08-dr-parag-lpएखाद महिन्याआधीची गोष्ट! पावसाचा जोर कमी झाला होता आणि ऊन पावसाचा खेळ सुरू झाला होता. कधी सुखद गारवा पावसाच्या शिडकाव्याबरोबर येत होता तर कधी असह्य़ उकाडा मुंबई स्टाइल!

तापमानाच्या या चढ-उतारामुळे डासांची पदास वाढणार आणि डेंग्यू, मलेरिया थमान घालणार याची मला खात्री होती. झालंही तसंच! पुढील काही दिवसांत सर्व दवाखाने आणि हॉस्पिटल्स या रुग्णांनी भरून गेली ती आजपर्यंत! कोणी ताप उतरत नाही म्हणून बेजार आहे, तर बहुतेक रुग्ण व त्यांचे नातेवाईक प्लेटलेट कमी झाल्या आहेत म्हणून चिंताक्रांत आहेत. आमच्याकडे सुतारकाम करणारा ओमप्रकाश त्याच्या बायकोला घेऊन आला – ‘‘बुखार जाता नही और पर में दाना दाना निकला.’’ पेशंटच्या पायावर सुईच्या टोकाएवढय़ा आकाराच्या ठिपक्यांची रांगोळीच उमटली होती. याला वैद्यकशास्त्रात पेटिकी म्हणतात. हे प्लेटलेट अतिशय कमी असल्याचे चिन्ह आहे. तिची डेंग्यू टेस्ट पॉझिटिव्ह होती आणि प्लेटलेट होत्या फक्त एक हजार! पुढील पाच दिवस रोज तिला प्लेटलेट दिल्या तेव्हा तिच्या प्लेटलेटची संख्या सुधारली.

मुंबई-ठाणे यांसारख्या महानगरातच नव्हे तर ग्रामीण भागात पण डेंग्यूने थैमान घातले आहे. जगातील १२२ राष्ट्रात डेंग्यू ही आरोग्य समस्या झाली आहे. तापाच्या रुग्णांकडे डेंग्यूचं नाव जरी काढलं तरी रुग्ण आणि नातेवाईक हादरून जातात. ‘डेंग्यू नको हो’, अशीच सर्वाची प्रतिक्रिया असते. याला कारण डेंग्यूविषयी असलेले गरसमज आणि निर्माण झालेली भीती.

डेंग्यूचा आजार एडिस जातीचा डास चावल्याने होतो व हे डास स्वच्छ पाण्यात वाढतात! या डासांची पदास रोखण्यासाठी घरात व परिसरात पाणी जमा होऊ देऊ नये तसेच साठवलेल्या पाण्यावर झाकण ठेवावे हे ज्ञान प्रसारमाध्यमातून आजवर मिळाले आहे. परंतु डेंग्यूविषयी असणारी भीती व गरसमज दूर करण्यासाठी होणारे प्रयत्न कमी पडत आहेत, असे लोकांच्या मनातील भीती व अज्ञान पाहून स्पष्ट होते.

डेंग्यूला सर्व घाबरतात कारण – ‘डेंग्यूला ट्रीटमेंट नाही’. पण हे अर्धसत्य आहे. डेंग्यू हा विषाणूने होणारा आजार आहे व तो  ‘सेल्फ लिमिटिंग’ म्हणजेच ठरावीक कालावधीनंतर उपचाराविना बरा होणारा आजार आहे. डेंग्यूमध्ये इतर व्हायरल तापासारखीच लक्षणे असतात आणि उपचार हे या लक्षणाप्रमाणे सर्वसाधारण तापामध्ये करतो तसेच करायचे असतात. साधारण पाच ते सात दिवसांत ताप जातो. तोपर्यंत रुग्णाला तापासाठी पॅरासिटामोल, तोंडाने भरपूर द्रवपदार्थ देणे आणि पूर्णपणे आराम देणे एवढेच आवश्यक असते.

डेंग्यूचा प्रत्येक रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल करणे आवश्यक असते – हा एक आणखी गरसमज! रुग्णाचा ताप उतरत नसेल, पोटात अन्न राहत नसेल, प्लेटलेट ५० हजारांपेक्षा कमी असतील, श्वास घ्यायला त्रास होत असेल तर हॉस्पिटलमध्ये दाखल होणे गरजेचे आहे. अंतिम निर्णय हा उपचार करणाऱ्या डॉक्टरच्या सल्ल्याने घेणे योग्य!

डेंग्यूचा ताप आला की मृत्यूचा धोका वाढला – हा एक आणखी वेडा समज! डेंग्यूमुळे तसेच प्लेटलेट कमी झाल्याने मृत्यू होत नाही. डेंग्यूच्या रुग्णामध्ये ‘डेंग्यू हेमरजिक फीवर’ व ‘डेंग्यू शॉक सिंड्रोम’ या दोन प्रकारांची गुंतागुंत झाल्याने मृत्यू होतो, केवळ प्लेटलेट कमी झाल्याने नाही! या दोन्ही गुंतागुंतीसाठी आईसीयूमध्ये उपचार करणे आवश्यक असते. वेळेवर निदान आणि योग्य उपचाराने मृत्यूचे प्रमाण पाच टक्के इतपत राहू शकते. यापेक्षा जास्त मृत्यूचे प्रमाण मुंबईमधील रस्त्यांवर व मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर होणाऱ्या अपघातांमध्ये असेल!

प्लेटलेट कमी झालेल्या प्रत्येक रुग्णाला प्लेटलेट बाहेरून देणे गरजेचे असते हा एक आणखी गरसमज!  – जगातील तज्ज्ञ डॉक्टर्स तसेच सरकारने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार प्लेटलेट संख्या दहा हजारांपेक्षा कमी असेल किंवा कमी प्लेटलेटबरोबर शरीरात रक्तस्राव होत असेल तर प्लेटलेट संक्रमण (platelet transfusion) आवश्यक ठरते. याप्रमाणे गरज नसताना प्लेटलेट संक्रमण केल्यास जिवाला घातक ठरते.

किवी, पपई तसेच ड्रॅगॉनफ्रूट यांसारखी फळे व त्यांचा रस घेतल्याने आणि पपईच्या पानाचा रस घेतल्याने प्लेटलेट वाढतात हासुद्धा एक आणखी मोठा गरसमज. या गोष्टींच्या सेवनाने प्लेटलेट वाढतात याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. आधुनिक वैद्यकशास्त्रात प्रत्येक उपचारपद्धतीला शास्त्रीय पुराव्याचे पाठबळ आवश्यक असते. हजारो रुग्णांमध्ये एखादी उपचारपद्धती वापरून संख्याशास्त्राच्या आधाराने ती उपचारपद्धती बहुसंख्य रुग्णांना लाभदायक ठरत असेल तरच तिचा स्वीकार केला जातो. पपईच्या पानाच्या रसाबाबतीत असा कोणताही शास्त्रीय आधार उपलब्ध नाही. डेंग्यूच्या दोन रुग्णांना पपईच्या पानाचा रस घेतल्याने उलटी, जुलाब होऊ लागले व त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले.

सिंगापूरमधील युनिव्हर्सटिीमध्ये डेंग्यूविषयी खूप मोठय़ा प्रमाणावर संशोधन चालू आहे. या संशोधन कार्यक्रमाचे उपप्रमुख इओंग यांची मुलाखत १२ सप्टेंबरला एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. पपईच्या पानांच्या रसाचा प्लेटलेट वाढण्यासाठी उपयोग होतो याला शास्त्रीय आधार नाही, हे त्यांनीदेखील ठामपणे सांगितले आहे. डेंग्यूचा आजार हा इतर व्हायरल तापासारखाच एक आजार आहे. सर्वसामान्य जनतेच्या मनातील गरसमज, अर्धवट माहिती आणि त्यातून निर्माण होणारी भीती यामुळे या आजाराने भीतीदायक स्वरूप धारण केले आहे. डेंग्यूचा मुकाबला करण्यासाठी सर्वप्रथम या गरसमजांना नष्ट करणे गरजेचे आहे.
डॉ. पराग देशपांडे – response.lokprabha@expressindia.com