय म्हणून आता, लहान-लहान (वांशिक/ भाषक) गटांचे राष्ट्रवाद तीव्र होतील की काय?

एखाद्याची जातीय/ धार्मिक/ भाषिक ओळख सांगितली की मग बाकी काहीच सांगितले नाही तरी भागेल, अशी संस्कृती निर्माण करू लागलो आहोत आपण. आता तर, सैनिकसुद्धा कोणत्या जातीचे हे पाहिले जाऊ लागले आहे. अशा वातावरणात अमुक गटातले सगळे एकसारखेच मानणे सोपे ठरते, मग एखाद्या अख्ख्या समूहालाच अपराधी मानणे आणि त्यांचा सामूहिकरीत्या फैसला करून टाकणे हे विघटनवादी प्रकारही वाढतात. अस्मितांचे असल्या प्रकारे स्तोम माजवण्यातूनच पाकिस्तान-निर्मितीचा प्रवास झाला होता. आपण स्वातंत्र्य अंगीकारण्याऐवजी, पुन्हा तसेच स्तोम माजवू पाहतो आहोत.

आपल्या लढाईत आपण एकटे पडू लागलो आहोत, हेही पाकिस्तानच्या सरशीचे लक्षण म्हणावे लागेल. अर्थात, अन्य देशांनी आपले ऐकावे यासाठी मुरब्बीपणे पावले टाकावी लागतात. पाकिस्तानच्या शत्रू-देशांप्रमाणेच, पाकिस्तानच्या ज्ञात मित्र-देशांनाही आपण जवळपास ठेवणे आवश्यक ठरते. पण वस्तुस्थिती अशी की, आपण भूराजकीय परिस्थितीवरच भिस्त ठेवतो. एक तर, जगच भारत-पाकिस्तानमधील दुहीला खतपाणी घालण्यातून आपापले हितसंबंध साधून घेणारे. आणि मुळात ही अतार्किक तेढ ज्या मानसिक गंडांमुळे आहे, त्यांवर इलाज करणे सोडाच- त्यांची उकल करणे तरी कुणा परक्या सत्तेला जमेल का?

आपल्या सार्वजनिक जीवनातील सुसंस्कृतता लोप पावू लागली आहे, हेही पाकिस्तानच्या सरशीचेच एक लक्षण मानावे लागेल. हिंसक दहशतवादय़ांना मूक पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानी सत्तेचे प्रतिबिंब आता आपल्याही सार्वजनिक संस्कृतीत, ‘रक्षकां’बद्दल मौन पाळणाऱ्या सत्तेमुळे दिसू लागले आहे. पाकिस्तानची सार्वजनिक संस्कृती तर कधीपासूनचीच, त्या देशाच्या अशक्यप्राय भवितव्याच्या दावणीला बांधली गेली आहे. सत्ताशक्तीबद्दल अवाच्या सवा दावे करत राहणे, परिस्थितीची पुरेशी शहानिशाच न करणे आणि दोषाचे खापर कुणावर तरी फोडत राहणे हे अवगुण आता आपल्याकडेही दिसू लागल्यामुळे आपणदेखील त्याच अशक्यप्रायतेकडे वाटचाल करू लागलो आहोत. आजही अनेक भारतीय विचारी, विवेकीच आहेत हे खरे असेल, पण या विवेकी लोकांकडे काही शक्ती उरलेली आहे का? आजच्या भारतातल्या शक्तीचे प्रतीक ठरणारे चेहरे आहेत ते अमित शहा आणि तथागत रॉय यांचे.

तेव्हा, पुलवामानंतरची आपली घुसमट ही केवळ आपण पाकिस्तानवरील आपला सात्त्विक संताप व्यक्त करू शकत नसल्याचीच आहे असे नव्हे. सखोल विचार केल्यास पाकिस्तानची सरशी आपण होऊ दिली आहे हे उमगण्यातून आपली घुसमट अधिक होते आहे. पुलवामाच्या घटनेचे काहीएक प्रत्युत्तर निश्चितपणे दिले जाईल. पण त्यात आपण मिळवलेले यश हा अंतिम विजय नव्हे. आपण १९७१ साली युद्ध जिंकले आणि शांतता गमावली. आंतरराष्ट्रीय पाठिंबा भारताच्या बाजूने भक्कम आहे, हे निश्चितच. तरीही त्यामुळे पाकिस्तानचे उपद्व्याप फार तर निराळ्या प्रकारे होत राहतील, ते पूर्णत: थांबतील असे नाही. भारताकडील नैतिक भांडवल पाकिस्तानपेक्षा निश्चितच जास्त आहे. पण आपल्याकडे ते भांडवल उधळून टाकू पाहणारे राजकारणीही अनेक आहेत. भारताकडे पाकिस्तानपेक्षा अधिक सबुरी, अधिक धीर आहे हे निश्चितच. परंतु या सबुरीचा वापर आपल्या क्षमता वाढविण्यासाठी आपण केलेला नाही, हे आपले महापापच म्हटले पाहिजे.

या साऱ्याचा परिणाम म्हणजे स्वत:वरच राग काढणारी, आत्मवंचनाच करणारी प्रवृत्ती. उजव्या गटांना त्यांच्या स्व-घातक विचारव्यूहाची आणि त्यातून होणाऱ्या कारवायांची कबुली द्यायची नसल्यामुळे त्यांनी काश्मिरींवर, मुस्लिमांवर, पत्रकारांवर आणि अन्य काही विरोधकांवर ‘देशविरोधी’ असा शिक्का मारणे आरंभले आहे. ऊरबडवे मोदी हे दोलायमान नेहरूंपेक्षा चांगले काम करतील, असा प्रचार- खोटा का असेना- या गटांना पुढे न्यायचा आहे. आणि डावे? ते तर नेहमीच, त्यांच्या वेळोवेळच्या भूमिका या खरोखरच तात्त्विक होत्या की सततची असमर्थता आणि सत्त्वहीनता झाकण्यासाठीचे ते तर्कट होते, अशा अस्वस्थतेत बुडालेले असतात. म्हणजे दोन्ही बाजूंनी आपण बद्ध, बंदिस्त.

खरे सांगायचे तर, पाकिस्तानला हरविणे, पाकिस्तानला नमविणे हे केवळ पाकिस्तानच्या राजकीय-लष्करी सत्तेला हरविणे नव्हे. त्याने आपलेही नुकसान होईल. त्याऐवजी पाकिस्तानच्या राजकीय-लष्करी सत्तेमुळेच पाकिस्तानचे नुकसान कसे होणार आहे, यावरही विश्वास ठेवता येईलच. खरे सांगायचे तर, पाकिस्तान ही जी प्रवृत्ती आहे, ती ठेचली जायला हवी. पुलवामानंतरची ती घुसमट, तो घोर हे सारे पाकिस्तानने आपल्यासुद्धा प्रवृत्तींमध्ये शिरकाव केल्याचे लक्षण आहे.. यालाच मी ‘पाकिस्तानची सरशी’ म्हटले आहे.

लेखक अशोक विद्यापीठाचे कुलगुरू असून ‘इंडियन एक्स्प्रेस’मध्ये २३ फेब्रुवारीस प्रकाशित झालेल्या इंग्रजी लेखातील मते त्यांची वैयक्तिक आहेत.