|| मंगला नारळीकर

कोविड साथीत सगळे देश, विविध समाज धर्म, भाषा, वंश यांच्या पलीकडे जाऊन एकमेकांना मदत करण्याचा प्रयत्न करताहेत. या मानवता धर्माची कास सोडून चालणार नाही. हीच वेळ आहे- सगळ्या धर्मप्रमुखांनी आपापल्या धर्माच्या नियमांची तपासणी करण्याची…

त्या दृष्टीने चर्चेला सुरुवात करून देणारे हे टिपण…

 

सध्या जगभर कोविडने हाहाकार माजवला आहे. सगळे देश या साथीचा मुकाबला करत आहेत. चुकतमाकत शिकत आहेत. मोठा समुदाय जमवणे निषिद्ध झाले आहे. यात एक आशादायक बाब दिसते ती अशी : सगळे देश, विविध समाज धर्म, भाषा, वंश यांच्या पलीकडे जाऊन एकमेकांना मदत करण्याचा प्रयत्न करताहेत. कोणत्याही धार्मिक कर्मकांडाचा इथे उपयोग होताना दिसत नाही. मानवतेचा धर्म सगळ्यात महत्त्वाचा ठरतो आहे. वैद्यकीय संशोधन व त्यातून मिळणारे उपाय यांवरच सर्वांची भिस्त आहे. या निराशेच्या, संकटाच्या काळात ही बाब दिलासा देणारी आहे. या मानवता धर्माची कास सोडून चालणार नाही.

हीच वेळ आहे, सगळ्या धर्मप्रमुखांनी आपापल्या धर्माच्या नियमांची तपासणी करण्याची. अत्यंत गंभीर, संवेदनशील गोष्टीची चर्चा करण्याचे धाडस करते आहे. इतर लोकांनीही यावर मते मांडावीत अशी अपेक्षा आहे. यासाठी महत्त्वाचे गृहीतक असे घेतले आहे की, प्रत्येक धर्माची स्थापना मानवी समाजाच्या हितासाठी झाली आहे. समान उद्दिष्ट असले, तरी भौगोलिक आणि सामाजिक परिस्थिती यांत खूप फरक होता. विविध धर्मांतील आक्रमकांनी परधर्मीयांबरोबर धर्माच्या नावावर युद्धे करून भरपूर हिंसा केली आहे, विनाश केला आहे, परकीयांचे वित्त/प्रदेश यांचे अपहरण केले आहे.

पूर्वी असे झाले असले, तरी मानवी संस्कृती हळूहळू शिकत, सुधारत आली आहे. फ्रेंच राज्यक्रांतीने उद्घोष केलेली स्वातंत्र्य, समता, बंधुभाव ही मूल्ये आज सगळ्या समाजांनी तत्त्वत: स्वीकारली आहेत. त्या आधाराने इतिहासातली हजारो वर्षे चालू असलेली गुलामगिरीची प्रथा नष्ट झाली, भारतातली काही हजार वर्षे मूळ धरून असलेल्या अन्यायी जातिसंस्थांतर्गत भेदाभेद कायद्याने नाकारला आहे. जाती अजून नष्ट झालेल्या नाहीत, पण त्यांच्यातील उच्च-नीच भाव तरी घटनेने नाकारला आहे, समाजही ते शिकत आहे. तेव्हा सामाजिक स्थितीत हळूहळू का होईना, पण चांगला बदल होऊ शकतो.

विज्ञान आणि तंत्रज्ञान यामुळे संपर्क आणि प्रवास यांची वेगाने होणारी प्रगती, ज्ञान व भौतिक वस्तूंची प्रचंड प्रमाणात देवघेव यामुळे जग लहान होत आहे. सामाजिक बदल खूप वेगाने होत आहेत. जे बदल पूर्वी सावकाश, शेकडो वर्षांत होत, ते आता काही महिन्यांत किंवा आठवड्यांत होतात. निसर्ग तर वंश, भाषा, धर्म यांबाबतीत भेदभाव करत नाही, मानवालाही ते आता मान्य होत आहे. अशा स्थितीत, समाजात वागण्याचे नीतिनियम सगळ्या धर्मांचे समान असावेत हे सयुक्तिक नाही का? चोरी करू नये, खोटे बोलू नये, आईवडिलांना आदर द्यावा, स्वच्छता राखावी, दीनदुबळ्यांना मदत करावी, समाजाचे हित साधावे ही शिकवण तर सगळ्या धर्मांची आहे. तुकोबांचा सोपा नियम- ‘पुण्य परउपकार, पाप ते परपीडा’ हा सगळ्या धर्मांना मान्य दिसतो, तो पायाभूत मानता येईल. मग समाजात वागण्याचे नियम सारखे का नकोत? ‘ते आणि आपण’ असे विभाजन करून वेगवेगळे नियम का असावेत? वैयक्तिक मोक्ष, निर्वाण किंवा मरणोत्तर सद्गती यासाठी प्रत्येक धर्मात वेगळ्या कल्पना, नियम आहेत. पण तेही वर दिलेल्या पायाभूत ‘पुण्य परउपकार, पाप ते परपीडा’ या नियमाचे उल्लंघन करणारे नसावेत. देव मानावा का, तो कसा असावा, त्याची उपासना कशी करावी, याबद्दलही वेगवेगळे विचार आहेत. जगातील विविध प्रदेशांत, विविध काळांत, कोणत्या तरी देवाची कल्पना, त्यावर विश्वास या गोष्टी हजारो वर्षे मानवी समाजाला आवश्यक वाटत आल्या आहेत. या सगळ्या गोष्टींचा विचार करणे, तर्कशुद्ध कारणमीमांसा देणे याचा प्रयत्न अपेक्षित आहे. वेगवेगळे धर्म आणि पंथ यांचे सण आणि उत्सव साजरे करतानादेखील समाजातील इतर लोकांना त्यांचा उपद्रव होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. सगळ्या धर्मांचे लोक असे गुण्यागोविंदाने राहायला शिकले, तर मग पसायदानातील ‘वर्षत सकळमंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतु भूतां’ ही स्थिती सत्यात येईल!

mjnarlikar@gmail.com