संवाद आणि भाषिक कौशल्य यांची कास धरत थेट वर्ल्ड बँकेत काम करण्याची संधी मिळवणारी मिथिला सांगतेय

जागतिक शांती आणि मतभेदांची दरी मिटवण्याचं काम करण्यासाठी गांधी विचारांच्या अभ्यासाची जोड कशी मिळाली याची गोष्ट..

मिथिला सध्या कॉन्फ्लिक्ट ॅण्ड डेव्हलपमेंट कन्सल्टण्ट म्हणून कार्यरत आहे.

मिथिला देशपांडे, कॅनडा

हाय फ्रेण्ड्स! कसे आहात? एकदम मजेत ना? तुमची खुशाली विचारतेय.. कारण थेट नाही, पण तुमच्या खुशालीचा माझ्या कामाशी किंचितसा संबंध आहे. कसा ते सांगते.. माझा शालेय जीवनापासूनच इंग्रजी, हिंदी, मराठी आदी भाषांकडे कल होता. इतिहास विषय मला खूप आवडायचा. पहिल्यापासूनच आई-बाबांचा कायमच भरभक्कम पाठिंबा मला लाभला. दहावीनंतर कला शाखेकडंच वळायचं ठरवलं होतं. सेंट झेव्हिअर्समध्ये प्रवेश मिळाल्यावर ठाणे ते सीएसटीचा प्रवास कसा झेपेल हिला, अशी थोडी काळजी घरी वाटली होती; पण ते सगळं निभावलं. मी इतिहास विषयात पदवी घेतली. दरम्यान कॉलेजमध्ये फ्रेंच विषय घेतल्यानं मला फ्रेंच भाषेची गोडी लागली. कफ परेडच्या अलियॉन्स फ्रॉन्सेसमध्ये फ्रेंच भाषेच्या सात लेव्हल्स पूर्ण झाल्या. त्यांची परीक्षाही क्लिअर केली. तेव्हा दिवसभरातल्या दगदगीचा त्रास अभ्यासाच्या आनंदापुढं काहीच नव्हता. पुढे मुंबई विद्यापीठात इतिहासात पदव्युत्तर शिक्षण घेतलं. त्याच दरम्यान आणखी एखादी परदेशी भाषा शिकाविशी वाटल्यानं मी इन्स्टिटय़ुटो हिस्पानियामध्ये स्पॅनिश भाषा शिकून त्याच्या सहा लेव्हल्स पूर्ण केल्या.

इतिहास विषय घेऊन एम.ए. झाल्यानंतर वर्षभर मी झेविअर्स इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल रीसर्चमध्ये रीसर्च असिस्टंट म्हणून नोकरी करत होते. तिथं मी माहिती गोळा करून तिचं विश्लेषण, संशोधन-लेखन, प्रकल्प समन्वयक, संपर्क, माहितीचं व्यवस्थापन, स्थलांतर, विकास आणि विस्थापन, भारतातील स्थलांतरित आणि अनुसूचित गट, हवामान बदल या विषयांचं दस्तावेजीकरण करत असे. शिवाय कातकरी आणि पावरा जमातींसोबत केलेल्या कामाचं मूल्यमापन  मी केलं होतं. आमच्या कार्यशाळेदरम्यान दोन-तीनदा या लोकांना भेटायची संधीही मिळाली.

याच काळात पीएच.डी.बद्दल विचार सुरू होता. दरम्यान एम.ए.च्या दुसऱ्या वर्षांला असताना मी ‘गांधीयन थिअरी अ‍ॅण्ड प्रॅक्टिस’चा अभ्यास केला होता. त्यात फारसा कुणाला रस नसल्यानं त्या वर्गात आम्ही तिघी जणीच होतो. प्रा. अरविंद गणाचारी यांनी हा विषय अतिशय चांगल्या पद्धतीनं शिकवला. गांधीजींचं तत्त्वज्ञान, अहिंसा, शांती वगैरे गोष्टींचं मला आकर्षण वाटलं. त्या आजघडीला प्रत्यक्षात आणता येतील का, यावर विचार करू लागले. त्या सुमारास सरांनी सांगितलं की, परदेशात या विषयांशी संबंधित अभ्यासक्रम आहेत. त्यामुळे नोकरी करताना यूएसमधील या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवण्यासाठी आनुषंगिक परीक्षांची तयारी केली. नोकरी संपल्यावर मी वीकएण्डला स्पॅनिश शिकवायला सुरुवात केली होती. मी शिकले, त्या संस्थेची ठाण्यात शाखा सुरू होणार होती. तिथल्या स्पेनच्या प्राध्यापिकांनी मला ठाणे शाखेत शिकवण्याविषयी विचारलं होतं. त्यानंतर काही महिने मुंबई स्माईल्स या स्वयंसेवी संस्थेच्या स्पॅनिश एम.डीं.ची एक्झिक्युटिव्ह असिस्टंट म्हणून काम केलं. स्पॅनिशच्या ज्ञानाचा उपयोग करत कार्यालयातील कर्मचारी आणि एम.डीं.मध्ये संवादाचा पूलही सांधला. त्यानंतर मी अमेरिकेला आले.

अमेरिकन युनिव्हर्सिटीतील ‘स्कूल ऑफ इंटरनॅशनल सव्‍‌र्हिस’मध्ये ‘इंटरनॅशनल पीस अ‍ॅण्ड कॉन्फ्लिक्ट रिझोल्यूशन’मध्ये मास्टर्स करायला वॉशिंग्टन डीसीला आले. या दोन वर्षांच्या अभ्यासक्रमात पूर्ण शिष्यवृत्ती आणि रीसर्च असिस्टंटशिप मिळाली होती. या काळात मला बरंच काही शिकायला मिळालं. पहिली सेमिस्टर थोडी आवाहानात्मक होती, कारण अमेरिकन शिक्षण पद्धत आणि आपल्या शिक्षणात खूप तफावत आहे. ‘तिथे इन्स्टिटय़ूट फॉर मल्टि-ट्रॅक डिप्लोमसी’मध्ये तीन महिने इंटर्नशिप केली. नंतर स्वयंसेवक म्हणूनही तिथं जायचे. अभ्यासाखेरीज अभ्यासेतर गोष्टी करायला मिळाल्या. मी मेडिएशन – मध्यस्थीचं प्रशिक्षण घेतलं. संवादकलेच्या गटात सहभागी झाले. फायनल सेमिस्टरच्या परीक्षेच्या काळात नोकरी शोधायला सुरुवात केली. इथं नोकरी मिळणं खूप कठीण असतं. त्यातही माझं क्षेत्र खूप स्पर्धात्मक आहे.

ग्रॅज्युएशननंतर नोकरीच्या शोधात असताना एका रीसर्च स्कॉलरला भेटायला गेले. डीसीमध्ये इफेक्टिव्ह जॉब सर्च करण्यासाठी त्यांचं मार्गदर्शन घ्यायला. त्यांनी मला अर्धा-पाऊण तास चांगला सल्ला दिला. मी त्यांना माझ्या रेझ्युमेवर नजर टाकायची विनंती केली. त्यांनी रेझ्युमेकडे क्षणभर बघितलं आणि शेजारच्या पेपरबिनमध्ये रेझ्युमे भिरकावत म्हणाले की, मी एखाद्या ‘एनजीओ’चा हायरिंग मॅनेजर असतो, तर तुझ्या रेझ्युमेची पहिली ओळ बघूनच तो केरात टाकला असता. ती पहिली ओळ म्हणजे माझं नाव आणि माझा डीसीचा पोस्टल अ‍ॅड्रेस होता. त्यांच्या मते, मी त्या एका ओळीत अ‍ॅड्रेसमध्ये पूर्णविरामाऐवजी स्वल्पविराम दिला होता, म्हणजे चुकीचं विरामचिन्हं वापरलं होतं. त्या पहिल्या ओळीवरूनच असं दर्शवलं जातं की, मी ‘डिटेल ओरिएंटेड’ नाहीये. अर्थात त्यांनी माझा रेझ्युमे पेपरबिनमधून उचलून मला परत केला; पण या अनुभवावरून ‘अटेन्शन टू डिटेल’ असणं किती महत्त्वाचं आहे, हा मोलाचा धडा मी शिकले. आणखीन एक किस्सा असा की, मी एका ‘एनजीओ’मध्ये इंटरव्ह्य़ू दिला; पण मला ती नोकरी मिळाली नाही. त्यानंतर मी इंटरव्ह्य़ूमध्ये कुठं चुकले आणि स्वत:मध्ये कोणत्या सुधारणा करू शकते, यावर फीडबॅक द्यायची विनंती हायर मॅनेजरला केली. त्यांनी आनंदानं माझ्याशी ५-१० मिनिटं संवाद साधला आणि ते मला म्हणाले की, तुम्ही असा फीडबॅक मागितला, याचं मला कौतुक वाटतंय. हे म्हणजे जणू एखाद्या ब्रेकअपसारखं आहे. तुमच्या परीनं तुम्ही इंटरव्ह्य़ू चांगलाच दिलात; पण मी तुमच्याआधीच कुणाला तरी या पदासाठी योग्य ठरवलंय. त्यामुळं इतर उमेदवारांना मी नाकारतोय. या अनुभवातून मी वॉशिंग्टन डीसीच्या जॉब मार्केट आणि कल्चरबद्दल दोन महत्त्वाच्या गोष्टी शिकले की, नोकरी मिळाली नाही म्हणून स्वत:बद्दल कमीपणा वाटून हताश होण्याऐवजी, इंटरव्ह्य़ूअरकडून फीडबॅक मिळवण्याची सुवर्णसंधी असेल तर ती जरूर साधायला हवी. नोकरी न मिळण्याची अनेक कारणं असू शकतात. अनेक वेळा हायरिंग मॅनेजरच्या मनात इन-हाऊस उमेदवार ठरलेले असतात, त्यामुळं स्वत:वरचा विश्वास कमी करून न घेता प्रयत्न करत राहावेत. हे धडे मला खूप उपयोगी पडले आहेत.

इथल्या अमेरिकन तरुणाईला या कामाचा अनुभव असू शकतो. अमेरिकेतील अभ्यासक्रमांत परदेशातील प्रकल्पांत काम करण्याचा समावेश असतो. त्यामुळे आपल्याबरोबरच्या स्पर्धेत तेही असू शकतात. काही वेळा आपल्याला व्हिसाचा प्रश्न येऊ  शकतो. सुरुवातीला सहसा एनजीओज व्हिसा स्पॉन्सर करत नाहीत. आपल्याला स्वत:च्या क्षमता सिद्ध कराव्या लागतात.

अनेक अर्ज करून अखेरीस मला ‘द अलायन्स फॉर पीस बिल्डिंग’ (अऋढ) या संस्थेत नोकरी मिळाली. वेगवेगळ्या क्षेत्रांतील संस्थेच्या कामांची प्रगती तपासणं आणि त्याचं मूल्यमापन करणं, असं या कामाचं स्वरूप होतं. शिवाय अनेक स्वयंसेवी संस्थांतर्फे शांती टिकून राहण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रकल्पांना चालना देणं हेसुद्धा काम होतं. उदाहरणार्थ- शांतीसाठी झटणाऱ्या संस्थांचं मॉनिटरिंग व इव्हॅल्यूएशन करणाऱ्यांना किती ट्रेनिंग कोर्सेस उपलब्ध आहेत, त्यातही व्हच्र्युअल ट्रेनिंग कोर्सेस किती आहेत, यांचं सर्वेक्षण केलं. ‘एएफपी’मधलं अर्धवेळ काम मी आठ महिने केलं. त्याच वेळी ‘ऑर्गनायझेशन ऑफ अमेरिकन स्टेट्स’ या आंतरराष्ट्रीय संस्थेत तीन महिने इंटर्नशिप केली. तिथल्या पीस फंड विभागातील बहुतांशी कर्मचारी आणि स्वयंसेवक हे अमेरिकन आणि लॅटिन अमेरिकन आहेत. त्यांची भाषा स्पॅनिश किंवा पोर्तुगीज आहे. या काळात लॅटिन अमेरिकेसंबंधी खूपशी माहिती मिळाली. संस्थेच्या मॉक डिबेटमध्ये सहभागी झाल्यानं राजशिष्टाचार, परस्परसंबंध, संवादकला आदी गोष्टींची माहिती मिळाली. गेली दोन र्वष मी ‘द वर्ल्ड बँके’त कॉन्फ्लिक्ट अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट कन्सल्टण्ट (गव्हर्नन्स ग्लोबल प्रॅक्टिस) म्हणून कार्यरत आहे. विविध ठिकाणी चाललेल्या संघर्षांच्या काळातही वेगवेगळ्या प्रकल्पांतर्गत जागतिक बँकेची मदत कशी पोहोचवता येईल, त्याविषयीचं संशोधन आणि मूल्यमापन करणं चालू आहे. दक्षिण आशियामधील काही देशांमधल्या केस स्टडीज घेतल्या आहेत. आमच्या पाच जणांच्या टीमचं काम चालू आहे.

जगभरातल्या लोकांच्या भेटीगाठीची संधी इथं मिळते. इथल्या युनिव्हर्सिटीच्या माझ्या अभ्यासक्रमात मी एकटीच भारतीय होते. बाकी विद्यार्थी अमेरिकन आणि इतर देशांतले होते. सुरुवातीला या गोष्टीचं किंचितसं दडपण आलं होतं; पण मग ते दडपण झुगारून मी माझ्या कोषातून बाहेर पडून संवाद साधायला शिकले. माणसं ओळखायला आणि तिथले सामाजिक शिष्टाचार शिकले. माझ्या विचारांच्या कक्षा रुंदावल्यात. मुंबईत मिश्र संस्कृती असली तरी कधी तरी संकुचित मनोवृत्तीचे होतो; पण इथं केवळ भारतीयच नव्हे तर आशियायी व्यक्तीही आपलीशी वाटते. पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन कधीच मागं पडलाय. वॉशिंग्टन ही पूर्ण प्रोफेशनल सिटी आहे. जगभरातले लोक इथं आहेत. समोरच्याचा आदर करत, ते मित्रत्वाच्या नात्यानं वागवतात. आपलं काम हीच आपली ओळख असते. माझ्या रूममेट्सकडून बऱ्याच गोष्टी शिकले. घरच्यांच्या कायमच मिळालेल्या पाठिंब्यामुळं आपसूकच प्रेरणा मिळाली. आता मला जी४ व्हिसा मिळालाय. गेले चार महिने मी कॅनडात नवरा राहुल सुर्वेसोबत आहे. अडीच वर्षांपूर्वी लग्न झालं. काही काळ तो भारतात होता, नंतर नोकरीच्या निमित्तानं कॅनडात आलाय. राहुलची घरकामात खूप मदत होते. त्यामुळं घरकाम आणि ऑफिसचं काम ही तारेवरची कसरत वाटत नाही. कामातून वाचनाच्या आवडीला फारसा वेळ मिळत नाही. त्यातल्या त्यात वीकएण्डला वाचते. डीसीमध्ये असताना एका हायकिंग ग्रुपसोबत जायचे. माझ्या क्षेत्रात आणखी काम करायचं असल्यानं सध्या इथंच राहणार आहे. कामाच्या निमित्तानं खूप प्रवास करायचा आहे.. म्हणूनच सुरुवातीला तुमची खुशाली विचारली. कधी तरी भेटूच..