वैष्णवी वैद्य मराठे

दागिने हे महाराष्ट्राच्या श्रीमंती आणि समृद्धीचं प्रतीक आहे. फक्त महाराष्ट्रच नाही तर भारतीय दागिने हे आपल्या दीर्घ इतिहास आणि परंपरांमुळे विशेष लोकप्रिय आहेत. दागिन्यांचा इतिहास उलगडायला गेलं तर प्राचीन काळातील मंदिरं, त्यांची संस्कृती, समुदायांचे स्थलांतर, आक्रमणे अशा कित्येक घटनांमधून प्रत्येक दागिना आणि आभूषण जन्मास आले, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. दसरा आणि दिवाळीच्या निमित्ताने खास पारंपरिक दागिन्यांविषयी जाणून घेण्याचा हा प्रयत्न..

regional discrimination, textile industry policy,
सांगली : वस्त्रोद्योग धोरणात प्रादेशिक भेदभावाचा आरोप, पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय – किरण तारळेकर
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
sharad pawar group
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळण्यावरून शरद पवार गटाचं भाजपावर टीकास्र; म्हणाले,“राम मंदिर अन् संसद भवनानंतर महाराष्ट्राच्या…”
Maharashtra Crime News
Crime News : महाराष्ट्रात चाललंय तरी काय? बदलापूर, मुंबई अकोल्यासह मुलींवर अत्याचाराच्या मन सून्न करणाऱ्या घटना
Badlapur Sexual Assault Marathi Actor Post
Badlapur Sexual Assault : “जबरदस्तीने स्त्रीचे कपडे काढले जातात, पण…”; बदलापूरमधल्या घटनेवर मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
Badlapur Crime News And Maharashtra Politics
Badlapur : बदलापूरमधली लैंगिक अत्याचाराची घटना आणि महाराष्ट्रात उठलेलं राजकीय वादळ
supriya Sule hopes that Maharashtra also gets justice
महाराष्ट्रालाही न्याय मिळावा;  सुप्रिया सुळे यांची अपेक्षा
jitendra awhad on uddhav thackeray
Jitendra Awhad : “महाराष्ट्रात अराजकता माजली आहे”, उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावरील हल्ल्यावरून जितेंद्र आव्हाडांची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, “फक्त एवढेच लक्षात ठेवा…”

प्रत्येक संस्कृतीचे प्रतीक आणि समाजाची ओळख म्हणून विशेष दागिने आहेत; पण त्याला फॅशनचे स्वरूप दिले ते माध्यमांमधून झालेल्या क्रांतीने. सध्या पाहायला गेलं तर विविध संस्कृतींचे सुंदर मिश्रण म्हणून स्त्रियांसह, पुरुषांसाठीही अनेक अलंकार आपल्याला पाहायला मिळतात. नेहमीच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांबरोबरच त्यात फ्युजन दागिने सध्या अधिक लोकप्रिय आहेत.

टेम्पल ज्वेलरी

टेम्पल ज्वेलरीचा ट्रेण्ड सध्या फार लोकप्रिय झाला आहे. इमिटेशनपासून ते अगदी ब्रॅण्डेड सोन्याचा ज्वेलरीमध्येही आपल्याला टेम्पल ज्वेलरी पाहायला मिळते आहे; पण हा मुक्त प्रकार नेमका काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करू या. आधी म्हटल्याप्रमाणे दागिन्यांची परंपरा ही प्राचीन काळापासून आहे. पूर्वी लखलखणारे दागिने हे फक्त मंदिरांमध्ये देवतांच्या अंगावर पाहायला मिळायचे. त्यावर विशिष्ट पद्धतीचे नक्षीकाम केलेले असायचे किंवा काही एलिमेंट्स वापरले जायचे. उदाहरणार्थ पूर्वी मिळणारी नाणी, पाचू, खडे, मोती यापासून केलेले दागिने. ते अर्थातच विविध धातूंपासून बनवले जायचे, त्यामुळे त्याची फिनिशिंगही विशिष्ट पद्धतीची असायची. आता आपण जी टेम्पल ज्वेलरी पाहतो ती आधुनिक डिझाईनप्रमाणे सोने वापरून केली जाते, पण तीसुद्धा फारच सुरेख आणि मोहक दिसते. त्यालाही न लखलखणारे, पण उठून दिसणारे असे मॅट फिनिशिंग असते. अगदी सामान्य मुलींपासून ते सेलिब्रिटीजपर्यंत सगळेच ही ज्वेलरी अगदी आवडीने परिधान करतात. मुलींचे असे म्हणणे आहे की, आपल्याला जर साऊथ-इंडियन लुक करायचा असेल तर टेम्पल ज्वेलरी हा उत्कृष्ट पर्याय आहे.

कुंदन ज्वेलरी

कुंदन ज्वेलरीची सुरुवात राजस्थानच्या शाही दरबारात झाली आणि नंतर मुघल काळात शाही थाट म्हणून त्याची लोकप्रियता वाढत गेली. कुंदन या शब्दाचा अर्थच अस्सल सोनं हा आहे. त्यामुळे राजपूत घराण्यात कुंदनचे दागिने हे २४ कॅरेट सोन्यापासून बनवले जायचे. कुंदन ज्वेलरीला सगळय़ात जुना इतिहास आहे असे मानले जाते. या दागिन्यांची कारागिरी आणि कलाकुसरी सगळय़ात सुंदर आणि देखणी असते. राजपूत घराण्याच्या शाही थाटाचे प्रतीक म्हणून हे दागिने राजपुती बायका परिधान करायच्या, एकेमकांना भेट द्यायच्या. कालानुरूप यांच्यात आता फक्त धातू थोडेफार बदलले गेले; परंतु त्यातली नजाकत आणि मूलतत्त्व बदललेले नाही. विविध आकारांची आणि फुलांची देखणी कारागिरी कुंदन ज्वेलरीमध्ये पाहायला मिळते. सध्या ब्रायडल ज्वेलरी म्हणून बऱ्याच प्रमाणात कुंदन ज्वेलरीचा वापर केला जातो. पेस्टल रंगांची फॅशन लोकप्रिय असल्याने कुंदन ज्वेलरीसुद्धा या प्रकारात जास्त प्रमाणात पाहायला मिळते. हा प्रकार थोडा हेवी असल्याने तशाच मोठय़ा समारंभांना परिधान केला जातो.

मीनाकारी ज्वेलरी

मीना काम असणारे दागिनेसुद्धा मुघल काळापासून प्रसिद्ध झाले. त्याचे मूळ जयपूर, राजस्थानमध्ये उलगडते. मीना कामासाठी दागिना सोन्यात घडवितात. दागिन्यावर नक्षी काढल्यावर त्यात रंग भरण्याच्या पद्धतीला मीना काम म्हणतात. यामुळे दागिना अधिक आकर्षक होतो. मीना करण्यापूर्वी नक्षीकाम केलेला भाग स्वच्छ व पॉलिश करतात आणि त्यानंतर मीना नक्षी काम केलेल्या भागात भरली जाते. पूर्वी या दागिन्यांमध्ये विशिष्ट रंगच वापरले जात होते. आता काळानुसार अनेक रंग वापरले जातात. तसेच, यात मीनाकारी पेंटिंगप्रमाणे केली जाते. आता आधुनिक रचनांचे दागिने मीना कामात येतात. हीसुद्धा ज्वेलरी थोडी हेवी असल्याने तशा पद्धतीच्या समारंभांमध्येच परिधान केली जाते. सध्या सणांच्या मांदियाळीत घागरा, हेवी गाऊन, सलवार कमीज, अनारकली अशा पोशाखांवर मीनाकारी ज्वेलरी अतिशय उठून दिसते.

रोझ गोल्ड ज्वेलरी

हा सगळय़ात लेटेस्ट आणि आधुनिक दागिन्यांचा प्रकार आहे. हिऱ्यांचे दागिने रोझ गोल्ड फिनिशिंगमध्ये बनवले जातात. यांच्यात धातू नाही तर दागिन्यांच्या फिनिशिंगला जास्त महत्त्व आहे. यामध्ये वापरलेले सोने हे लालसर गुलाबी रंगाचे असते, जेणेकरून तयार दागिन्यांचा रंगही तसाच दिसतो. याचे साधे सोपे कारण म्हणजे यांच्यात ७५ टक्के सोने व २५ टक्के इतर धातू वापरले जातात. हा पॉलिशचा प्रकार नसून मूलत: धातूमध्ये अशी पद्धत वापरली जाते ज्याने हा वेगळा रंग येईल. हा प्रकारसुद्धा पाश्चात्त्य संस्कृतीतून आपल्याकडे आलेला आहे. आता दागिनेच नाही तर इतर अनेक अ‍ॅक्सेसरीज रोझ गोल्ड प्रकारात मिळत आहेत. सध्या सिल्व्हर आणि गोल्डनपेक्षा तरुणांना या रंगाचे जास्त आकर्षण आहे. शक्यतो थोडय़ा इंडो-वेस्टर्न लुकला या रंगाचे दागिने जास्त उठून दिसतात.

ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी

ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी हे मूलत: चांदीचे दागिने आहेत, ज्याला एक मजबूत लेअर असतो ज्याने एक ट्रायबल किंवा अँटिक लुक मिळतो. हे दागिने तयार करण्यासाठी सल्फर किंवा विशेष रसायन वापरले जाते. चांदी आणि सल्फर यांच्यातील रिअ‍ॅक्शनमुळे वरच्या भागावर चांदीचा सल्फाइड थर तयार होतो. हे त्याच्यामागचे वैज्ञानिक कारण आहे; पण याचा कुठल्याही प्रकारे त्रास होत नाही. ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी सर्रास लोकप्रिय झाली आहे, ज्यात हजारो प्रकार, आकार, डिझाईन उपलब्ध आहेत. कुठल्याही पद्धतीच्या पोशाखावर तुम्ही ही ज्वेलरी स्टाइल करू शकता. सध्या मुली ब्रायडल ज्वेलरी म्हणूनसुद्धा ऑक्सिडाइज्ड दागिन्यांचा वापर करत आहेत. इंडो-वेस्टर्न स्टाइलमध्ये नोज-पिन, ब्रेसलेट, चोकर, अँकलेट असे अनेक प्रकार तुम्ही परिधान करू शकता.

मिनिमलिस्टिक ज्वेलरी

मिनिमलिस्टिक ज्वेलरी हा प्रकार विशिष्ट दागिना नसून ते परिधान करायची पद्धत आहे. सध्या तरुण मुलींची फॅशनची व्याख्या अतिशय बदलती आणि आधुनिक आहे. कपडे, स्टायिलगचे प्रकार सध्या तुम्हाला हव्या त्या आवडीप्रमाणे मिळू शकतात. त्यावर एक सट्ल ज्वेलरी परिधान केलेली छान दिसते. उदाहरणार्थ एकच चोकर, फक्त मोठे कानातले, एक लांब चेन, अशा पद्धतीने ज्वेलरी तुम्ही परिधान केलीत तर तुमचा लुक एलिगंट होतो. प्रोफेशनल वा नोकरी करणाऱ्यांना अशा पद्धतीचे लुक आवडतात, जे जास्त लाऊड नाहीत आणि दागिने घातल्याचे समाधानही तुम्हाला देऊन जातात. अगदी आत्ताचे उदाहरण द्यायचे झाले तर आलिया भटचा राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारतानाचा लुक मिनिमलिस्टिक ज्वेलरीमध्ये मोडतो.

महाराष्ट्रीय पोशाखात विशेषत: गेल्या काही पिढय़ांमध्ये पारंपरिक सौंदर्यदृष्टीला आधुनिकतेची जोड देऊन संस्कृती जपण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. आपण आता पाहिले ते सध्या सणावारांसाठी खास ट्रेण्ड आहेत; परंतु आधुनिक दागिन्यांमध्ये आता खण आणि कापडाची ज्वेलरी, लाकडी ज्वेलरी, पर्ल ज्वेलरी, शिंपल्यांची ज्वेलरी असे अनेकविध प्रकारसुद्धा लोकप्रिय आहेत. दागिना हा आता शरीराचाच एक भाग झाला आहे. ते पूर्वीचे दिवस होते जेव्हा बायका काही निमित्ताने नटूनथटून तयार व्हायच्या, पण आता कुठलीही मुलगी निदान कानातले घातल्याशिवाय तरी घराबाहेर पडत नाही.

महाराष्ट्रातील पारंपरिक दागिन्यांचा श्रीमंत इतिहास मोत्यांच्या दागिन्याशिवाय अपूर्ण आहे. ती आवड तरुणांमध्येही आहे, कारण इंडो-वेस्टर्न स्टायिलग केली तरी पेशवाई थाट आधुनिक पद्धतीनेही आपल्याला मिरवता येतो. तसेच महाराष्ट्रीय ब्रायडल ज्वेलरीमध्ये मोत्याच्या किंबहुना पेशवाई थीमच्या दागिन्यांचा सिंहाचा वाटा आहे. थोडक्यात काय, तर दागिन्यांची परंपरा ही पिढय़ान् पिढय़ा बदलती आणि चैतन्यमय आहे. ‘हाच आपुला ठेवा गं, मिळून साऱ्या जपा गं..’