गांधीविचार रा. स्व. संघालाही कसा टाळता येत नाही, हे अलीकडच्या काही उदाहरणांतून दाखवून देणारा लेख..

आपण अगदी ताज्या घटनाक्रमापासून सुरुवात करू या. गांधींच्या खुनात संघाचा कसलाही सहभाग नव्हता, म्हणून संघावर तसा आरोप करण्यास संबंधितांना प्रतिबंध करावा याबद्दल रा. स्व. संघाने न्यायालयाचा दरवाजा ठोठावल्याची घटना अगदी ताजी आहे. भिवंडी सेशन्स कोर्टापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत सर्वत्र त्याचे पडसाद उमटले. या संदर्भात काँग्रेस, राहुल गांधी, सर्वोच्च न्यायालय व संघ यांच्या भूमिकांबद्दल विविध माध्यमांतून बरीच चर्चा झाली. संघाने गांधींचे एक पणतू कुलकर्णी यांना आपल्या बाजूने काँग्रेसवर हल्ला करण्यासाठी मदानात उतरविले, तर संघविरोधकांची बाजू गांधींच्या दुसऱ्या पणतूने- तुषार गांधी यांनी- उचलून धरली. त्यानंतर मा. गो. वैद्यांनी गांधींच्या मृत्यूनंतर संघाने १३ दिवस दुखवटा पाळला होता असे जाहीर केले. त्यावर ‘पेढे वाटून दुखवटा पाळता का?’ असा प्रतिप्रश्नही विचारण्यात आला. या सर्व गदारोळात एक प्रश्न कोणी विचारलाच नाही- गांधीहत्येशी आमचा काहीही संबंध नाही, आम्ही गांधींना प्रात:स्मरणीय मानतो, असे संघाला वारंवार सांगावेसे का वाटते? संघाला गांधीहत्या हे गर्हणीय कृत्य आहे असे खरोखर वाटते, की तसे दाखविणे हा संघाच्या रणनीतीचा भाग आहे, की ती त्यांची राजकीय अपरिहार्यता आहे?

What Priyanka Gandhi Said?
“माझ्या आईचं मंगळसूत्र या देशासाठी..”, प्रियांका गांधी यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना जोरदार प्रत्युत्तर
HM Shri Amit Shah Public Meeting in Akola
“संविधान बदलणार नाही,” अमित शाह यांचा पुनरुच्चार; म्हणाले, “एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण”
nagpur, Anurag Thakur, Criticizes Congress, india alliance leaders no trust, no trust on rahul gandhi, rahul gandhi s leadership, bjp, lok sabha 2024, nda, election 2024,
“राहुल गांधींवर जनतेचा विश्वास नाही,” अनुराग ठाकूर यांची टीका; म्हणाले, “काँग्रेसमध्ये…”
gourav vallabh Congress ex leader
‘सनातन विरोधी घोषणा देऊ शकत नाही’, काँग्रेसवर आरोप करून गौरव वल्लभ यांचा भाजपात प्रवेश

गांधीहत्येसाठी संघ प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या जबाबदार होता का, या चच्रेत न शिरताही वरील प्रश्नाचे उत्तर आपल्याला शोधता येईल. गांधीहत्येनंतर संघाच्या लोकांनी आनंद साजरा केला याची साक्ष खुद्द सरदार पटेल व विनोबा भावे यांनी दिली आहे. गांधींचे व्यक्तित्व व विचार याबद्दल संघाला किती प्रेम आहे हे संघविचारांशी जवळीक असलेल्या कोणत्याही व्यक्तीशी बोलल्याने किंवा तिचे लिखाण वाचल्याने आपल्याला कळू शकते. हिंदुत्ववादी शक्तींनी गांधींचा अपरिमित द्वेष केला व त्याची परिणती गांधींच्या खुनात झाली, हे आता निर्वविादपणे सिद्ध झाले आहे. संघ त्या प्रक्रियेच्या अंतिम रूपापासून स्वत:ला अलग करू पाहत आहे. पण नथुराम गोडसेच्या तत्त्वज्ञानापेक्षा आपला विचार कसा वेगळा आहे, हे संघाने आतापर्यंत कधीही स्पष्ट केलेले नाही. हिंदुत्ववाद्यांनी आपल्या संपूर्ण इतिहासात एकाच व्यक्तीवर गोळी झाडली, ती व्यक्ती म्हणजे गांधी. इंग्रज, अन्य भारतीय नेते, अगदी मुस्लीम राष्ट्रवादाचे सर्वात मोठे समर्थक बॅ. जिना यांना वगळून त्यांनी गांधींनाच का संपवले? सुप्रसिद्ध मनोविश्लेषक आशीष नंदी या प्रश्नाचे उत्तर देताना म्हणतात, Love is blind, but hatred makes your vision sharp.   गांधी कोण होते ते गांधीभक्तांना कधी कळले नाही, पुरोगाम्यांनी ते समजून घेण्याची तसदी घेतली नाही, पण गांधींच्या वैऱ्यांना गांधींच्या सामर्थ्यांची पुरेपूर कल्पना होती आणि म्हणूनच त्यांनी गांधींना संपविण्याचा निर्णय घेतला. गांधींकडे असे काय सामथ्र्य होते, ज्याचा धसका हिंदुत्ववादी शक्तींनी घेतला होता?

आपल्या देशात गेल्या शतकभरात जे राजकीय प्रवाह निर्माण झाले, त्यांत भारतीय परंपरा व संस्कृतीचा अभिमान बाळगणारे दोनच प्रवाह आहेत- हिंदुत्व आणि गांधीविचार. सर्व पुरोगाम्यांनी भारतीय परंपरा (तिच्यातील व्यामिश्रता लक्षात न घेता) सातत्याने व हिरिरीने नाकारली, त्याउलट हिंदुत्वाने परंपरेचे, त्यातील विषमता, शोषण व अंधश्रद्धा यांसकट सातत्याने समर्थन केले. यामुळे पुरोगामी मंडळी ही परमतधार्जणिी, पाश्चात्त्यांची वैचारिक गुलामगिरी मानणारी आहेत असा प्रचार करून सर्वसामान्य जनतेपासून त्यांना तोडणे हिंदुत्ववाद्यांना शक्य झाले. गांधींनी मूल्यविवेकाच्या निकषावर पारखून परंपरा स्वीकारली. कुठल्याही बंडखोरीचा आव न आणता त्यांनी परंपरा व संस्कृतीतील त्याज्य भाग नाकारला, पण त्यांतील योग्य भाग स्वीकारला. त्यांनी देवाधर्माची संगत सोडली नाही, पण त्यांच्या दृष्टीने धर्म म्हणजे नतिक मार्गाने केलेले आचरण व देव म्हणजे सद्गुण व उन्नत मूल्यांची परमावस्था. त्यांच्या रामराज्याची मुस्लिमांना दहशत वाटली नाही, कारण त्यांचा राम रहीमशी एकरूप झालेला होता. त्यांनी अंधश्रद्धा शब्द फारसा उच्चारला नाही, पण कलकत्त्यात जाऊनही (पशुबळी दिल्या जाणाऱ्या) काली मंदिरात मी जाणार नाही, हे म्हणण्याचे धारिष्टय़ त्यांच्याजवळ होते. त्यांनी कुणा बुवा- महाराज- महंताला कधी थारा दिला नाही की धर्माचरणाच्या बाह्य़ सोपस्कारांना आपल्या खासगी किंवा सार्वजनिक आयुष्यात जागा दिली नाही. अनेकदा त्यांनी परंपरेतल्या संज्ञा निवडून त्यांना नवा आशय बहाल केला. एवढेही करून वर ते स्वत:ला सनातनी हिंदू म्हणवून घेत. त्यामुळे असे झाले की गांधी जिवंत असेपर्यंत त्यांनी सांगितलेल्या व्यापक हिंदू धर्माची मोहिनी लोकांवर कायम राहिली व द्वेषावर आधारलेल्या संकुचित हिंदुत्वाला जनाधार मिळू शकला नाही. शिवाय गांधींसारखी योजकता व संघटनकौशल्य इतर कोणत्याही नेत्याजवळ नव्हते.

हिंदुसंघटन करताना संघाने धर्मातील अयोग्य बाबींशी संघर्ष करणे टाळले. प्रश्न जातिव्यवस्थेचा असो, स्त्री-स्वातंत्र्याचा असो की अंधश्रद्धेचा, संघाने नेहमीच परंपरेची साथ दिली, प्रस्थापितांना दुखवायचे टाळले; पण असे असूनही अस्पृश्यतेचा प्रश्न उचलणारे, स्त्रियांना माजघरातून थेट रस्त्यावरील लढय़ात उतरविणारे, समाजाला वेळीअवेळी चार गोष्टी सुनावणारे गांधी भारतीय जनमानसावर आपल्या व्यक्तित्व व विचारांचे गारूड करू शकले व आपल्याला मात्र भारतीय जनतेने जवळ केले नाही, हे शल्य संघाला विशेषत्वाने बोचत असले, तरी गांधींच्या सर्व तत्कालीन राजकीय विरोधकांचे ते दु:ख असणार यात शंका नाही.

गांधीविरोधकांपकी कम्युनिस्ट, आंबेडकरवादी, समाजवादी यांनी गांधींना वेळोवेळी कडाडून विरोध केला, पण द्वेषापोटी त्यांची हत्या करण्याचे कृत्य मात्र हिंदुत्ववादी शक्तींनीच केले. गांधी जिवंत असेपर्यंत हिंदूंवर अन्याय होत राहील असे त्यांना वाटले असणे शक्य आहे, पण त्यासाठी गांधींना संपविणे ही त्यांची फार मोठी चूक होती. कारण फाळणीच्या जखमा ओल्या असताना शांती व प्रेमाचे आवाहन करणाऱ्या गांधींचा अनेकांना राग आला असला तरी अखेरीस गांधी हा या देशाचा बाप होता व पितृहत्या या पापाला भारतीय परंपरेत अजिबात स्थान नाही आणि म्हणूनच क्षमाही नाही. नथुराम गोडसे या हिंदू महासभेच्या सदस्याने जरी गांधींचा खून केला असला, तरी रा. स्व. संघाची त्याच्या विचाराशी असणारी जवळीक लक्षात घेता गांधीजींच्या रक्ताचे काही शिंतोडे संघाच्या वस्त्रावरही पडले आहेत अशी जनभावना आहे. जोवर ते डाग पुसले जात नाहीत, तोवर येथील जनमानसात आपल्याला स्थान मिळणार नाही, याची संघाला नीट कल्पना आहे. त्यामुळेच कोणत्या न कोणत्या प्रकारे आपल्यावरील हा कलंक पुसला जावा, यासाठी संघाचे प्रयत्न सुरू आहेत. केवळ तांत्रिकदृष्टय़ा तसे घडणे पुरेसे ठरणार नाही, म्हणून गांधी आम्हाला प्रात:स्मरणीय आहेत, त्यांनी संघशाखेत येऊन आमची तारीफ केली होती, असे संघाला वारंवार सांगावे लागते.

२०१४ च्या निवडणुकीत संघाच्या पाठबळावर मोदींनी निर्वविाद यश मिळविले आणि संघ आणि गांधी नात्यातील एका वेगळ्याच अध्यायाला सुरुवात झाली. मोदी भारताबाहेर गेल्यावर हिंदू धर्म, भारतीय परंपरा यांविषयी जे काही बोलतात, ते बव्हंशी गांधीविचारातून आलेले असते. अनेकदा गांधींचे नाव घेऊन त्यांच्याविषयीचा आत्यंतिक आदरभाव ते अशा परदेश दौऱ्यात व्यक्त करताना दिसतात. तिथे ते सावरकर, गोळवलकर गुरुजी किंवा दीनदयाळ उपाध्याय यांचा उल्लेखदेखील करताना आढळत नाहीत. खुद्द सरसंघचालक मोहन भागवत यांचे गेल्या दसरा उत्सवातले ९०% भाषण हे सर्वोदयी मुशीतून घडल्यासारखे वाटते. हे काय गौडबंगाल आहे? आपण सत्तेत आलो हे भान संघ स्वयंसेवकांना व पक्षातील भल्याभल्यांना अजून आले नसले, तरी मोदींसारख्या मुरब्बी राजकारण्याला व सरसंघचालकांना ते सर्वात आधी आले, यात नवल ते काय?

पण स्वच्छ भारत मिशनसाठी किंवा देश-परदेशात करावयाच्या भाषणाच्या वेळी संघ व भाजपतल्या अध्वर्यूच्या मदतीला धावून येणारा गांधी कधी त्यांच्यासाठी भलतीच आफत उभी करतो, त्याचीही एक गंमतच आहे. भारतातल्या सर्वसामान्यांच्या हितासाठी शेतीपासून शिक्षणापर्यंत कोणत्याही क्षेत्रात मूलभूत काम करायचे झाले तर गांधी नावाच्या म्हाताऱ्याला टाळून चालत नाही, असा या क्षेत्रात काम करणाऱ्या असंख्य व्यक्तींचा अनुभव आहे. कारण ‘नयी तालीम’ असो की नसíगक शेती, प्रादेशिक भाषासंवर्धन असो की पर्यावरणरक्षण, गांधींचे विचार व त्यांच्या अनुयायांनी त्या त्या रचनात्मक क्षेत्रात केलेले कार्य ओलांडून  किंवा त्याला वळसा घालून तुम्हाला पुढे जाता येत नाही. गेली ३०-४० वष्रे काँग्रेसच्या जनविरोधी धोरणांचा विरोध करीत संघपरिवारातील अनेक संघटना उभ्या राहिल्या. उदा. रासायनिक शेती व जनुकीय संस्कारित पिके, शिक्षणाचे इंग्रजी माध्यम यांचा विरोध करीत व नसíगक शेती व मातृभाषेतून शिक्षणाचे समर्थन करीत क्रमश: भारतीय किसान संघ व भारतीय भाषा सुरक्षा मंच या संघटना विकसित झाल्या. ‘आपले’ राज्य आल्यावर आपल्या कामाच्या दिशेने धोरणे आखली जातील असे त्यांना वाटत होते, पण सत्तेवर आल्यावर मोदी सरकारने या विषयांवरील काँग्रेसचीच धोरणे पुढे चालू ठेवल्यावर त्यांची कोंडी झाली. शिस्तीपोटी काही काळ या संघटना गप्प बसल्या, पण अखेरीस बंड पुकारण्याशिवाय त्यांना पर्याय उरला नाही. ‘वास्तववादी राजकारण’ करणाऱ्या त्यांच्या नेत्यांच्या दृष्टीने आदर्शवादाचे मद्य प्यालेल्या या संघटनांना वास्तव कळत नाही. त्या मद्याच्या बाटलीवर नाव दत्तोपंत ठेंगडी किंवा दीनदयाळांचे असले, तरी त्यातील ‘पदार्थ’ हा त्या गांधी नावाच्या म्हाताऱ्याने बनवला होता.

मोहनदास करमचंद गांधी नावाच्या माणसाचा ३० जानेवारीला खून झाला व त्याचा देह नष्ट झाला, पण त्याच वेळी ‘महात्मा’ बनून किंवा ‘भूत’ बनून तो या देशाच्या मानगुटीवर जाऊन बसला आहे, यात शंका नाही. भारतीय समाज, संघ व गांधी यांच्या नात्यातले अनेक पदर लक्षात घेताना या अनोख्या अनुबंधाचाही विसर पडू नये.

 

– रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ

ravindrarp@gmail.com

लेखक परिवर्तनवादी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत.