थायलंडमधील राजेशाहीविरोधात धुमसणारा असंतोष पुन्हा उफाळून आला आहे. ‘आम्हाला खरी लोकशाही हवी आहे,’ अशा घोषणा देत विद्यापीठे आणि महाविद्यालयांच्या कॅम्पसमधून विद्यार्थिनी-विद्यार्थी राजवाडय़ाच्या दारापर्यंत पोहोचले आहेत. आम्हाला राजाची गरजच काय, संसद बरखास्त करा, विरोधकांचा छळ थांबवा, आदी दहा मागण्या विद्यार्थी आंदोलकांनी केल्या आहेत. राजेशाहीविरोधात बोलणे या गुन्ह्य़ासाठी १५ वर्षांची शिक्षा होऊ शकते, हे माहीत असूनही विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. विशेष म्हणजे, ताज्या निदर्शनांचे नेतृत्व प्रामुख्याने विद्यार्थिनी करीत आहेत. परदेशी माध्यमांनी या उद्रेकाचे वृत्तांकन करताना त्यातल्या तरुणींच्या सहभागालाच अधोरेखित केले आहे.

‘न्यू यॉर्क टाइम्स’ने ‘थायलंडमधील निदर्शनांमध्ये तरुणी आघाडीवर’ अशा शीर्षकाचा वृत्तान्त प्रसिद्ध केला आहे. ‘हजारोंच्या संख्येने एकत्र आलेल्या लोकशाही समर्थकांच्या समूहांमध्ये एक उदयोन्मुख राजकीय शक्ती आहे, ती म्हणजे तरुणी!,’ अशी या वृत्तान्ताची सुरुवात आहे. तेथील लष्कर, राजेशाही आणि बौद्ध भिक्षूकशाही या संस्थांच्या नियंत्रणाखालील पितृसत्तेच्या विरोधात महिला- त्यातही विद्यार्थिनी आवाज उठवत आहेत, असे निरीक्षण या वृत्तान्तात नोंदवले आहे. निदर्शनांचे नेतृत्व करणाऱ्या पनुसाया सिथिजीरावत्तनकुल, चुमापोर्न ताएंगक्लियांग, सिरीन मुंगचारोएन या तरुणींच्या निर्धाराने भरलेल्या विधानांची जोडही त्याला आहे. ‘थायलंडमध्ये राजेशाही आणि लष्कराला सर्वाधिकार आहेत. त्याचबरोबर समाजातही पुरुषच सर्वाधिकारी आहेत, हे सांगताना मला भीती वाटत नाही,’ हे पनुसायाचे वक्तव्य; तसेच चुमापोर्न आणि सिरीन यांचे राजेशाहीच्या आधिपत्याखालील पुरुष-श्रेष्ठत्वाची समाजरचना नष्ट करण्याचे आवाहन ‘न्यू यॉर्क टाइम्स’ने ठळकपणे प्रसिद्ध केले आहे.

अर्नोन नम्पा या ३६ वर्षीय मानवाधिकार वकिलाने थायलंडमधील राजेशाहीच्या अधिकारांचा व अर्थसंकल्पातील त्यांच्यासाठीच्या तरतुदींचा संकोच करण्याची मागणी सर्वप्रथम जाहीरपणे केली होती. ती निदर्शकांची आजची प्रमुख मागणी आहे. ‘टाइम’ नियतकालिकाच्या संकेतस्थळाने अर्नोन नम्पा यांच्या मुलाखतीवर आणि त्यांच्याविषयीच्या इतरांच्या निरीक्षणांवर आधारित विशेष वृत्तलेख प्रसिद्ध केला आहे. त्यात अर्नोन यांचे वर्णन एखाद्या कथेतल्या प्रमुख व्यक्तिरेखेप्रमाणे करून अन्य काही कार्यकर्त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांचे वैचारिक व्यक्तिमत्त्व रेखाटले आहे. ‘लोक दडपशाहीला कंटाळले आहेत, अस्वस्थ आहेत. थायलंडच्या राजकारणात राजेशाहीची नेमकी भूमिका काय, यावर गंभीरपणे चर्चा करण्याची गरज आहे,’ या अर्नोन यांच्या म्हणण्याबरोबरच, ‘अर्नोन या तरुणाने निश्चितपणे एक ठिणगी पेटवून समाजात महत्त्वाच्या विषयावर चर्चा घडवली आहे,’ हे नुत्ता महत्ताना या एका प्रमुख कार्यकर्तीचे त्यांच्याबद्दलचे निरीक्षणही ‘टाइम’च्या वृत्तलेखात वाचायला मिळते.

‘बीबीसी’च्या वृत्तांकनात थायलंडमधील राजकीय व्यवस्थेची माहिती देण्याबरोबरच निदर्शनांची कारणमीमांसाही करण्यात आली आहे. आंदोलक विद्यार्थी नेत्यांच्या अवतरणांची आणि ‘बीबीसी’चे दक्षिण-पूर्व आशियाचे प्रतिनिधी जोनाथन हेड यांच्या विश्लेषणाची जोडही या वृत्तांकनाला आहे. राजकीय गैरव्यवहार, करोना संकटामुळे सुरू असलेली आर्थिक घसरण आणि राजेशाहीचा चिंताजनक ‘अधिकारविस्तार’ यामुळे तरुणांमध्ये असंतोष निर्माण झाल्याचा निष्कर्ष हेड यांनी काढला आहे. घटनादुरुस्तीवर चर्चेस सहमती दर्शविण्यापर्यंत विद्यार्थ्यांनी दबाव निर्माण केला आहे. राजेशाही आणि लष्कराचे अधिकार कमी करण्याच्या मागणीस मात्र परंपरावादी राजकारण्यांचा विरोध आहे. परंतु तरुणांची ही चळवळ आता थांबणार नाही, असेही हेड यांनी म्हटले आहे. निदर्शनांना कुठेही हिंसेचे गालबोट लागले नसल्याकडे आणि तरुणींचा मोठय़ा प्रमाणावर सहभाग हे ताज्या उद्रेकाचे वेगळेपण असल्याकडे ‘बीबीसी’ने लक्ष वेधले आहे. ‘राजेशाही नष्ट करणे नव्हे, तर तिचे आजच्या संदर्भात आधुनिकीकरण करण्याचा आमचा आग्रह आहे,’ या विद्यार्थी नेता पनुसाया हिच्या वक्तव्याचा उल्लेखही या वृत्तांकनात आहे.

थाई विद्यार्थी राजेशाहीविरोधात निदर्शने का करीत आहेत, याचा वेध ‘अल् जझिरा’च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या वृत्तातही घेण्यात आला आहे. शक्तिशाली राजेशाही आणि लष्करसमर्थक नेत्यांच्या विरोधात विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरणे हा थाई राजकारणाचा वळणबिंदू (टर्निग पॉइंट) आहे, अशी टिप्पणीही या वृत्तात आहे. ‘सर्वात मोठी आणि साहसी निदर्शने’ असे या असंतोषाचे वर्णन ‘अल् जझिरा’ने केले आहे. तेथील सर्वात शक्तिशाली राजा महा वजीरालोंगकोर्न आणि पंतप्रधान प्रयुथ चान-ओचा यांच्या विरोधात एक नवी राजकीय व्यवस्था निर्माण करण्यासाठी विद्यार्थी आणि तरुण-तरुणींनी चळवळ उभारली आहे, असे निरीक्षण ‘अल् जझिरा’नेही नोंदवले आहे.

(संकलन : सिद्धार्थ ताराबाई)