मौन म्हणजे काय? आपण दोन तास तोंडानं बोललो नाही ते मौन झालं का? एका अर्थानं आपण बोललो नाही, असं ते एक आपलं नकारात्मक, अभावात्मक कर्म झालं. पण केवळ न बोलणं, हे मौनाचं बाह्यांग! ते तुम्ही मौनाचं अंतरंग किंवा गाभा समजू नका. फळाची साल असते ना तसं न बोलणं, ही मौनाची वरची साल आहे! महत्त्वाची खरी, परंतु ते त्याचं सत्व (पूर्ण रूप) नाही. मौन हा जीवनाचा एक आयाम आहे. परिमाण आहे. डायमेन्शन आहे. त्याचा बोलण्या आणि न बोलण्याशी, फार संबंध नाही. त्याचं सत्व, त्याचं मर्म बोलण्यापलीकडं आहे आणि न बोलण्यापलीकडंही आहे. पण जीवनाचा हा जो आयाम मौन त्याचा काय अर्थ आणि त्याचा आपल्याला काय उपयोग, याचा विचार करू. न बोलणं हे जे मौनाचं बाह्यांग आहे त्याचा काय फायदा? तर बोलण्यामध्ये मनुष्याची फार शक्ति खर्च होते. अग्नितत्व आणि वायुतत्व, ही दोन तत्वं विशेष रुपाने बोलण्यात खर्च होतात. आता तासभर समजा कोणी बोलत असेल तर त्याच्या शरीरात उष्णता वाढते. जर तुम्ही दिवसाच्या १२ तासांपैकी, १६ तासांपैकी अनेक तास बोलतच राहिलात तर उष्णता वाढून तेवढी शक्ति उगाच खर्च होईल. कारण असलं म्हणजे तर बोलावंच लागतं परंतु निष्कारण आपण बोलत राहिलो, स्वतची बढाई मारण्यासाठी बोललो, काही निंदा करण्यासाठी बोललो तर आपल्या शरीराची उष्णता वाढते. आणि ही जी व्हायटल एनर्जी आहे, अग्नितत्व आणि वायुतत्व, जे प्राणाशी फार संबंधित आहेत, ही दोन्ही तत्वं खर्च होऊन प्राण क्षीण व्हायला लागतो. तर मौनाच्या अभ्यासाचं पहिलं पाऊल उचलायचं झालं तर- कारणावाचून बोलू नये. बोलायचं ते मोजकं असावं, नेमकं असावं. मनात काहीतरी एक असावं, शब्द काहीतरी वापरावे, हेतू आणखी काहीतरी तिसराच असावा, असं नसावं. मग ते बोलणं अराजक झालं पहा! अव्यवस्था झाली. म्हणून मौनाकडं जायचं असेल तर आधी वाणीमधील अव्यवस्था, अराजकता, अंदाधुंदी ही काढून टाकावी. वाणीचं प्रक्षालन करावं. ज्ञानदेवांच्या शब्दांत ‘मितुलेची बोलावे’..!
मोजकं खावं, मोजकं बोलावं, मोजकं चालावं, संयत असावं. काया दंडायची नसेल, निग्रह-निरोध-दमन-पीडन करायचं नसेल आणि हसता हसता जर ही जीवनयात्रा करायची असेल तर मौन साधनेला सुरुवात करावी. प्रथम अनावश्यक बोलणं काढून टाकावं. आवश्यक तेवढंच बोलावं. अगदी रेखीव आणि अचूक असं बोलता आलं पाहिजे. एका वाक्यात काम होत असेल तर विनाकारण दहा वाक्याचं पाल्हाळ लावायची गरज नाही. नंतर, आवश्यक किंवा अनिवार्य असेल ते आणि मोजकं आणि नेमकं बोलत असलो तरी त्या बोलण्यामध्ये जे उच्चारण असतं, आवाजाचा पीच किंवा व्हॅल्यूम असतो, मोठय़ानं बोलणं, हळू बोलणं, मृदुतेनं बोलणं, हे सगळे प्रकार असतात ना? या सगळ्यांचा मौनाच्या अंगा-उपांगामध्ये समावेश होतो. तर फार जोराने बोलणं, कर्कशपणे बोलणं, उच्चारण शुद्ध नसणं, ही सगळी अशुद्धी आहे. ती काढावी. मग बाहेरचं बोलणं संपलं तरी मनुष्य आतल्या-आत, स्वतशीच बोलत रहातो. कारण त्याला जगण्यामध्ये मौज वाटत नाही. त्याला भूतकाळामध्ये जे काही घडलं, त्या सुखदुखामधून जीवनाचा जो काही उरलेला रस असेल, तोच परत परत चाखावासा वाटतो. म्हणून भूतकाळात मनुष्य जाऊन तिथलं संभाषण चालू ठेवतो. हे जे शब्दांवाचून, माणसांवाचून, स्वतशीच बोलणं आहे ते संपायला पाहिजे. या मनातल्या मनात अखंड सुरू असलेल्या बोलण्यानंही पुष्कळ शक्ति खर्च होते. आपल्या आतमध्ये ज्या वेळेला विचार येतो आणि त्यामागोमाग शब्द जन्माला येतो, त्या शब्दाला जन्म देतानाच शरीराची जी नाडी-तन्त्र आहेत आणि शरीरामध्ये असलेलं रसायनतन्त्र आहे, या दोन्हीची शक्ति खर्च होते. तेव्हा हे जे मनातल्या मनातील बोलणं आहे, हे सुद्धा मौनाला मोठं बाधक आहे. अभ्यासाने हेदेखील साधलं तर त्याच्या पुढचं पाऊल म्हणजे, आपल्या आतमध्ये संकल्प-विकल्प-विचार-भावना-कल्पना यांचं तांडव असतं. परस्परविरोधी इच्छा, भावना यांचं द्वंद्व असतं. परस्परविरोधी आकांक्षा व्यवहारात जगता तर येत नाहीत! मग त्यांचं आतल्या आत ‘धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे..’ परस्पर युद्ध चालतं. ही संकल्पविकल्पांची, विचार-विकारांची क्रीडा, त्यांचं नर्तन जोपर्यंत चालतं तोपर्यंत मौन नाही! जेव्हा हे सुद्धा शांत होतात, संकल्प किंवा विकल्प, भूतकाळातील स्मृति आणि भविष्यकाळच्या कल्पना, या सगळ्या वेळेला निशब्द होऊन, नादमुक्त होऊन, शून्यात सामावतात त्या वेळेला आपण ज्याला मौन म्हणू शकू, असा आयाम प्रगट होतो.
(‘आधार पण आश्रय नव्हे’ या पुस्तकातून संकलित.)



