पूर्वी पिढय़ांचा उल्लेख मागची किंवा पुढची असाच केला जात असे. पण आता इंटरनेटने आपलं सारं जगच व्यापल्यापासून पिढय़ांचा उल्लेखही टूजी, थ्रीजी आणि फोरजी असा केला जाऊ लागला आहे. यातला ‘जी’ म्हणजे जनरेशन हे एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेलच. खटाखट दाबाव्या लागणा-या बटणांचे मोबाईल जाऊन जेव्हा बाजारात स्मार्टफोन दाखल झाले तेव्हा त्याच्यामध्ये इतर काय फिचर्स आहेत याची उत्सुकता असे. पण आता स्मार्टफोन विकत घेताना तो फोरजी आहे ना याची चौकशी सर्वात आधी केली जाते. कारण स्मार्टफोनमधील इतर फिचर्सपेक्षा त्या हँडसेटला सपोर्ट करणाऱ्या फोरजी नेटवर्कवरच त्या फोनचा उपयोग ठरतो.

तुम्हाला आठवत असेल तर २०१४ साली एक जाहिरात प्रचंड लोकप्रिय झाली होती. ऑपरेशन थिएटरमध्ये एक गर्भवती महिला जीवाच्या आकांताने ओरडतच एका गोंडस बाळाला जन्म देते. पण ते बाळ रडत नाही तर सहज बाहेर येतं. आयुष्यात पहिल्यांदाच असं काही पाहणारा डॉक्टर जागीच फिट येऊन पडतो. आई-वडिलदेखिल आश्चर्यचकित होतात. बाळ मात्र हसत असतं. जन्म घेताच ते शेजारी उभ्या असलेल्या आपल्या वडिलांच्या हातातून टॅब हिसकावून नाळ कशी कापायची हे गुगलवर सर्च करतं. कात्रीच्या साहाय्याने ती नाळ कापतंही. त्यानंतर नर्सच्या खिशातील स्मार्टफोन काढून ते तिच्यासोबत सेल्फी काढतं आणि लगेच इन्स्टाग्रामवर अपलोडही करतं. तोच स्मार्टफोन घेऊन बेडवरून टुणकन उडी मारतं, समोर पडलेल्या लॅपटॉपवर लॉग इन करून स्वत:चा लाइव्ह व्हिडिओ अपलोडला लावतं. मगाशी बेशुद्ध पडलेला डॉक्टर शुद्धीवर आलेला असतो. ते हे सगळं डोळे मोठे करून पाहत असतो बाळ त्यालाही लाइव्ह व्हिडिओमध्ये कैद करतं आणि गुगल मॅप सुरू करून बाहेरचा रस्ता धरतं. जाहिरात संपताना स्क्रीनवर शब्द झळकतात, ‘बॉर्न फॉर द इंटरनेट’. एका प्रसिद्ध कंपनीच्या थ्रीजी प्लस इंटरनेटची ही जाहिरात. त्यांच्या सांगण्याचा अर्थ हाच की यापुढची पिढी आईच्या गर्भातूनच इंटरनेट कसं वापरायचं हे शिकून येईल. आई-वडिलांनी इंटरनेटच्या माध्यमातून केलेले गर्भसंस्कार यासाठी कारणीभूत ठरले असण्याची शक्यता येथे नाकारता येत नाही. असं असताना या संपूर्ण जाहिरातीमध्ये एक गोष्ट हरवलेली होती आणि ती म्हणजे बाळाचं बालपण, दिसत होता तो फक्त स्मार्टनेस. असो.

खऱ्या आयुष्यात मात्र आजही नवजात बालकाविषयीच्या कुठल्याही नवीन गोष्टीचं खूप अप्रूप असतं. आणि का असू नये? नऊ महिने पोटात गर्भ वाढत असताना त्याच्या प्रत्येक हालचालीची, अवयवाच्या वाढीची नोंद करत असताना आपण त्याच्या बाह्य़रूपाविषयी किती उत्सुक असतो. कान, नाक, डोळे, आवाज, चेहरा कसा असेल. बाळाच्या शरीराची ठेवण आईसारखी असेल की वडिलांसारखी, ते चालेल कसं आणि खूप काही. ते जन्माला आल्यावर तर त्याची प्रत्येक गोष्ट अचंबित करणारी वाटते. बाळाचा आवाज, टकामका बघणं, कुशी बदलणं, दात येणं, रांगण, बसायला लागणं, कुणाच्या आधाराशिवाय स्वत:च्या पायावर  उभं राहणं आणि दुडूदुडू चालायला लागणं. ज्या दिवशी ते चालायला लागतं तो दिवस तर कुटुंबातील सर्वासाठी आनंदोत्व असतो. बाळाच्या जवळच्या सर्वच व्यक्तींच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळतात. त्या चिमुकल्या जिवाचे पापे घेत, त्याला कुशीत घेऊन आई तो आनंद साजरा करते.

पण मागच्या आठवडय़ात फेसबुकवरून व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे मात्र एका वेगळ्याच चर्चेला प्रारंभ झाला. तेही बाळाच्या कुटुंबियांनी आपल्या घरातील नव्या पाहुण्याचा त्याच्या पराक्रमाचा आनंदोत्सव साजरा करण्याआधीच. कारण तुमचं खासगी जग हे आता इंटरनेटमुळे सार्वजनिक झालं आहे आणि त्यात तर हे बाळ ‘फोरजी’च्या जमान्यात जन्माला आलेलं आहे.

एक नवजात अर्भक जन्माला आल्यावर लगेचच परिचारिकेच्या हातावर रेलून चालण्याचा पराक्रम करते, हा व्हिडिओ गेले काही दिवस चर्चेचा विषय ठरत आहे. अर्लेट अरांटीस या ब्राझिलियन महिलेने २५ मे रोजी हा व्हिडिओ फेसबुकवर शेअर केल्यानंतर पुढील काही तासांमध्येच त्याला लाखोंच्या संख्येने लाईक्स, शेअर आणि कमेंट मिळाल्या. का नाही मिळणार? जिथे जन्माला येणारी अर्भकं बाहेरच्या पर्यावरणाशी जुळवून घेण्याचा प्रय करत असतात तिथे हे अर्भक थेट ‘चाली चाली’ करून सोशल मीडियावरील स्क्रोलर्सना आश्चर्यचकीत करत आहे. काहींना हा दैवी चमत्कार वाटला तर काहींच्या मते यात काहीच नवल नाही. डर्बनच्या एका महिलेने म्हटलं आहे की मी जन्माला आले तेव्हाच मला खालचे दोन दात आलेले होते आणि हिच गोष्ट माझा भाचा आणि मुलाच्याबाबतीतही घडली. वैद्यकीय क्षेत्रातील काहींचं म्हणणं असं आहे की, अशाप्रकारे नवजात अर्भकाला चालायला लावणं हे त्यांच्या नाजूक हाडांवर आणि नसांवर दबाव आणू शकतं. हा व्हिडिओ व्हायरल होत आहे यामध्ये शंका नाही, पण अशा पद्धतीने अर्भकाच्या जीवाशी खेळणं (त्याचा व्हिडिओ बनवणं आणि पोस्ट करणं) नैतिकदृष्टय़ा कितपत योग्य आहे, असा सवालही अनेकांकडून विचारला जातोय. अनेकदा एका व्हायरल व्हिडिओमुळे निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरं ही दुसऱ्या व्हायरल व्हिडिओमधून मिळत असतात. इंटरनेटचा तो कायदाच आहे, त्यामुळे याच्याशीच निगडीत दुसरा व्हिडिओ येईपर्यंत वाट पाहणंच संयुक्तिक ठरेल. पण एक गोष्ट आहे, जन्माला येताच पराक्रम दाखवणारा आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा चिमुकला ‘फोरजी’ पीढीचा खराखुरा प्रतिनिधी आहे. या चिमुकल्यामुळे सोशल मीडियाच्या व्यासपीठावर बदलते वैद्यकीय क्षेत्र, माणसाच्या शरीरातील बदल, मानवी संवेदना आणि सोशल मीडियाच्या वापराचे चांगले-वाईट परिणाम याबाबत जगभर खुली चर्चा झडली. जग आणि जनरेशन कशी वेगाने बदलतेय त्याचं हे बोलकं उदाहरण.

viva@expressindia.com