पूर्वी जेव्हा लँडलाइन फोन अस्तित्वात होते तेव्हा त्यावर ‘हॅश’ हे एक चिन्ह असायचं. नऊ  आकडे, एक शून्य, एक स्टार आणि एक हॅश एवढीच मर्यादित बटणं या फोनच्या डब्ब्याला असायची. तेव्हा त्या हॅशच्या बटणाने फक्त कंपनीला फोन लागायचा किंवा आधीचा नंबर रिडायल व्हायचा. तेव्हा या ‘हॅश’चा फारसा काही उपयोग होत नसे. मात्र गेल्या चार-पाच वर्षांपासून याचा वापर झपाटय़ाने वाढला.

जेव्हा सोशल मीडिया व्यक्तिस्वातंत्र्याचं माध्यम म्हणून रुजायला लागला तेव्हा एखाद्या महत्त्वाच्या बाबतीत मत व्यक्त करण्यासाठी ‘हॅश’चं चिन्ह वापरलं जाऊ  लागलं. विशेषत: ट्विटरवरून एखाद्या मोठय़ा विषयावर मत व्यक्त करताना त्या विषयाला अनुसरून ‘हॅश’च्या पुढे अगदी संक्षिप्त स्वरूपात विषय लिहिण्याची पद्धत रूढ झाली. या ‘हॅश’ला जोडलेल्या विषयाच्या संक्षिप्त स्वरूपाला त्या विषयाचा ‘टॅग’ म्हणून त्याला एकत्र ‘हॅशटॅग’ म्हणायला लागले. एक हॅशटॅग वापरून अनेकांनी केलेल्या पोस्ट ट्विटरवर हॅशटॅग सर्च करून शोधणं शक्य झालं. त्यामुळे एखाद्या विषयाबाबतीतली अनेकांची मतं जाणून घेता येणं सोपं झालं आहे. एखादी मोहीम सुरू करायची आधुनिक पद्धत म्हणून या हॅशटॅगचा मोठय़ा प्रमाणावर वापर व्हायला लागला. या हॅशटॅगने अख्ख्या ट्विटरवर खूप चिवचिवाट केल्यानंतर तो इन्स्टाग्रामवर आणि फेसबुकवरही आपला आवाज दाखवायला लागला.

इन्स्टाग्रामवर वापरले जाणारे हॅशटॅग हे कोणत्याही मोहीम किंवा कोणत्याही प्रकारच्या मतांसाठी बनलेले नसतात. याउलट अनेकदा इन्स्टाग्रामचे हॅशटॅग हे एखाद्या गोष्टीची पब्लिसिटी करण्यासाठी वापरले जातात. ट्रेण्ड ठरवण्यासाठी, एखाद्या गोष्टीला लोकांच्या नजरेत आणण्यासाठी, एखादं पब्लिसिटी कॅम्पेन करण्यासाठी इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर हॅशटॅग वापरले जातात. हॅशटॅगला प्रत्येक सोशल मीडियावर असलेलं गांभीर्य हे वेगवेगळ्या स्वरूपाचं असल्याने हे फरक दिसतात. येता-जाता प्रत्येकजण स्वत:चा काहीतरी हॅशटॅग बनवू लागला, प्रत्येक इव्हेंट आपापले हॅशटॅग बनवू लागले आणि ते ‘व्हायरल’ करायचे निरनिराळे प्रयत्नही केले जाऊ  लागले. फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवर ‘ट्रेण्डिंग’मध्ये प्रत्येक दिवसाचे व्हायरल झालेले आणि ट्रेण्डमध्ये असलेले हॅशटॅग दिसायला लागले.

या हॅशटॅगचं खूळ इतकं वाढलं की ‘पोस्ट नको पण हॅशटॅग आवर’ असं म्हणण्याची वेळ येऊ  लागली आहे. पण जे जे व्हायरल ते ते व्यवहार्य या न्यायाने एक मात्र झालं या वेडातून ‘हॅशटॅग करणं’ हे एक नवीन क्रियापद कट्टय़ावरच्या मराठी भाषेला दान केलं. या क्रियापदाला मराठीने खूप सहजतेने स्वीकारून त्याचं मराठीकरणही केलं गेलं. मराठी भाषेच्या ‘संवर्धना’साठी वगैरे मराठीत हॅशटॅग तयार करून #मराठी भाषिकांचा #मराठी अभिमानसुद्धा जाहीर व्हायला लागला आहे. आता या हॅशटॅग करण्यातून आणखी काय काय नवं बाहेर पडतं यावर लक्ष ठेवायला हवं.

viva@expressindia.com