लाल रंगाची पँट, कोटाखाली रंगीबेरंगी लेहंगा, कानात कर्णभूषणं, गळ्यातील माळांच्या स्टाइलही वेगळ्या.. असं वर्णन एकेकाळी ऐकलं असतं तर साहजिकच एखाद्या मुलीचा चेहरा डोळ्यासमोर यायचा. मात्र हे वर्णन मुलींचं नाही तर फॅशनेबल होऊ पाहणाऱ्या पुरुषांचं आहे. फॅशनची त्यांच्या व्याख्या वेगाने बदलतेय. पुरुषांच्या फॅशनवर नेमका कोणाचा प्रभाव आहे, हे प्रसिद्ध फॅशन डिझायनर्सकडून जाणून घेण्याचा हा प्रयत्न..

लहान असल्यापासूनच मुलींना नटण्या-मुरडण्याची भारी हौस असते असं गृहीत धरलं जातं जे खरंही आहे, काही अपवाद असू शकतात. मात्र शाळा संपली की कॉलेजमध्ये गेल्यानंतर मुलींना फॅशन करायला अधिक वाव मिळतो आणि मग पुढेही ती हौस अर्थातच जोपासली जाते. हे झालं अगदी दशकभरापूर्वीचं चित्र, आता मात्र ते बदललंय. म्हणजे मुली फॅशन करत नाहीत असं नाही पण, ‘आमची काय तयारी इतकी.. एक पॅन्ट आणि शर्ट घातलं की निघालो’ असं म्हणणारी पुरुष मंडळी सध्या आरशासमोर अधिक रेंगाळताना दिसू लागली आहेत. केवळ केस विंचरण्यासाठी किंवा अंगावरचा शर्ट चांगला दिसतो की नाही यापलीकडे जात अमुक एक रंगाचा शर्ट-पँट की लेहंग्यासारखं काही असे पॅटर्न निवडून त्यावरचा लुक ठरवून मग पूर्ण तयारीनिशी ते बाहेर पडतात. केसांपासून नखांपर्यंत काळजी घेणारा त्यांचा हा फॅशन ‘मॅनि’या वेगाने बदलतो आहे.

‘व्हॅन ह्य़ुसन’ आणि ‘जी.क्यू.’ या दोन ब्रॅण्ड्सच्या वतीने पुरुषांच्या फॅशनमधील अत्याधुनिक ट्रेंड्स दाखवणारा किंबहुना सेट करणारा दोन दिवसांचा फॅशन शो आयोजित केला होता. पूर्वी फॅशन शोमध्ये स्त्री-पुरुष असा भेदाभेद नव्हता. मात्र सध्या पुरुषांकरिता वेगळे फॅशन शो आयोजित केले जातायेत, यातच त्यांचे फॅशन विश्व किती विस्तारलेय याची प्रचीती येते. ‘पूर्वी फॅशन म्हणजे फक्त वेगवेगळे कपडे घालणे एवढाच अर्थ होता. आता ती फक्त गरज उरली नाही, तर तुमच्या भावभावना दाखवण्याचं, तुमचं बिनधास्त, छानछोकीचं व्यक्तिमत्त्व सगळ्यांसमोर आणणारं एक माध्यम म्हणून फॅशनकडे पाहिलं जातं. त्यामुळे पुरुषही जे कपडे घालणार आहेत ते त्यांना आवडणारे म्हणण्यापेक्षा त्यांचं व्यक्तिमत्त्व खुलावणारे कपडे घालण्यावर भर देतायेत, असं मत डिझायनर साहिल अनेजा यांनी व्यक्त केलं. त्यांच्या मते, आपल्याकडे ‘फॅशन’ ऐशींच्या दशकात चित्रपटांमधून आली. नव्वदच्या दशकात मात्र फॅशनने एक वेगळं स्वरूप घेऊ न अनेक ट्रेंड्स आणले मात्र त्यावर पाश्चात्त्य संस्कृतीचा जास्त पगडा होता. पण आता चित्र पालटलं आहे. भारत, पौर्वात्य देश, मध्य आशिया अशा अनेक भागातील मुळची फॅशन आणि पेहराव आता फॅशन जगतात आपलं स्थान कायम करताना दिसते आहे. त्यामुळे पुरुषांसाठीचे कपडे डिझाइन करताना माझ्या डोक्यातली एखादी प्रतिमा, प्रवासादरम्यान पाहिलेल्या गोष्टी अशा विविध कल्पना एकत्र करून काही तरी नवीन तयार करण्यावर भर दिला जातो. सध्या प्रिंट वर प्रिंट, ग्राफिक्स आणि वेल्वेट यांची मेन्स फॅशनमध्ये जास्त चलती आहे, अशी माहिती अनेजा यांनी दिली.

फॅशन डिझायनर ध्रुव कपूर यांना परंपरागत चौकटीतील कपडे डिझाइन करण्यावर विश्वास नाही. आजच्या काळातील फॅशन आणि येऊ घातलेली फॅशन या दोन्हींची सांगड घालत काही भन्नाट डिझाइन्स करण्याची आवड असलेल्या ध्रुव कपूर यांनी सध्या फक्त शर्ट, टी शर्ट किंवा तत्सम एखादेच कपडे घालणं मागे पडत असून दोन तीन कपडे एकावर एक घालून ‘लेयरिंग’ करणं, प्रिंटेड कपडे घालणं मुलं पसंत करतात, अशी माहिती दिली. एवढंच नाही तर मुलींच्या कपडय़ांसाठी वापरले जाणारे रंग मुलांच्या कपडय़ांमध्ये वापरून त्यातही अनेक प्रयोग केले जात आहेत, असे त्यांनी सांगितले. अर्थात, पुरुषांची फॅशन आता स्त्रियांच्या फॅ शनप्रमाणे नाजूक होते आहे हे त्यांना पटत नाही. ‘आपल्याकडे पूर्वीपासूनच म्हणजे अगदी मुघलांचा काळ घेतला तरी तेव्हाही पुरुषांच्या कपडय़ांमध्ये स्त्रियांच्या कपडय़ांसारखीच नजाकत दिसून येते. माझ्या अनेक शोमध्ये मी स्वत: मुलींसाठी साजेसे असे रंग, फुलांच्या प्रिंट्स, तोकडे जंपर्स वापरून डिझाइन्स करतो. फॅशन आता मुलांची किंवा मुलींची राहिली नसून ती सगळ्यांसाठी झाली आहे. लिंगभेद नाहीसा करण्यासाठी हे एक उत्तम पाऊल आहे’, असं स्पष्ट मत त्यांनी मांडलं. ऐंशीच्या दशकातील फॅशन आणि आत्ताची फॅशन यातला फरक समजावून देताना पूर्वी कपडे बनवताना एक ते दोन यापेक्षा जास्त प्रकारचं कापड वापरण्यात येत नव्हतं, आता मात्र कापडाचे अनेक प्रकार एकत्र करून तसेच टेक्नॉलॉजी वापरून कपडे तयार केले जात आहेत. जगभरात डिझायनर्स अनेकविध कापड एकमेकांत मिसळून कपडे तयार करण्यावर भर देत आहेत, अशी माहिती ध्रुव यांनी दिली.

रॅम्पवरच्या या रथी महारथींच्या म्हणण्याप्रमाणे फॅशन काळानुसार बदलत चालली आहे आणि तांत्रिकदृष्टय़ाही सुधारत चालली आहे. कॉलेज आणि ऑफिसेसमध्येदेखील याचे पडसाद पाहायला मिळत आहेत. जीन्स असो वा टीशर्ट त्यावर अनेक प्रयोग केले जात आहेत. फाटलेल्या जीन्स, खालून दुमडलेल्या जीन्स, उंचीला थोडय़ा तोकडय़ा पॅन्ट्स इत्यादी प्रकार तर कॉलेजमध्ये सर्रास पाहायला मिळतात. ऑफिसमध्येदेखील केवळ साधे फॉर्मल शर्ट न घालता दंडात घट्ट, थोडे आखूड शर्ट्स, तशीच तोकडी पँट असे अनेक प्रकार कमालीच्या आत्मविश्वासाने परिधान करून वावरणारी अनेक पुरुष मंडळी आजूबाजूला दिसतात. कमरेच्याही खाली पोहोचतील इतक्या उंचीचे जॅकेट्स, हातात बांगडय़ांप्रमाणे घातले जाणारे ब्रेसलेट्स, पोनिटेल असे अनेक प्रकार मेन्स फॅशनमध्ये रुळले आहेत.

केवळ कपडय़ांचं बाह्य़रूप नाही तर कापडाच्या प्रकारांचाही खूप वेगळ्या पद्धतीने विचार केला जातो आहे. लिनन, ज्युट पुन्हा फॅ शनमध्ये येतायेत. याविषयी बोलताना डिझायनर राजेश प्रताप सिंग यांनी सांगितलं की, ‘आम्ही धाग्यांवर विशेष लक्ष देतो. आधी धागा, मग कापड, त्यानंतर त्यावर डिझाइन आणि मग कपडे असा प्रवास करत मग कपडे बनवले जातात. सध्या भारतीय हातमागावर बनणाऱ्या कपडय़ांची चलती आहे मात्र फक्त असं कापड घेऊन काम न करता त्याला आंतराष्ट्रीय स्तरावर कसं दाखवता येईल हे त्यातलं कसब आहे. मग त्यासाठी वापरले जाणारे रंग, डिझाइन, त्याची रचना या साऱ्या गोष्टींवर प्रयोग करणं ओघाने आलंच’.

हिवाळा, लग्नसराई आणि फॅशन

हिवाळ्यात भडक नि उठावदार रंगाचे कपडे घालणं ट्रेण्डी ठरतात. लेयरिंगचा पर्याय अर्थातच उत्तम ठरतो. सध्या लाल रंग नि त्याच्या छटा मुलांच्या फॅशनमध्ये रॅम्पवर जास्त प्रमाणात वापरल्या जात आहेत त्यामुळे तुम्हीदेखील तुमच्या पेहरावात त्याचा वापर नक्की करून बघा. लग्नसराईच्या या काळात कपडय़ांवर थोडेफार दागिने वापरण्यास हरकत नाही. ते तुमचं रूप नक्की उठावदार करतील.

स्कार्फ, दुपट्टा आणि बरंच काही

पुरुषांच्या फॅशनमध्ये हल्ली स्कार्फ चा वापर सर्रास होऊ लागला आहे. गुलाबी, हिरवा, लाल या रंगांचा सढळ वापराबरोबरच शूज, शर्टदेखील प्रिंटेड वापरण्यावर त्यांचा भर दिसून येतो. पारंपरिक पोशाखात दुपट्टय़ांचा वापर वाढला आहे. तर फॅशन म्हणून नाक टोचणं, कानात डूल घालणं याचेही फंडू प्रकार विकसित होताना दिसतायेत.

viva@expressindia.com