पर्यटन
विजय दिवाण – response.lokprabha@expressindia.com
चीनपासून सुरू होऊन रोमपर्यंत जाणारा प्राचीन ‘सिल्क-रूट’, रेशीम उद्योगात त्या काळात चीनला असलेले महत्त्वाचे स्थान आणि तेथील या उद्योगाची सद्यस्थिती जाणून घेणे हा आगळा-वेगळा अनुभव ठरतो.

आम्ही चीनच्या दौऱ्यावर गेलो तेव्हा एका गोष्टीबद्दल प्रचंड कुतूहल माझ्या मनात होते. ती गोष्ट म्हणजे चीनमधील रेशीम उद्योग होय. लहानपणापासून आम्ही चीनपासून सुरू होऊन युरोपातील रोम शहरापर्यंत जाणाऱ्या या ‘सिल्क-रूट’ बद्दल किंवा रेशीम-मार्गाबद्दल वाचत-ऐकत आलो होतो. हा जागतिक व्यापारमार्ग ख्रिस्त पूर्व २०० वर्षांपूर्वी सुरू झाला, आणि इसवीसनाच्या चौदाव्या शतकापर्यंत तो वापरात होता. उंटांवर आणि गाढवांच्या पाठींवर रेशीम आणि इतर माल लादून निघालेले व्यापाऱ्यांचे तांडे या साडेसहा हजार किलोमीटर्स लांबीच्या व्यापारमार्गावरून युरोपकडे जात असत. हा रेशीम-मार्ग चीनमधील शिआन् शहरापासून सुरू होई. तिथून चीनची प्रसिद्ध िभत ओलांडून पुढे ताकलिमाकन वाळवंटातून आणि वायव्येकडील तिबेटचे पठार ओलांडून हा व्यापारमार्ग भारतातील लडाख प्रांतात असणाऱ्या काराकोरम पर्वतांतून जाई. पश्चिमेकडील अफगाणिस्तान, पíशया, इजिप्त या देशांतून तो तुर्कस्तानातील इस्तंबूल शहरापर्यंत जाई. अतिप्राचीन आणि प्रदीर्घ लांबीच्या अशा या रेशीममार्गावरचा प्रवास अत्यंत खडतर असे. ताकलिमाकन हे चीनमधील एक खूपच विस्तीर्ण आणि रखरखीत असे वाळवंट आहे. तिथे उन्हाळ्यात तापमान ५० अंशांच्या वर जाते, आणि हिवाळ्यात ते उणे २० अंश एवढे खाली असते. शिवाय या वाळवंटात धुळीची वादळे सतत होतात. प्राचीन काळी इतके टोकाचे हवामान असणारे वाळवंट पार करून रेशीम नेणाऱ्या तांडय़ांना नंतर हिमालय, काराकोरम आणि कुनलुन पर्वतांच्या राशींमधून जावे लागे. या मार्गावरून होणारा प्रवास केवळ खडतरच नव्हे तर धोक्याचाही असे. या मार्गावर जाणारे कित्येक व्यापारी तांडे वाळवंटातील तीव्र वादळांमुळे किंवा पर्वतांतील हिमवर्षांवांमुळे पूर्णपणे नष्ट होऊन जात. जे नशीबवान व्यापारी आपले तांडे घेऊन इस्तंबूलपर्यंत पोहोचत, त्यांना तिथून आपला सारा माल जहाजांद्वारे युरोपातील रोम व इतर शहरांकडे पाठवावा लागे. या व्यापारी मार्गावरून पूर्वेकडील चीनमधून रेशीम आणि रेशमी वस्त्रे युरोपकडे पाठवली जात, आणि त्या बदल्यात युरोपमधून औषधे, अत्तरे, मौल्यवान रत्ने, लोकर, चांदी, सोने हा माल पूर्वेकडे नेला जाई.

Artificial General Intelligence (AGI)
AI आणि AGI मध्ये काय आहे फरक? लोकांना या नव्या तंत्रज्ञानाची भीती का वाटते?
loksatta analysis elon musk visits china to deals self driving
एलॉन मस्क यांच्या चीन दौऱ्याच्या केंद्रस्थानी सेल्फ ड्रायव्हिंग सॉफ्टवेअर… काय आहे ही प्रणाली? टेस्लासाठी चीन इतका महत्त्वाचा का?
Permits ethanol production from residual seed heavy plants Kolhapur
शिल्लक बी हेवी मळी पासून इथेनॉल निर्मितीस परवानगी; साखर उद्योगाला मोठा दिलासा
impact of us foreign policy on semiconductor industry
चिप-चरित्र : चिप उद्योगाचे ‘पूर्व’रंग

हे सगळे वाचलेले असल्याने चीनची राजधानी असलेल्या बीजिंग शहरात पोहोचलो, तेव्हा तिथल्या एखाद्या रेशीम उत्पादन केंद्राला भेट देण्याचे आम्ही ठरवले होते. तिथे लियांगुआन् रोडवर असणाऱ्या ‘आनहाऊ सिल्क फॅक्टरी’ला भेट दिली. त्या ठिकाणी आम्हाला रेशमाच्या किडय़ांची जोपासना कशी होते, त्यांच्याकडून रेशीम कसे पदा होते, आणि त्या रेशमाचे अखंड धागे काढून त्यांपासून उत्तमोत्तम वस्त्रे कशी विणली जातात याची प्रात्यक्षिके दाखवली गेली. तिकडेदेखील आपल्याप्रमाणेच तुतीच्या (मलबेरी) झाडांवर रेशमाच्या किडय़ांची जोपासना केली जाते. ख्रिस्तपूर्व ४०० वर्षांच्या पुरातन काळापासून चीनमध्ये रेशीम उत्पादन सुरू झाले होते. त्यामुळे त्याकाळी तिथे तुतीच्या लागवडीचे प्रमाण खूप जास्त असे. त्या काळात चीन हा रेशीम उत्पादन करणारा जगातला एकमेव देश होता. परंतु पुढे चालून इसवीसनाच्या तिसऱ्या शतकापासून रेशीम उत्पादनाचे तंत्र जगातल्या इतर अनेक देशांनी एकेक करून आत्मसात केले. त्यामुळे रेशीम उत्पादनात ‘एकमेवाद्वितिय’ असल्याचा चीनचा लौकिक नष्ट झाला. आणि त्यासोबत चीनमधील तुतीची लागवड कमी होत गेली. पण तरीही चीनचे रेशीम उत्पादन हे तुलनेने जगातील इतर राष्ट्रांपेक्षा जास्तच आहे. आज चीनचे कच्च्या रेशमाचे उत्पादन जगातील उत्पादनाच्या ८० टक्के आहे, आणि पक्क्या रेशमी धाग्यांचे उत्पादन हे जगाच्या ५० टक्के एवढे आहे.

‘रेशमाचा किडा’ असा ज्याचा आपण उल्लेख करतो, तो ‘बॉम्बिक्स मोरी’ नावाचा एक किडा आहे. इतर कोणत्याही कीटकाप्रमाणे त्याचेही जीवनचक्र अंडे, अळी, कोश, आणि पूर्ण वाढलेला पंखांचा किडा असेच असते. या विशिष्ट जातीचा किडा अंध असतो, आणि त्याला नीट उडता येत नाही. हे किडे तुतीच्या पानांवर वाढतात. त्यांच्या अळ्या तुतीचीच पाने खाऊन मोठय़ा होतात. या रेशमाच्या किडय़ांच्या अनेक उपजाती आहेत. त्यांतील काही उपजाती ओक वृक्षांच्या झाडांवर वाढतात. त्यांच्यापासून टसर-सिल्क नावांच्या जाड रेशमाचे उत्पादन होते. नर-मादी किडय़ांच्या मीलनानंतर चार दिवसांनी एकेक मादी ४०० ते ५०० अंडी घालते. प्रत्येक अंडे हे टांचणीच्या डोक्याएवढे असते. या अंडय़ांतून सुमारे एका आठवडय़ात रेशीम किडय़ांच्या अळ्या जन्म घेतात. त्यानंतर या अळ्यांची पूर्ण वाढ होण्यासाठी २० ते २८ दिवसांचा कालावधी लागतो. या काळात त्या अळ्या तुतीची पाने खाऊन मोठय़ा होतात. २८ दिवसांनंतर प्रत्येक अळी तिच्या तोंडातील ग्रंथींमधून एक अखंड असा धागा स्रवू लागते. तोच खरा रेशमाचा धागा होय. हा धागा स्रवत असताना ही अळी स्वत:भोवती गोल गोल गिरक्या घेत राहते. त्यामुळे स्रवलेला धागा आळीच्या शरीराभोवती गुंडाळला जाऊन हळूहळू अळीभोवती त्या धाग्याचा कोश तयार होतो. निसर्गत: सुमारे ४० ते ६० दिवसांच्या अवधीत या कोशाच्या आतमध्ये अळीचे रूपांतर पंखवाल्या किडय़ात होते. परंतु रेशीम उत्पादक लोक हे असे कोश तयार झाल्यावर ते गोळा करून उकळत्या पाण्यात टाकतात. त्यामुळे कोशांच्या आतील अळ्या मरून जातात. मग एकेका कोशातील मेलेली अळी काढून टाकून तो कोश काही काळ थंड पाण्यात भिजत ठेवला जातो. नंतर त्या कोशाचा रेशमी धागा सुटा करून घेतला जातो. त्या धाग्यावर प्रक्रिया करून आणि त्यास हवा तो रंग देऊन ते रेशीम वस्र्ो विणण्यासाठी वापरले जाते.

प्राचीन काळी चीनमध्ये लोक घरोघरी रेशमाचे किडे पाळून अगदी छोटय़ा प्रमाणावर त्यांचे रेशीम काढत, तेव्हा हे किडे पाळण्याचे आणि त्यांपासून रेशीम काढण्याचे तंत्रज्ञान आजच्यासारखे विकसित नव्हते. पण तिथल्या बहुतांश लोकांची उपजीविका या रेशीम उत्पादनावर अवलंबून असे. त्यामुळे देवाच्या दयेने हे रेशमी किडे खूप काळ जगावेत आणि त्यांनी भरपूर रेशीम द्यावे, म्हणून देवाला निरनिराळ्या प्रकारे साकडे घातले जात असे. प्राचीन काळातल्या हान्, िमग, क्विन्, शांग अशा सर्व चिनी राजघराण्यांचे राजे त्यांच्या राजवाडय़ांमध्ये एकेक देऊळ बांधून त्यांमध्ये रेशमाच्या किडय़ाची ‘देव’ म्हणून श्रद्धापूर्वक प्रतिष्ठापना करीत असत. ते त्या देवाला ‘लेझ्झू’ असे म्हणत. मध्ययुगीन काळात चीनमध्ये या लेइझू देवाचे पुतळे गौतम बुद्धाच्या पुतळ्यांच्या बरोबरीने उभे केले जात असत. तिकडच्या झेजियांग नामक प्रांतात होणाऱ्या क्विंगिमग उत्सवात तर या रेशमी किडारूपी ‘लेइझू’ देवासमोर छोटय़ामोठय़ा प्राण्यांचे बळी देऊन त्यास प्रसन्न करण्याचे प्रयत्नही होत असत. आपल्या घरांतल्या किंवा बागांतल्या रेशमाच्या किडय़ांना इतर किडींची किंवा रोगांची लागण होऊ नये म्हणून तिकडचे चिनी शेतकरी लाल रंगाच्या कागदांवर वाघांची चित्रे काढून तिथे लटकावत, आणि रेशीम किडे ठेवलेल्या जागी अधूनमधून धूप जाळून धूर करीत असत.

आज आताच्या काळात मात्र चीनमध्ये अत्यंत आधुनिक तंत्रे वापरून रेशीम किडय़ांचे संगोपन आणि रेशीम उत्पादन केले जाते. आता लाखो-करोडो युआन् गुंतवून मोठमोठय़ा शेड्समध्ये रेशीम किडे जोपासले जातात. या शेड्समध्ये कृत्रिमरीत्या नियंत्रित असे योग्य तापमान, पुरेशी खेळती हवा, आणि आद्र्रता राखली जाते. तुतीच्या किंवा मलबेरीच्या पानांऐवजी या रेशीम किडय़ांना सोयाबीन आणि मका यांची पावडर, बटाटय़ाचे स्टार्च आणि व्हिटॅमिन्स यांपासून तयार केलेले कृत्रिम खाद्य दिले जाते.

एकूणच रेशीम उत्पादनाची उलाढाल चीनमध्ये आता प्रचंड वाढलेली आहे. चीनमधून इतर देशांमध्ये होणारी रेशमाची निर्यातही प्रचंड वाढलेली आहे. चीन प्रतिवर्षी रेशमाचे कोश, कच्चे रेशीम, पक्के रेशीम, मलबेरीवरील रेशीम, घरगुती रेशीम, टसर रेशीम अशी रेशमाची निरनिराळी उत्पादने निर्यात करीत असतो. अलीकडच्या काळात चीनकडून होणारी ही निर्यात प्रतिवर्षी तीन लाख करोड डॉलर्सपर्यंत वाढलेली आहे.