९ ऑगस्ट ४२ च्या भूमिगत चळवळीत पुण्यातील क्रांतिकारी तरुणांनी, कॅपिटॉल बॉम्बस्फोट घडवून ब्रिटिश सरकारला हादरा दिला होता.  यामध्ये सहभागी असलेल्या सहा जणांपैकी केवळ हरिभाऊ लिमये हे आता हयात आहेत. आज  साजऱ्या होत असलेल्या क्रांती दिनानिमित्त या स्फोट-कटाच्या आठवणींना त्यांनी दिलेला उजाळा..
 हरिभाऊ लिमये. वय ८७ च्या आसपास. मसाजिस्ट लिमये परिवारांपैकी एक. त्यांच्या पुण्यातल्या उंबऱ्या गणपती चौकातल्या लिमये महाराज वाडय़ातच कॅपिटॉल बॉम्बस्फोटाची योजना आखली गेली. त्याच वास्तूत हरिभाऊंनी ९ ऑगस्टच्या निमित्ताने भेटल्यावर स्फोटाच्या कटाच्या आठवणी सांगितल्या.
‘बापू साळवी, बाबूराव चव्हाण, एस. टी. कुलकर्णी, रामसिंग, दत्ता जोशी आणि मी (हरिभाऊ) असे आम्ही सहा जण कॅपिटॉल , वेस्टएण्डमध्ये बॉम्बस्फोट करण्याचे नियोजन करत होतो. आमच्यापैकी दत्ता जोशी आम्ही सारे जेलमध्ये असतानाच गेले, तर आम्हाला स्फोटक-हाताने फेकण्याचे बॉम्ब अ‍ॅम्युनिशन फॅक्टरीतून चोरून आणून देणारे ‘भास्कर कर्णिक’ यांनी तर आमच्यापूर्वी अटक होताच, इतर सहकाऱ्यांची नावे सांगावी लागू नयेत म्हणून साइनाइड खाऊन आत्महत्या केली होती.’ हरिभाऊ लिमये सांगत होते.
म्हणाले की, मी सर्वात लहान. वय सोळा-सतरा. माझे बंधू निळूभाऊ लिमये आणि बापू हे प्रभात रोडवरच्या पाटलांकडे बॉम्बस्फोटासंदर्भातले प्रयोग करत होते. बापू डोंगरे केमिस्ट्रीचा विद्यार्थी. हँडग्रेनेड फेकल्यावर स्फोट झाला की तुकडे उडतात. बॉम्ब टाकणाराच यात मरू नये म्हणून बॉम्ब फेकण्याचे, तो पेटण्याचे आणि तत्पूर्वी टाकणाऱ्याने पळण्याचे ‘टायमिंग’ सांभाळणे सर्वात महत्त्वाचे होते.
पोटॅशियम क्लोरेट, गंधक आणि पिठीसाखर यांचे मिश्रण करून त्यावर सल्फ्युरिक अ‍ॅसिडचा थेंब पडल्यास पेट होई. त्याचे प्रयोग चालू असताना, आमच्या वाडय़ात एकदा स्फोट होऊन निळूभाऊ आणि बापू दोघे भाजले. निळूभाऊंच्या भुवयांभोवती सारे पांढरेपण होते ते त्या भाजल्याच्या खुणा होत्या.
कॅपिटॉल -वेस्टएण्डमध्ये दोघांनी आधी जायचे. दोन खुच्र्या रिकाम्या ठेवायच्या, बॉम्ब खुर्चीवर ठेवून लगेच बाहेर यायचे. एक मिनिटही थांबायचे नाही. तसेच सारे केले; पण पुढे काय झाले ते आम्हाला कळेना. कारण आम्ही घरी आलेलो. बाबूराव आणि साळवी म्हणाले, आम्ही सिल्व्हर ज्युबिली बसने तिकडे जाऊन बघून येतो. गेले. परत आले. म्हणाले, सारे सामसूम आहे.
सकाळी पेपर घेतला. त्यात कॅपिटॉलमध्ये स्फोट झाल्याचा उल्लेख होता. वेस्टएण्डमध्ये झाला नाही. भास्कर कर्णिकने अ‍ॅम्युनिशन फॅक्टरीतून दहा ग्रेनाइट्स चोरून आणले होते.
पोलीस चौकशीत खात्री पटली होती, की हे हँडग्रेनेड्स आर्मीखेरीज कुणाकडे हाती असणे शक्य नाही. हा माल अ‍ॅम्युनिशनचा. तिथे कर्णिक सापडले. त्यांच्या घरी रेड टाकली. त्यांच्या घरी टेम्पोभर स्फोटके सापडली. त्यांना फरासखान्यात आणले. सहकाऱ्यांची नावे सांगावी लागू नयेत म्हणून भास्कर कर्णिकांनी आत्महत्या केली. आरोपीच त्यामुळे मिळेनात.
बाकी आम्ही पाच जण. आमच्या वाडय़ात प्रयोग चाललेले (आता ५८६ सदाशिव. त्या वेळचा ९६८ सदाशिव) सल्फ्युरिक अ‍ॅसिड खाली पडायला टायमिंग हवे. बटरपेपरमधून खाली थेंब पडायला ६ मिनिटे लागत होती. आम्हाला बॉम्ब ठेवून बाहेर पळून येईतो १० मिनिटे लागणार. म्हणून डबल लेअर घ्यायचे ठरले. त्या वेळी ‘पासिंग शो’ नावाची सिगारेट पॉप्युलर होती. तिची चांदी वापरली तर ६ ऐवजी ८ मिनिटे लागत होती.
सदाशिव पेठेतून कॅपिटॉल टॉकीज लांब. म्हणून लाल देवळापाशी गेल्यावर थेंब टाकायचा. जिवाशीच खेळ होता, पण त्या चळवळीच्या नशेत वाट्टेल तो धोका पत्करला जात होता. दोघांनी पुढे जायचे. तिकीट काढायचे. जागा पकडायची. बाबूराव आणि रामसिंगांनी सायकली थिएटरमध्ये आणायच्या. लाल देवळापाशी लोड केलेले बॉम्ब आणून द्यायचे. तसेच सारे घडवून स्फोट केले.
आरोपींमध्ये उगाचच शिरूभाऊ लिमयेंचे नाव पोलिसांनी आरोपी नंबर एक म्हणून घातले. वास्तविक त्यांचा सहभाग नव्हता, पण पोलिसांनी महाराष्ट्र कॉन्स्पिरसी- ३०-४० जणांची अशी स्टोरी रचली. स्वाभाविकच शिरूभाऊंबद्दल पुरावा मिळेना.
एफ.डी. रोच नावाचा स्पेशल इन्व्हेस्टिगेटिव्ह ऑफिसर नेमला. त्याला एकच काम. ही केस शोधा, पण महिना उलटला तरी तपास लागेना. सरकारने त्या काळी पाच हजारांचे बक्षीस लावले तरी कळेना. भूमिगत चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या पाठी चौकशी लागली. बाबूराव चव्हाणांचा सुगावा संशयित म्हणून लागला. बाबूराव क्रिकेटप्रेमी, तर मुंबई ब्रेबॉर्न स्टेडियम मॅचला हा येणार. मॅच सुटायच्या वेळी पोलिसांनी ट्रॅप लावला आणि बाबूरावांना आणि एस. टी. कुलकर्णीला पकडले.
पाठोपाठ ‘रामसिंग’ आणि मला त्याच रात्री पकडले, हरिभाऊ सांगत होते. कॅन्टोन्मेंट चौकीत नेले. माझ्यासमोर ८ इन्स्पेक्टर बसलेले. मी लहान म्हणून मला सहज विचारल्यासारखे विचारले, ‘काय रे कॅपिटॉल  टॉकीज माहित्येय का?’ माझी मानगूट पकडून लॉकअपमध्ये टाकले, खूप बडवले.
नाना क्लासमधून दत्ता जोशीला पकडले. फक्त बापू साळवी सापडले नव्हते. दोन महिन्यांनी ते नाशकात मिळाले. शिरूभाऊ लिमयांना मूषक महाल इथे पकडले. साने गुरुजी तिथेच होते. त्यांना बेडी घालताक्षणी शिरूभाऊ संतापले. म्हणाले, ‘मला बेडी घाला, पण त्यांना कशाला?’ गुरुजींनी शांत केले.
माझ्या घरात मिश्रण सापडल्याने, मी सांगितले, आमच्या घरात दवाखाना आहे. सतत चौकशा, बडवणे, पण काही नाटय़मय घडामोडीही घडल्या. अधिकारी रोच आम्हाला घेऊन जात असताना चिंतोपंत दिवेकरांनी कोर्टात त्याच्या पाठीत चाकू खुपसला. त्यांना जाब विचारला तर म्हणाले, की आमच्या लहान मुलांना पोलिसांनी छळले. मग आम्ही काय मेलेल्या आईचे दूध प्यायलोय?
निमित्त आम्ही सहा जण होतो, पण चिंतोपंतांसारखे असंख्य जण मनाने आमच्यासमवेतच होते. दोन वर्षे कारागृहात काढली. एफ.वाय.ला मी होतो. सायन्सऐवजी आर्ट्स घेतले तर मला परीक्षेला थेट परवानगी देणार होते. मी आर्ट्स स्वीकारले. पुढे एम.ए., एलएल.बी. झालो, पण वकिली करायला मी जागेवर हवा ना? सतत कुठले ना कुठले मोर्चे, धरपकड इ. पण आपण काही विशेष केलेय, असे मनातही नसे. १९४२- ४४ चा तो सारा भारावलेला काळ होता. ‘करा अन्यथा मरा’ असा संदेश देणारा..