साधारण पाच ते सहा महिन्यांपासूनच आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी त्यांची लढाई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असल्याचे जाहीर केले. त्याचा सरळ अर्थ असा की राज्यातील भाजप नेत्यांमध्ये माझ्या तोलामोलाचा नेता नाही असा संदेश गोगोई यांना द्यायचा होता. ईशान्येकडील राज्यांमध्ये काँग्रेसचे प्रमुख नेते असलेल्या गोगोईंपुढे काँग्रेसची आसाममधील १५ वर्षांची सत्ता टिकवण्याचे आव्हान आहे. काँग्रेसची बोडोलँड क्षेत्रीय भागातील युनायटेड पीपल्स पक्षाशी आघाडी आहे. गेल्या निवडणुकीत तुलनेत काँग्रेससाठी परिस्थिती अनुकूल होती. यावेळी चित्र वेगळे आहे. केंद्रात भाजप सत्तारूढ आहे, त्यातच २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने लोकसभेच्या १४ पैकी ७ जागा जिंकत सत्तेसाठी आव्हान उभे केले आहे. विधानसभेच्या १२६ पैकी ६९ मतदारसंघांत भाजप आघाडीवर होता. जनमत चाचण्यांमध्येही भाजपचे पारडे जड राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अर्थात बहुमत मिळेल याचा अंदाज मात्र दिलेला नाही. आसाममध्ये ४ एप्रिलला पहिल्या टप्प्यात मतदान होत आहे. पुढच्या महिन्यात आसामसह, पश्चिम बंगाल, तामिळनाडू व केरळमध्ये निवडणुका होत असून, त्यात आसाममध्येच काय ती भाजपसाठी संधी आहे. त्यामुळे पक्षाच्या नेत्यांनी या राज्यावरच लक्ष केंद्रित केले आहे. पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यापाठोपाठ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही रविवारी प्रचार सभा घेत आमची लढाई गोगोई यांच्याशी नव्हे तर गरिबीशी असल्याचे जाहीर केले. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जे ‘दृष्टिपत्र’-व्हिजन डॉक्युमेंट प्रसिद्ध केले आहे त्यात सीमेपलीकडून बेकायदेशीररीत्या स्थलांतर रोखण्यासाठी बांगलादेशसोबतची सीमा बंद केली जाईल हे जाहीर केले आहे. सीमेपलीकडून होणारी घुसखोरी रोखण्याचा मुद्दा केंद्रस्थानी आहे. मुख्यमंत्रिपदासाठी चेहरा न दिल्याने दिल्लीपाठोपाठ बिहारमध्ये अपयश आल्याचा मतप्रवाह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये होता. त्यामुळे केंद्रीय क्रीडामंत्री असलेले सर्वानंद सोनोवाल यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. सोनोवाल हे पूर्वी आसाम गण परिषदेत होते, तर भाजपच्या प्रचार समितीचे प्रमुख आमदार हेमंत विश्व शर्मा हे गोगोई यांच्या खास मर्जीतील. ते आता भाजपमध्ये आहेत. त्यामुळे तशा अर्थाने भाजपबाहेरील व्यक्तींकडेच राज्यातील पक्षाचे भवितव्य अवलंबून आहे. आसाम गण परिषद व बोडो पीपल्स फ्रंटशी आघाडी करत काँग्रेसविरोधी मतांचे ध्रुवीकरण टाळण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे.
काँग्रेसची सारी मदार तरुण गोगोई यांच्यावरच आहे. राज्याच्या राजकारणाची खडान्खडा माहिती हे त्यांचे बलस्थान. येत्या १ एप्रिलला गोगोई ८० वर्षांचे होतील, तरीही राज्यभर त्यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात प्रत्येक कुटुंबाला सरकारी किंवा खासगी असे दहा लाख रोजगार देण्याचे आश्वासन दिले आहे. काँग्रेससाठी उद्योजक बद्रुद्दीन अजमल यांचा ऑल इंडिया डेमोक्रॅटिक फ्रंट (एआययूडीएफ) चिंतेची बाब आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत प्रमुख विरोधी पक्ष ठरलेल्या अजमल यांच्या पक्षाने लोकसभेला विधान सभानिहाय २४ मतदारसंघांत आघाडी घेऊन १५ टक्के मते मिळवली होती. अल्पसंख्यांचा पक्ष अशी त्यांची प्रतिमा आहे. काँग्रेसने हिंदू मते गमावण्याच्या धास्तीने एआयडीएयूएफशी आघाडी करण्याचे टाळल्याचे बोलले जाते. साधारणत: राज्यात ३४ टक्क्यांच्या आसपास मुस्लीम मतदार आहेत. किमान ३० ते ३५ जागा जिंकून सत्तास्थापनेचे पत्ते आपल्याच हाती ठेवायचे अशी अजमल यांची रणनीती आहे. त्यामुळेच गोगोई राज्याचा कोपरान्कोपरा पिंजून काढत आहेत. चहामळा कामगार हा काँग्रेसचा पारंपरिक मतदार वर्ग आहे, त्यांच्यासाठी काँग्रेसने अनेक धोरणे आखली. यावेळी हा वर्ग तो काँग्रेसला साथ देईल असा अंदाज आहे. बंगाली भाषिक हिंदू मतदारांमध्ये काँग्रेसबाबत नाराजी आहे. हा सुमारे १५ टक्के आहे. गोगोई सरकारने मतपेढीच्या राजकारणासाठी बेकायदेशीर स्थलांतरितांना प्रोत्साहन दिल्याची त्यांची भावना आहे. त्यामुळे भाजप-आसाम गण परिषदेला ते साथ देतील अशी अटकळ आहे.

कोणतीच लाट नाही.
लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेच्या जोरावर आसाममध्ये भाजपचे कमळ फुलले खरे, मात्र गेल्या १८ ते २० महिन्यांत अनेक आश्वासनांची पूर्तता झाली नसल्याची भावना आहे. त्यामुळे लोकसभेच्या आकडेवारीवरून भाजपला अनुकूल स्थिती आहे असे मानता येणार नाही. लोकसभेला भाजपला मतदान केलेले अनेक मतदार दुसरीकडे जाऊ शकतात असे चित्र आहे. या निवडणुकीचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे एकेकाळी दहशतवादी कृत्यांमध्ये सामील असलेले अनेक जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांनी काँग्रेस किंवा भाजपची वाट धरली आहे. मुख्य प्रवाहात त्यांनी सामील होणे ही एक चांगली गोष्ट आहे. अत्तरसम्राट अशी ओळख असलेल्या अजमल यांच्याबाबत काँग्रेसला धास्ती आहे. खासदार असलेल्या अजमल यांच्या स्वयंसेवी संस्थेमार्फत देशभर शैक्षणिक संस्था, रुग्णालये चालवली जातात. यावेळच्या प्रचारातही आसामी अस्मितेचा मुद्दा प्रकर्षांने पुढे आला. गेल्या विधानसभा निवडणुकीत केवळ पाच जागा जिंकणारा भाजप यावेळी सत्ता स्पर्धेत आहे. गोगोई यांची १५ वर्षे त्याच्या पुढे मोदी सरकारच्या दोन वर्षांच्या कामाची तुलना करा अशी भाजपची प्रचाराची घोषणा आहे. दुसरीकडे काँग्रेससाठी एकेक राज्य गमावणे परवडणारे नाही. त्यामुळे अनेक सहकारी सोडून गेले तरी तरुण गोगोई यांनी आम्हीच खरी राज्याची अस्मिता जपली असे सांगत भाजपच्या प्रचाराला उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. या साऱ्यांत निकालानंतर अजमल यांची भूमिका निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत.

हृषीकेश देशपांडे
hrishikesh deshpande@expressindia.com