नाशिक शहरात मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांची दहशत अधुनमधून अधोरेखित होत असताना दुसरीकडे रस्त्यांवर आडवेतिडवे पळणाऱ्या कुत्र्यांमुळे अपघातांच्या प्रमाणातही लक्षणीय वाढ होत आहे. मोकाट कुत्र्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी महापालिका निर्बीजीकरण शस्त्रक्रियेवर दरवर्षी लाखो रुपयांचे द्रव्य खर्ची करते. तथाापि, त्यांची संख्या काही केल्या कमी होत नसल्याचे चित्र आहे.

पिसाळलेल्या व मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ शहवासीय अनेकदा अनुभवतात. कुत्र्यांच्या हल्ल्यात कधी शाळकरी विद्यार्थी तर कधी महिला तर कधी इतर नागरिकांनाही जायबंदी व्हावे लागले आहे. सातपूर परिसरात अशाच स्वरूपाच्या हल्ल्यात सात ते आठ जण जखमी झाले होते. सिडकोसह इतर परिसरातही अशा घटना घडतात. काही वर्षांपूर्वी भाभानगर परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने तीन बालकांचा चावा घेऊन सहा महिन्यांच्या चिमुरडीला पळवून नेण्याचा प्रयत्न केला होता. बाळाच्या आईने धैर्य दाखविल्याने चिमुकल्याची कुत्र्याच्या तावडीतून सुटका होऊ शकली. या स्वरूपाची घटना घडली, ओरड झाली की, महापालिकेची यंत्रणा त्या त्या परिसरात कुत्र्यांची धरपकड व निर्बीजीकरण करण्याची धडपड दाखविते. पुढील वेळी केवळ ते स्थळ बदललेले असते, असा सर्वाचा अनुभव आहे. गल्लीबोळात मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांमुळे शहरवासीयांना अक्षरश: जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागते. रात्रीच्या सुमारास त्यांचा उपद्रव अधिकच वाढतो. गेल्या काही वर्षांत कुत्र्यांमुळे घडलेल्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. कुत्रा आडवा आल्याने दुचाकी घसरून एका छायाचित्रकाराला प्राण गमवावे लागले होते. अशा घटनांमध्ये कोणाचा हात मोडला तर कोणाचे डोके फुटले. अशी असंख्य उदाहरणे आहेत. त्या अनुषंगाने पोलीस दप्तरी नोंद नाही. त्यामुळे कुत्र्यांमुळे नेमके किती अपघात घडले याची स्पष्टता होत नाही.

सद्य:स्थितीत शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या ३० हजारांहून अधिक असल्याचा पालिकेचा अंदाज आहे. ही संख्या वाढू नये, याकरिता महापालिका कित्येक वर्षांपासून कुत्र्यांवर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करत आहे. दरवर्षी सरासरी सहा ते सात हजार कुत्र्यांवर ही शस्त्रक्रिया केली जाते. त्याकरिता ५० ते ७५ लाख रुपये खर्च होतात. परंतु मोकाट कुत्रे कमी झाल्याचे दृष्टिपथास पडत नाही. पालिकेच्या पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे यांच्या म्हणण्यानुसार निर्बीजीकरणाचे प्रमाण आणि भटक्या कुत्र्यांची वाढणारी संख्या यांचे प्रमाण व्यस्त आहे. निरंतर निर्बीजीकरणाची प्रक्रिया सुरू असल्याने नागरिकांच्या तक्रारींमध्ये घट झाल्याचा दाखला ते देतात. काही वर्षांपूर्वी भटक्या कुत्र्याच्या उपद्रवाबद्दल पालिकेकडे दिवसाला ८ ते १० तक्रारी येत असत. आता हेच प्रमाण दिवसाला ३-४ म्हणजे निम्म्याने कमी झाल्याचा दावा ते करतात. आरोग्य विभागाचे श्वान पकडणारे पथक मोकाट कुत्र्यांना पकडते. निर्बीजीकरण झाल्यानंतर ज्या भागातून त्याला पकडले होते, तिथेच सोडणे बंधनकारक आहे. अनेकदा त्यास नागरिकांचा आक्षेप असतो. प्रबोधनाच्या माध्यमातून त्यांची समजूत काढली जाते.  उघडय़ावर अन्न न टाकल्यास ही संख्या कमी करता येईल हे संबंधितांना पटवून दिले जाते.

ज्या ठिकाणी पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला वा तत्सम प्रकार घडतात, त्या ठिकाणी लगेचच विशेष मोहीम राबविली जाते. या स्वरूपाच्या तक्रारींना तातडीने प्रतिसाद देऊन कार्यवाही केली जाते. आता ऑनलाइन तक्रारी प्राप्त होत असल्याने त्यावर काय कारवाई झाली याची माहिती सर्वाना उपलब्ध असल्याकडे महापालिका लक्ष वेधते. परंतु तक्रार देण्याची वेळच नागरिकांवर येऊ नये, अशी व्यवस्था होत नसल्याने मोकाट कुत्र्यांची दहशत कायम आहे.

एककलमी निर्बीजीकरण कार्यक्रम

महापालिका दरवर्षी सरासरी सहा ते सात हजार कुत्र्यांवर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करते. महापालिकेने माहितीच्या अधिकारात दिलेल्या माहितीनुसार २००७ ते फेब्रुवारी २०१३ या सहा वर्षांत ३६ हजार ७३२ कुत्र्यांवर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यात १९,६३२ नर तर १७,१०० मादींचा समावेश आहे. त्यापुढील म्हणजे १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१५ या कालावधीत ४३४६ मोकाट ही शस्त्रक्रिया करण्यात आली.
अनिकेत साठे – response.lokprabha@expressindia.com