विनय जोशी

जगापासून दूर एका बंदिस्त ‘घरात’ काही लोकांना खूप महिने कोंडून ठेवलं आहे आणि त्यांच्यावर सतत कंट्रोल स्टेशनमधल्या लोकांची नजर आहे किंवा काही लोकांना जिवावर उदार होत कठीण परिस्थितीत काही टास्क पूर्ण करायचे आहेत. आपल्याला असे  प्रसंग सांगितले, तर डोळय़ासमोर पटकन टीव्हीवरचे रिअ‍ॅलिटी शोज येतील; पण या लुटुपुटुच्या रिअ‍ॅलिटीपेक्षा खऱ्या आव्हानांना तोंड देत आयएसएसच्या बिग बॉस घरात राहणारे खरे खतरों के खिलाडी म्हणजे अंतराळवीर आहेत. विविध प्रतिकूल परिस्थितीत स्पेस स्टेशनमध्ये राहणाऱ्या या अंतराळवीरांची दिनचर्या आणि अधांतरीचा प्रपंच कुतूहलाचा विषय आहे.

sensex again at the level of 74 thousand print eco news
तेजीवाल्यांची पकड मजबूत; सेन्सेक्स पुन्हा ७४ हजारांच्या उंबरठ्यावर
Chaturgrahi Yog in meen rashi
Chaturgrahi Yog : १०० वर्षानंतर चतुर्ग्रही योग; ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा, होऊ शकतो मोठा धनलाभ
china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..

स्पेस स्टेशनवर दर ९० मिनिटांनी पृथ्वीआडून सूर्य उगवतो, त्यामुळे आपल्यासारखे दिवसरात्र असे चक्र नाही. ग्रीनविच टाइम प्रमाण मानून तिथली दिनचर्या आखली जाते. सकाळी ६ वाजता पृथ्वीवरच्या मिशन कंट्रोल सेंटरच्या वेक-अप कॉलने दिवस सुरू होतो. पृथ्वीप्रमाणे तिथेही ब्रश, आंघोळ, शेव्हिग अशी शरीराची स्वच्छता ही अत्यंत आवश्यक असतेच. फक्त पाण्याचा वापर जपून करावा लागतो. पाणी वाचवण्यासाठी फेस न होणारा साबण आणि खाता येऊ शकणारी टूथपेस्ट वापरली जाते. इथे आंघोळ म्हणजे अंगाला लिक्विड सोप लावून ओल्या टॉवेलने पुसणे! टॉयलेट वेगळय़ा पद्धतीचे असते. याच्या विशिष्ट रचनेमुळे सक्शन प्रणालीद्वारे मल जमा केला जातो. अंतराळवीरांनी सकाळची नित्यकर्मे आटोपली की सकाळची स्थानकाची पाहणी होते आणि  त्यानंतर नाश्ता होऊन  मिशन कंट्रोल सेंटरसोबत रोजची मीटिंग होते. यात चाललेल्या प्रयोगांचा आढावा घेत दिवसभराच्या कामांची आखणी केली जाते.

त्यानंतर व्यायामाचे पहिले सत्र होते. अंतराळात दीर्घकाळ राहिल्यास होऊ शकणारी हाडांची झीज आणि स्नायूंची कमजोरी टाळण्यासाठी अंतराळवीरांसाठी व्यायाम हा दिनचर्येचा महत्त्वाचा भाग आहे. ट्रेड मिल, सायकल, अर्गोमीटर यांसारख्या उपकरणावर त्यांना रोज २ तास व्यायाम करावा लागतो. ही उपकरणे पृथ्वीपेक्षा वेगळय़ा पद्धतीने बनवलेली असतात. अंतराळात गुरुत्वाच्या अभावामुळे वजन जाणवत नाही. त्यामुळे वेटलिफ्टिंग आणि इतर व्यायामांसाठी अ‍ॅडव्हान्स्ड रेझिस्टिव्ह एक्सरसाइज डिव्हाइस (ARED) हे खास मशीन उपयोगात येते. यात व्हॅक्यूम सिलेंडरच्या साहाय्याने बारवर २७२ किलोपर्यंत प्रतिरोध निर्माण करता येतो. हा बार खेचत अंतराळवीर स्क्वॉट, बेंच प्रेस, डेड लिफ्ट्स असे व्यायाम प्रकार करू शकतात. कार्डिओ एक्सरसाइजसाठी त्यांना ट्रेडमिल आणि  सायकिलग करावी लागते.

यानंतर नेमून दिलेली अनेक कामे करण्यात अंतराळवीर व्यग्र होतात. पदार्थविज्ञान, जीवशास्त्र, शरीरशास्त्र, हवामानशास्त्र, वैद्यकशास्त्र अशा अनेक क्षेत्रांत महत्त्वपूर्ण संशोधन स्पेस स्टेशनवर सुरू असते. हे प्रयोग करून त्यांचे निष्कर्ष नोंदवले जातात. मिशन कंट्रोल सेंटरद्वारे स्टेशनची सतत  निगराणी ठेवली जाते. या सूचनांप्रमाणे अंतराळवीरांना स्पेस स्टेशनची दुरुस्ती आणि देखभाल ठेवावी लागते. स्टेशनची स्वच्छता राखणे हेदेखील मोठे काम असते. भिंती व तळाकडील पृष्ठभाग वेळोवेळी साफ करावा लागतो. हवा शुद्ध राहण्यासाठी लावलेले फिल्टर्स नियमित बदलावे लागतात.

दुपारी १ पर्यंत काम केल्यांनतर अंतराळवीर जेवण करून थोडी विश्रांती घेतात. इथे सगळय़ा गोष्टी तरंगत असल्याने जेवण करणं हीसुद्धा एक कसरत असते. बहुतेक पदार्थ हे सीलबंद पाऊचमध्ये असतात. साधारण २ महिन्यांनी स्थानकाला भेट देणाऱ्या मानवरहित कार्गो मोहिमेतून डिहायड्रेटेड खाद्यपदार्थ आणि भाज्या – फळे अशा ताज्या पदार्थाचा पुरवठा करण्यात येतो. चीज, फळे, केक असे पदार्थ आहेत तसे खाता येतात, पण डिहायड्रेटेड पदार्थ खाण्याआधी  त्यांना वॉटर गनने ओलसर करावे लागते. मीठ आणि मिरपूडसुद्धा तरंगू नये म्हणून द्रवरूपात असतात. अवकाश स्थानकात पदार्थ गरम करण्यासाठी ओव्हनची सोय आहे. चहा, कॉफी, फळांचे ज्यूस, लेमोनेड असे पेय पाऊचमधून स्ट्रॉच्या मदतीने पिता येतात. आयएसएसमध्ये सहभागी देशांचे प्रतिनिधित्व करणारे अमेरिकन, रशियन, युरोपियन, जॅपनीज असे ३०० पेक्षा अधिक खाद्यपदार्थ इथे उपलब्ध करून दिले आहेत. स्टेशनवर पुरेसा पाणीसाठा आहे, पण पृथ्वीवरून तिथे पाणी घेऊन जाणे खर्चीक गोष्ट ठरते. वापरलेले पाणी, मलमूत्र, हवेतील आद्र्रता अशा प्रत्येक स्रोतापासून मिळणारा पाण्याचा थेंब न थेंब वाचवून प्रक्रिया करून पुन्हा शुद्ध पाण्यात परिवर्तन केले जाते.

अशा प्रकारे दिवसभर साधारण १० तास काम  करून थकलेले अंतराळवीर रात्री ९:३० च्या सुमारास  झोपी जातात. वजनरहित अवस्थेत भरकटू नये म्हणून त्यांना स्लीपिंग बॅगमध्ये झोपून भिंतीला जखडून घ्यावे लागते. इथे वर किंवा खाली असा प्रकार नसल्याने कोणत्याही स्थितीत झोपता येते. या झोपेत त्यांना छान स्वप्नेही पडतात. काही जण तर चक्क घोरतातही! आठ तासांच्या पुरेशा झोपेनंतर ह्युस्टन टेक्सास इथल्या मिशन कंट्रोल सेंटर इथून प्रक्षेपित गाण्याने अंतराळवीरांना उठवले जाते आणि स्पेस स्टेशनवर आणखी एक दिवस सुरू होतो.

स्पेस स्टेशनमध्ये राहणं म्हणजे फक्त काम आणि काम नाही. वीकेंडला सुट्टीच्या दिवशी आणि इतर वेळी फावल्या वेळेत अंतराळवीर गाणी ऐकतात, फिल्म बघतात, पुस्तकं वाचतात, फोटोग्राफी करतात. ‘द मार्शियन’ या फिल्मचे पृथ्वीवरून स्पेस स्टेशनमध्ये खास स्क्रीनिंग झाले होते. अंतराळवीर आठवडय़ातून एकदा पृथ्वीवर संपर्क साधून कुटुंबीयांची ख्यालीखुशाली विचारतात, पण खिडकीतून  निळय़ाशार पृथ्वीकडे बघत बसणं यापेक्षा जास्त आनंद इतर कशातच नसतो!

स्पेस स्टेशनच्या आत पृथ्वीप्रमाणेच हवेचा दाब, तापमान, ऑक्सिजनचे प्रमाण राखले जात असल्याने अंतराळवीरांना आत स्पेससूट घालायची गरज नसते. स्टेशनच्या आत नेहमीचेच कपडे घातले जातात. कपडे धुता आणि इस्त्री करता येत नसल्याने कपडय़ांचे अनेक सेट न्यावे लागतात. दुरुस्ती आणि निगराणीसाठी स्पेस स्टेशनच्या बाहेर जातेवेळी मात्र त्यांना स्पेस सूट घालावा लागतो. स्पेस सूटमुळे स्टेशनबाहेर ऑक्सिजन आणि तापमान नियंत्रण या जीवनावश्यक गरजा तर पुरवल्या जातात; पण अंतराळातील कॉस्मिक किरणे, रेडिएशन, छोटे उल्का अशा धोक्यांपासून रक्षणदेखील होते. पृथ्वीवरून येताना किंवा परत जाताना स्पेसक्राफ्टमध्ये बसल्यावरदेखील सहा स्तरांचा हलका स्पेस सूट – इंट्राव्हेइक्युलर अ‍ॅक्टिव्हिटी (IVA) घालावा लागतो. स्टेशनच्या बाहेर निर्वात प्रदेशात काम करताना एक्स्ट्राव्हेइक्युलर मोबिलिटी युनिट (EMIJ) हा  १८ ते २० स्तरांचा स्पेससूट घातला जातो.

स्पेस सूटचा बाहेरील थर नोमेक्ससारख्या अग्निरोधक सामग्रीपासून बनविला जातो. याच्या खाली विशिष्ट प्रकारच्या नायलॉनचे अनेक स्तर असतात. सगळय़ात आत त्वचेलगत पाण्यामुळे थंड राहणाऱ्या वस्त्रांचा थर असतो. स्पेस सूटचा महत्त्वाचा घटक असणारे हेल्मेट पॉली काबरेनेट मटेरियलपासून बनवले जाते. स्टेशनजवळ काम करताना स्टेशनपासून जोडलेल्या नळीतून स्पेससूटमध्ये ऑक्सिजन आणि तापमान नियंत्रण राखले जाते; पण दूरवर काम करताना सगळय़ा जीवनावश्यक घटकांनी सुसज्य बॅगपॅक सोबत न्यावा लागतो. यात ऑक्सिजनचा पुरवठा, कार्बन डायऑक्साइड काढण्याची यंत्रणा, शरीराचे तापमान राखणारी यंत्रणा आणि संदेशप्रणाली असते.

अशा सुरक्षा कवचाने सुसज्ज होऊन स्टेशनबाहेर येऊन अंतराळवीरांनी अंतराळात केलेली रपेट म्हणेज एक्स्ट्राव्हेइक्युलर अ‍ॅक्टिव्हिटी (EVA). यालाच सोप्या भाषेत  ‘स्पेस वॉक’ म्हटले जाते. या क्रियेच्या नावात जरी वॉक असलं तरी प्रत्यक्षात अंतराळवीर तरंगत असतात. हे तरंगणे पाण्यात पोहण्यासारखे सोपे नसते. न्यूटनच्या गतीविषयक तिसऱ्या नियमाप्रमाणे पोहोताना आपण लावलेल्या बलावर पाण्याकडून प्रतिबल लावले जाते आणि आपण पुढे सरकतो. अंतराळात असे कुठलेही माध्यम नसल्याने पुढे जाण्यासाठी धक्का देणारे साधन गरजेचे ठरते. यासाठी अंतराळवीर जेट प्रॉपल्शन बॅगपॅक हे खुर्चीसारखे उपकरण घालतात. याला २८ निरनिराळय़ा ठिकाणी नायट्रोजनचे  झोत उत्सर्जित करणारे थस्र्टर्स  बसवलेले असतात. ज्या दिशेने झोत सोडला जाईल त्याच्या विरुद्ध दिशेला अंतराळवीर पुढे जातो. स्पेस स्टेशनबाहेर येऊन ‘स्पेसवॉक’ करणाऱ्या अंतराळवीरांना स्पेस स्टेशनचाच ताशी २७,६०० किमी वेग प्राप्त होतो. असे अंतराळवीर म्हणजे जणू पृथ्वीचे जीवनात उपग्रहच ठरतात. पुराणातील त्रिशंकू नावाच्या राजाला म्हणे सदेह स्वर्गात जायचे होते. विश्वामित्र ऋषींनी तपोबलाने त्याला स्वर्गात पाठवले खरे.. पण इंद्राने त्याला स्वर्गातून खाली ढकलले. तो पृथ्वीवर पडायच्या आत विश्वामित्रांनी त्याला पुन्हा वर ढकलले. स्वर्गातून इंद्र आणि पृथ्वीवरून विश्वामित्र दोघांनी त्याच्यावर लावलेले बल एकसारखे असल्याने बिचारा त्रिशंकू कायमचा अंतराळात उलटा लटकत राहिला. विज्ञानबलाने स्पेस स्टेशनमध्ये राहणाऱ्या अंतराळवीरांचे हे अधांतरीचे जगणे पुराणकथेतील त्रिशंकूपेक्षा अधिक आरामदायी आहे!