43-lp-cartoonकार्टून फक्त टीव्हीवरच आपल्यासोबत असतात, असं बच्चे कंपनीला आता बिलकूल वाटत नाही. बॅग, कपडे, खाद्यपदार्थ, खेळ अशा वेगवेगळ्या स्वरूपात ही कार्टून मंडळी आता लहानग्यांसोबत असतात. टीव्हीवर दिसणाऱ्या कार्टून्सची गर्दी आता विविध वस्तूंच्या माध्यमातून छोटय़ा दोस्तांच्या आजूबाजूलाही वावरताना दिसते.

लहानपणीच आपल्या सगळ्यांची ओळख कार्टून्सशी होते. कळायला, समजायला लागण्याच्या अवस्थेपासून बाळांना लाल, पिवळ्या, हिरव्या, निळ्या अशा ब्राइट आणि उठून दिसणाऱ्या रंगांचे आकर्षण होते. विशेषत: लाल रंग त्यांचा आवडता. मग घरात त्या रंगाची दिसणारी प्रत्येक गोष्ट त्यांना हवी असते. पण या वस्तूंचं कुतूहलसुद्धा काही क्षणांचं, त्यानंतर त्याच रंगाच्या नवीन गोष्टीसाठी त्यांचा हट्ट सुरू होतो. आता रोज नवीन खेळणी, वस्तू घरात कुठून आणणार? या विवंचनेत असलेल्या आईच्या मदतीला ही टीव्हीवरची कार्टून्स येतात. ‘तो बघ मिकी, त्याचा ड्रेस पण तुझ्यासारखा लाल आहे. तू आणि तो मॅचिंग मॅचिंग.’ अशा काहीशा लबाडीने आई दोघांची गट्टी जमवून देते. निळ्या रंगाचा डोनाल्ड डक, पिवळ्या रंगाचा छोटा भीम, हिरव्या रंगाचा बेनटेन हेसुद्धा येतात. मग सुरू होतो, रोज संध्याकाळी बाळाचा आणि कार्टून्सच्या भेटण्याचा सिलसिला. पण हे कार्टून्स येतात संध्याकाळी, पूर्ण दिवसाचं काय? तेव्हा काय विरंगुळा? अशात बागेत जात असताना खेळण्यांच्या दुकानात काचेच्या शोकेसमध्ये मिकीचं सॉफ्ट टॉय बाळाला दिसतं आणि तो सवयीप्रमाणे काचेवर हात आपटून आईकडे त्याच्यासाठी हट्ट धरतो. इथून या कार्टून र्मचडाइजचा प्रवेश आपल्या घरात होतो आणि बाळाच्या वाढत्या वयानुसार त्याचं येणं चालूच राहातं. अगदी टीव्हीवरील कार्टून्सपासून सुरू झालेला सिलसिला रंगांच्या पुस्तकांपासून ते थेट टी-शर्ट्स, खेळणी, स्टेशनरी आणि अशा कित्येक गोष्टींपर्यंत जाऊन पोहोचतो.

वॉल्ट डिस्ने म्हणजे कार्टून्सप्रेमींसाठी पितामह. त्यांनी बनविलेल्या कार्टून्सबद्दल बोलावं तितकं कमीच आहे. मिकी माऊस, डोनाल्ड डक, गुफी, प्लुटो, ते प्रिन्सेस, पॉवर रेंजर्सपर्यंत सर्व कार्टून्स ही त्यांचीच देण. १९२७ मध्ये ‘ओस्वॉल्ड द लकी रॅबिट’ हे कार्टून लोकप्रिय झाल्यावर त्याचं पहिलं र्मचडाइज बाजारात आणलं. त्यात चॉकलेट माश्र्मेलो, स्टेनसिल सेट, पिन-बॅक्ड बटन्स यांचा समावेश होता. त्यानंतर आलेल्या मिकी माऊस, मिनी माऊस, प्लुटो, डोनाल्ड डकने तर मुलांना पुरतं वेडं केलं. चित्रपटांपासून टीव्हीवरील कार्टून्सपर्यंतचा प्रवास वॉल्ट डिस्ने यांनी त्यांच्या कार्टून्सच्या र्मचडाइजचे राइट्स घेतले होते. त्यामुळे जसजशी ही कार्टून्स लोकप्रिय होत गेली, त्यांची उत्पादने बाजारात येऊ  लागली होती. त्यांची ही ट्रिक पुढे हॉलीवूड निर्मात्यांनी आगामी अ‍ॅनिमेटेड चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी वापरायला सुरुवात केली. मग जेम्स बाँड कॉमिकपटांतील डॉ. नो, स्टार वॉर्स, बॅटमॅन, सुपरमॅन, स्पायडरमॅन, अ‍ॅव्हेंजर्स यांचे र्मचडाइज बाजारात येऊ  लागले. विशेषत: त्यांची खेळणी लहान मुलांच्या आकर्षणाचा केंद्र ठरत गेली. या खेळण्यांमुळे सिनेमांना आणि सिनेमांनी खेळण्यांना असे दुहेरी फायद्याचे गणित जमू लागले. याच दरम्यान टीव्हीवरील कार्टून्सनासुद्धा सुगीचे दिवस येत होते. त्यामुळे त्यांची खेळणी, कपडे, शाळेचे समान बाजारात येऊ  लागले होते.

छोटय़ा गोष्टींचे आकर्षण

लहान मुलांच्या हट्टापुढे पालकांचं काही चालत नाही, ही बाब जरी खरी असली तरी मुलांचे हट्ट आपलं महिन्याचं बजेट विस्कळीत करणार नाही याकडे पालकांचं बारीक लक्ष असतं. त्यामुळे बाजारातील महागडे कार्टून खेळणी, सॉफ्ट टॉय यांच्या खरेदीवर मर्यादा होत्या. पण म्हणून शांत बसतील ती मुलं कुठली! त्यांनी आपलं लक्ष छोटय़ा पण स्वस्त गोष्टींकडे वळवलं. उत्पादक त्यांच्या दिमतीला हजर होतेच. रिषिता
म्हात्रे सांगते, ‘मागच्या वर्षीपासून शाळेत जायला लागल्यापासून माझ्या मुलाला मोटू-पतलू, छोटा भीम यांचे फोटो असलेली बॅग, रेनकोट, शूज लागतात. कपडय़ांच्या बाबतीतसुद्धा इतर कार्टून्सशिवाय दुसरीकडे तो ढुंकूनसुद्धा पहात नाही. यंदा नुकताच आम्ही जंगलबुक सिनेमा पाहिला. त्यानंतर आता मोगली त्याचा नवीन आवडता झालाय.’ अगदी डिस्नेनेही सुरुवातीला आपलं लक्ष चॉकलेट्स, स्टेनसिल सेट, रुमाल, पेन्सिल्स अशा छोटय़ा पण लहान मुलांच्या जिवाभावाच्या गोष्टींकडे आपला मोहरा वळवला होता. त्यामुळे ही उत्पादने समाजातील विविध स्तरांमध्ये पोहोचत होती. चॉकलेट्स, बिस्किट म्हणजे मुलांचं लाडकं खाद्य. त्यावर कार्टून्सची छबी येऊ  लागली. त्यामुळे पार्ले जी वरील छोटा भीम, कॅड्बरीवरील टॉम अँड जेरी, हॅपी मिलवर मिळणारी टॉय स्टोरीची खेळणी, किंडर जॉयमधली बार्बीची खेळणी हे लाडकं मुलांमध्ये आवडीचा विषय ठरू लागले. याशिवाय चिटोज, बिस्किटांचे पुडे यांच्या पॅकेजमध्ये मिळणारे ड्रॅगन बॉल, बेन टेनचे रिफ्लेक्टर गोळा करण्यासाठी येता-जाता जंक फूड मुलांच्या पोटात जाऊ  लागलं. फ्रेंडशिप बँड, रुमाल, बेल्ट यावरही मिनी, मिकी माऊस, प्रिंसेस यांच्या छबी उतरू लागल्या. कपडय़ांमध्ये कार्टून्स असणं मुलांसाठी मस्टच होऊ  लागलंय. सध्या बाजारात उपलब्ध असलेले हल्क, अ‍ॅव्हेंजर्सचे रिफ्लेक्टर टी-शर्ट्स, मोगलीचे कपडे त्यांचे लाडके आहेत. मित्रांच्या घोळक्यात ‘माझं बेन टेनचं जॅकेट’, ‘स्पायडरमॅनचा टी-शर्ट’, ‘सिंड्रेला गाऊन’ मिरवणं त्यांच्यासाठी स्टेट्स सिम्बॉल झालाय.

44-lp-cartoon

शाळेला कार्टून्सच्या संगतीने

तसं म्हणायला शाळा म्हणजे बच्चे कंपनीचा नावडीचा विषय. त्यात अवजड दप्तर, पुस्तकं सगळंचं त्यांना नकोसं वाटतं. हेच मार्केट कार्टून्सनी सर्वाधिक काबीज केलं. ‘छोटा भीमवाली बॅग दिलीस तरच मी शाळेत जाणार,’ हा मुलांचा हट्ट पालकांना मोडवत नाही. आणि ‘तसंही दरवर्षी नवीन बॅग घ्यायचीच आहे, तर ही का नको,’ हा विचार करून पालकही विरोध करत नाहीत. त्यामुळे पेन्सिल्स, खोडरबर, पट्टी, कंपास, पाण्याची बाटली, खाऊचा डबा इथपासून थेट वह्य़ांना लागणारे नावाचे स्टिकर्सपर्यंत अनेक छोटय़ा छोटय़ा गोष्टींवर ही कार्टून्स मंडळी विराजमान झालेली दिसतात. सध्या शाळेच्या सामानांमध्ये छोटा भीम, मोटू पतलू, डोरेमोन, अ‍ॅव्हेंजर्स यांचा बोलबाला अधिक आहे. ‘माझा मुलगा आता पाचवीत आहे. त्याला कार्टूनची बॅग आवडत नाही. शाळेतल्या दादा लोकांसमोर इम्प्रेशन खराब होतं म्हणे. पण कंपास बॉक्ससारख्या छोटय़ा गोष्टींवर मात्र स्पायडरमॅन, अ‍ॅव्हेंजर्स हवे असतात,’ असे मुंबईचे श्रीकृष्ण वैद्य सांगतात.

स्पेशल कार्टून स्पेशल र्मचडाइज

इतकं सगळ असूनही कित्येक कार्टून्स त्यांच्या खास र्मचडाइजसाठी ओळखली जातात. मिनी माऊसचे कान असलेला हेअरबँड, बेन टेनचं घडय़ाळ, नॉडीची निळी टोपी, बॅटमॅनचा मास्क, अ‍ॅव्हेंजर्सप्रमाणे गाडय़ांचे रोबोट होणारी खेळणी, थॉमस अँड फ्रेंड्सची ट्रेन, डोरेमोनची खेळणी, जी.आय.जो, हीमॅन, कॅप्टन प्लॅनेट, निंजा टर्टल यांचे अ‍ॅक्शन फिगर, डोराची स्कूल बॅग, पॉवर रेंजरचे रिमोट, स्टार वॉरची तलवार यांच्यासारख्या कित्येक स्पेशल र्मचडाइजशिवाय मुलांचं खेळण्याचं कलेक्शन अपूर्णच. मुलींच्या मेकअपच्या सामानात डिस्ने प्रिन्सेसनी पूर्णच कब्जा केला आहे. त्यामुळे आरशापासून ते हँडबॅग, लिपस्टिक, हेअरबो, हेअरबँड, नेलपॉलिशमध्ये त्यांची छबी दिसते. मिकी माऊस, टॉम-जेरी, मिनिअन यांनी अशाच छोटय़ा-छोटय़ा गोष्टींनी अख्खं मार्केट काबीज केलं आहे. टी-शर्ट्स, खेळणी, स्टेशनरीपासून थेट बेडशीट्स, वॉलपेपर्स, दरवाजे, कपाटे इथपर्यंत जाऊन पोहोचली आहे. आज तुम्हाला तुमच्या मुलाची अख्खी खोली त्याच्या आवडत्या कार्टूनच्या ढंगात सजवता येते. अगदी सकाळी उठल्यावर दात घासायच्या ब्रशपासून ग्लास, प्लेट, कपडे, शाळेची संपूर्ण स्टेशनरी, खेळणी सगळीकडे या कार्टून्सची छबी दिसते. त्यावरून या कार्टून्सचं मुलांवरील गारूड दिसून येतं.

पारंपरिक खेळांना पर्याय

एरवी घरी मित्रांसोबत कॅरम, चेस, सापशिडी खेळणाऱ्या मुलांच्या हातात या कार्टून्सनी नवीन पर्याय दिले. बेब्लेड कार्टून लोकप्रिय झाल्यावर त्यांचे अनेक खेळ बाजारात उपलब्ध झाले होते. पारंपरिक भोवऱ्यांचा हा नवीन अवतार मुलांमध्ये बराच लोकप्रिय आहे. या बेब्लेडच्या स्पर्धा लावणे, त्यांना मॉडिफाय करणे हा मुलांचा आवडता विरंगुळा ठरू लागला. याशिवाय पत्त्यांची जागा पोकिमॉन कार्ड्सनी घेतली. खास कार्टून्सवर आधारित व्हिडीओ गेम्स बाजारात येऊ  लागले. हिरो फिगर्सच्या लढाया, प्रिन्सेसचे राजवाडे सजवणे हे नवे उद्योग कार्टून्समुळे मुलांना मिळाले.

खाऊच्या डब्यात कार्टून्स

खेळण्यांमधील कार्टून्स हळूहळू आईच्या किचनमध्ये शिरू लागले. सध्या कटलेट, ऑम्लेट, पॅटीसऐवजी मुलं मिकी, टॉम जेरीच्या आकाराचे खाऊ  मागू लागले. त्यामुळे बाजारातसुद्धा अशा आकाराचे मोल्ड मिळू लागले. अगदी साध्या वाटणाऱ्या आइस मोल्डमध्येही सुपरमॅन, बॅटमॅनचे आकार मिळू लागले. चॉकलेट, कपकेकच्या सिलिकॉन मोल्डमध्येही लाडक्या कार्टून्सनी जागा पटकावली. बाजारातही कँडी, कॅडबरीवर कार्टून्सचे आकार अवतरू लागले. गंमत म्हणजे याच कार्टून्समूळे मुलांचे अनेक नावडते प्रकार आवडीचे होऊ  लागले. पॉपॉयला इन्स्टंट ताकद देणारे पालक मुलांचा जीव की प्राण झालं तर भीमचे लाडू या नावाखाली वेगवेगळे चवदार, पौष्टिक लाडू मुलांच्या पोटात जाऊ  लागले.

पर्सनलाइज उत्पादनावर

पूर्वी वाढदिवसाला केकवर नाव लिहिणं पुरेसे असे. त्यात फारतर मिकीच्या आकारातला केक बनवला जाई. हल्ली मात्र वाढदिवसाचे फुगे, गिफ्टसोबत केकवर कार्टून्सचे फोटो छापता येतात. त्यामुळे मुलासोबत कार्टूनचा फोटो छापलेले केक यांना सध्या मोठी मागणी आहे. बरं हे कार्टूनप्रेम फक्त लहान मुलांपर्यंत आहे असं अजिबात नाही. मिनिअनचा सिनेमा येणार असो वा नसो तरुणाईवरील त्यांच्या प्रेमाला ओहोटी येत नाही. आज जगभरातील कुठल्याही गिफ्ट शॉपमध्ये नजर टाकली तर सॉफ्ट टॉयपासून मोबाइल कव्हर्स, हेडफोन्स, लॅपटॉप कव्हर्स सहज उपलब्ध आहेत. हे चोचले लहान मुलांचे नक्कीच नाहीत. त्यामुळे याबाबत फक्त त्यांना दोष देता येणार नाही. हल्ली पार्लर्समध्ये अ‍ॅव्हेंजर्स, सुपरहिरो, मिनिअन, मिकी माऊस यांच्या आकारातील नेलआर्टसुद्धा करून मिळतात. मोबाइल कव्हर्सवर तुमच्या पसंतीचे कार्टून आणि त्याचा कोट छापता येतो. एकाच घरातील टी-शर्ट्सवर सध्या मिकी माऊसचे कॉमन प्रिंट करून घेण्याचा ट्रेंड सध्या सुरू आहे. पार्टी, पिकनिकसाठी असे टी-शर्ट्स पसंत केले जातात. ‘माय डॅड इज सुपरमॅन’, ‘वी आर टॉम-जेरी’ या आशयाची वाक्य असलेली टी-शर्ट्स सध्या बाजारात पाहायला मिळतात. त्यामुळे हे कार्टून्सचं गारूड फक्त लहान पोरांसाठीच आहे, असं अजिबात म्हणता येणार नाही. मोठय़ांनाही त्याचं कौतुक तितकंच आहे.

येत्या काळात हे वेड अजूनच वाढत जाणार. त्यामुळे कार्टून्सच्या मोहमायेतून आपली सुटका सध्यातरी शक्य नाही. आणि असा विचार जरी तुमच्या मनात आला, तर एकदा त्यांच्या गोंडस छबीकडे पहा. तुमचे विचार लगेच बदलतील. रोजच्या धावपळीत एक छोटासा तुकडा या बालपणीच्या मित्रांना द्यायला काय हरकत आहे.
मृणाल भगत – response.lokprabha@expressindia.com