कसबी मूर्तिकार- शिल्पकार
दत्तात्रय श्रीधर ऊर्फ डी. एस. खटावकर यांचे गेल्या आठवडय़ात निधन झाले. अत्यंत खडतर परिस्थितीशी संघर्ष करून यश व कीर्ती मिळवलेले आपले पिता आणि गुरू या विषयी त्यांच्या मुलाने व्यक्त केलेल्या भावना..
घरातील प्रतिकूल परिस्थिती, अभ्यासामध्ये गती नसल्याने राहिलेले शिक्षण मुलांनी पूर्ण करावे यासाठी धडपडणारे, बालवयापासूनच मातीकामामध्ये रस घेणारे, अनुभवातून शिकत आणि समृद्ध होत जाणारे, गणेशोत्सव सजावटीमध्ये जीव ओतून काम करताना नावीन्यता आणि प्रयोगशीलतेची कास धरणारे, एका बाजूला कडक शिस्तीचे असा लौकिक असूनही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारे आदर्श शिक्षक, गणेशोत्सव सजावट करताना पैशाचा विचारही न करता प्रसंगी पदरमोड करणारे.. ज्येष्ठ चित्रकार-शिल्पकार डी. एस. खटावकर यांच्यासारखे गुरू हे वडील म्हणून लाभले हे माझे भाग्यच आहे. ‘डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवली तर सगळी कामे होतात’ आणि ‘कलाकाराकडे संयम असला पाहिजे’ ही त्यांची दोन वाक्ये माझ्यासाठी गुरुमंत्र ठरली आहेत. हा गुरुमंत्र मी सदैव आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो.
घरामध्ये आम्ही मुले वडिलांना काका असेच म्हणायचो. ते ज्या काळात काम करीत होते तो कालखंड तेवढा चांगला नव्हता. कितीही चांगले काम केले तरी मोबदला मिळण्याची शाश्वती नसायची. गणेशोत्सवातील सजावट हा व्यवसायाचा भाग होऊ शकत नाही ही खटावकर सरांची धारणा झाली होती. त्यामुळेच त्यांनी मला तू आधी पदवी संपादन कर असे सांगितले. पण काकांकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांचा सहवास आणि त्यांच्या हातून घडणाऱ्या कलाकृती पाहताना माझेही हात सृजन घडविण्यासाठी उत्सुक असायचे. स. प. महाविद्यालयातून बी.ए. पदवी घेतल्यानंतर मी अभिनव कला महाविद्यालयामध्ये फाऊंडेशन कोर्ससाठी प्रवेश घेतला. त्या वेळी खटावकर सर हेच विभागप्रमुख होते. सातची वेळ असताना ते स्वत: दररोज १५ मिनिटे आधीच महाविद्यालयामध्ये पोहोचलेले असायचे. एक दिवस मला थोडा उशीर झाला, तर त्यांनी घरी जा म्हणून चक्क हाकलून दिले. ही शिस्त मग मीही अंगी बाणवली. त्यानंतर मी कधीही उशिरा गेलो नाही. कलाकार हा कसा घडला गेला पाहिजे या तळमळीने ते वर्गामध्ये शिकवीत असत. पुढे जे. जे. कला महाविद्यालयात जी. डी. आर्ट अभ्यासक्रमासाठी मुंबईला गेलो. तेथील कलावर्तुळामध्ये खटावकर यांच्या कलागुणांविषयी आदराने बोलले जात असे. ते ऐकून माझे वडील कलाकार म्हणून किती महान आहेत याची जाणीव झाली. त्यांच्या आदर्शाचा माझ्यावर चांगला परिणाम झाला. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्यासाठी वैयक्तिकरीत्या माझ्यावर कोणीही न टाकलेला दबावही होता.
वडील म्हणून त्यांना घरामध्ये कधी फारसे लक्ष द्यावे लागले नाही. त्यांनी कायम विद्यार्थ्यांवरच लक्ष केंद्रित केलेले असायचे. एकदा एखादे काम हाती घेतल्यानंतर ते पूर्ण करणे हेच त्यांचे लक्ष्य असायचे. ‘नंतर करू’ असे कधी त्यांनी केलेच नाही. कोणाची वाट न पाहता आणि कोणावरही अवलंबून न राहता अगदी सुतारकाम, साचे (मोल्ड) करणे आणि रंगकाम करण्यापासून ते इलेक्ट्रिशियन, कॉम्प्रेसर आणि गिअरबॉक्स दुरुस्त करण्यापर्यंत सर्व कामे ते लीलया करीत असत. कामामध्ये चूक झाली तर कधी फाडकन पाणउतारा केला असे मी कधी अनुभवलेदेखील नाही. त्या कलाकाराचे आधी कौतुक करायचे आणि नंतर मग मिस्कील शैलीत ‘असे करून पाहिलेस तर वेगळीच गंमत येईल’, असे सांगायचे. प्रोत्साहन देण्याच्या या वृत्तीमुळे प्रत्येकाच्या मनात आत्मविश्वास निर्माण व्हायचा आणि एक नवी ऊर्जा घेऊन तो कलाकार धडाडीने जीव ओतून काम करायचा. कलाकाराने कधीही हुरळून जाऊ नये. त्याने नेहमी असमाधानी असले पाहिजे, असे काका सतत सांगत असत. या असमाधानातूनच आणखी चांगले काम करता येते याचा अनुभव मी अनेकदा घेतला.
तुळशीबाग मंडळाच्या सजावटीमध्ये त्यांनी मला कधी येऊ दिले नाही. तर अखिल मंडई मंडळाच्या गणपतीची सजावट करण्यासाठी माझे नाव सुचवून त्यांनी माझ्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ निर्माण करून दिले. माझ्यामागे भिंतीप्रमाणे उभे राहिले आणि मीही नकळतपणे त्यांच्याकडून खूप काही शिकत गेलो. ‘शिल्पकार विवेक खटावकर’ हा स्वत:च्या हाताने रंगविलेला फलक ते दरवर्षी मंडई मंडळाच्या सजावटीवर लावत असत.
कोणतीही सजावट करताना आधी त्याची रेखाटने (स्केचिंग) करावीत हा धडा त्यांनी घालून दिला. त्याचा फायदा मला ‘कॉमन मॅन’ साकारताना झाला. त्यांनी कधी तोंडावर माझे कौतुक केले नाही याची खंत मला होती, पण माझ्या कलाकार म्हणून घडणीचा त्यांना अभिमान होता.

विवेक खटावकर