मे महिन्यामध्ये लोकसभेची निवडणूक झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने ३०३ जागा मिळवून बहुमत मिळवले. प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसला ५२ जागा मिळवता आल्या.

जलशक्ती मंत्रालय : नजीकच्या भविष्यात पाणी हा जगण्या-मरण्याचा प्रश्न बनू शकतो, हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने स्वतंत्र जलशक्ती मंत्रालयाची स्थापना केली. देशभर ‘नळ तिथे पाणी’ हे लक्ष्य पूर्ण करण्याचा निर्धार केंद्र सरकारने केला आहे. पिण्याच्या पाण्याच्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष दिले जाणार आहे.

महात्मा गांधीजींची दीडशेवी जयंती :  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची दीडशेवी जयंती केंद्रातील भाजपप्रणीत लोकशाही आघाडी सरकारने साजरी केली. गांधीविचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सत्ताधारी पक्षाने देशभर कार्यक्रम घेतले. याच वर्षी संविधान स्वीकृतीला ७० वर्षे पूर्ण झाली. संविधानातील लोकशाही मूल्यांच्या आधारावर भारताची वाटचाल सुरू राहील, याची ग्वाही केंद्र सरकारने संसदेतील विशेष कार्यक्रमात दिली.

कर्नाटकात कमळ मोहीम :  कर्नाटकमध्ये सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या भाजपने जनता दल (धर्मनिरपेक्ष) व काँग्रेसचे सरकार अल्पमतात आणण्यासाठी कमळ मोहीम राबवली. दोन्ही सत्ताधारी पक्षांच्या काही आमदारांनी बंडखोरी केल्याने आघाडी सरकार पडले. आमदारांना फोडण्यात यश आल्यानंतर बी. एस. येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा भाजपने सरकार स्थापन केले.