भारतीय दागिन्यांच्या कलाकुसरीची भुरळ परदेशातील सेलेब्रिटींनाही पडते आहे. यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात काही हॉलीवूड अभिनेत्रींनी खास भारतीय कारागिरांनी बनवलेले हिरेजडित दागिने मिरवले. रेड कार्पेटवर भारतीय डिझायनर दागिने पोचले डी बीअर्स या हिऱ्यांच्या ब्रॅण्डमुळे. फॉरएव्हरमार्क या त्यांच्याच एका ब्रॅण्ड अंतर्गत ऑस्कर सोहळ्याच्या रेड कार्पेट स्टायलिंगसाठी काही भारतीय बनावटीचे दागिने झळकवण्याचे ठरले आणि त्यासाठी ‘फॉरएव्हरमार्क’ने इथल्या काही ज्वेलर्सची मदत घेतली. लागू बंधू, निळकंठ ज्वेलर्स, त्रिभुवनदास भीमजी झव्हेरी, ए एस मोतीवाला, नारायण ज्वेलर्स या महाराष्ट्रातील काही ज्वेलर्सचाही यात समावेश होता. याशिवाय दिल्ली, जयपूर, बडोदा, चेन्नईच्या ज्वेलर्सनीही या उपक्रमासाठी दागिने घडवले होते. ‘फॉरएव्हरमार्क’चे हिरे वापरून या भारतीय ज्वेलर्सनी घडवलेले दागिने ऑस्करच्या रेड कार्पेटवर झळकले. व्हाइट आणि रोझगोल्डचा वापर करून बनवलेले हे दागिने ४ ते ८२ कॅरेटमध्ये घडवले गेले होते. इअररिंग, नेकलेस याशिवाय हातफूल, मांगटिकासारखी काही अस्सल भारतीय धाटणीची डिझाइन्स यामध्ये होती. इअरकफ्स, कॉकटेल रिंग्ज, आर्म ब्रेसलेट असेही दागिने त्यामध्ये होते.
( संकलन : वैष्णवी वैद्य)