स्वानंद गांगल
भारतात सार्वत्रिक निवडणूक नावाच्या पंचवार्षिक उत्सवाचे बिगूल पुन्हा एकदा वाजले आहे. यानिमित्ताने सर्वपक्षीय राजकीय नेते आरोप-प्रत्यारोपांच्या आपल्या दैनंदिन कामात अधिक जोमाने जुंपले आहेत. तिकीट वाटप, नाराजी, बंडखोरी, पक्षांतर या वर्षांनुवर्षे चालत आलेल्या गोष्टी अपेक्षेप्रमाणे आजही तशाच सुरू आहेत. पण तरीही १८ व्या लोकसभेसाठीची ही निवडणूक वेगळी आहे आणि हे वेगळेपण घेऊन आले आहे AI अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स.

दहा वर्षांपूर्वी, अर्थात २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियाचा प्रभावी आणि प्रचारी वापर हे निवडणुकांचे वेगळेपण ठरले होते. तर या वेळी ती जागा आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेने घेतली आहे. तब्बल दहा वर्षांत जागतिक तंत्रज्ञान किती झपाटय़ाने पुढे गेले आहे याचे हे उदाहरण! याची झलक काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात पाहायला मिळाली. जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हिंदीतले भाषण तमिळ भाषिक श्रोत्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने भाषांतरित करून पोहोचवले गेले. भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयामार्फत ‘भाषिनी’ हे मोबाइल अ‍ॅप्लिकेशन ‘एआय’च्या माध्यमातून सुलभ भाषांतराचे कार्य करण्यासाठी तयार केले आहे. गेल्या वर्षी जेव्हा  G20 शिखर परिषदेच्या निमित्ताने विविध राष्ट्रांचे प्रमुख भारतात आले होते तेव्हा संभाषणासाठी याच भाषिनी अ‍ॅपचा वापर करण्यात आला होता.

यंत्र आणि मानव यांच्यात मूलभूत फरक हा दोन गोष्टींचा! एक म्हणजे भावना आणि दुसरी म्हणजे बुद्धिमत्ता! पण दिवसाकाठी प्रगत होत जाणाऱ्या तंत्रज्ञानाने ही दरी कमी केली आहे. आज तंत्रज्ञानाचा वापर करून यंत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता साठवण्यात येते आणि त्यांची कार्यसुलभता, क्रियाशीलता आणि उत्पादकता वाढवली जाते. परिणामी आजची यंत्रे ही अनेक बाबतीत माणसापेक्षाही अधिक कार्यक्षम झालेली पाहायला मिळतात.

आज या कृत्रिम बुद्धिमत्तेने जगाला गारुड घातले आहे. मग चॅट जीपीटीसारखे क्षणार्धात प्रश्नाची उत्तरे देणारे चॅटबॉट्स असतील किंवा ‘एआय’ तंत्रज्ञानावर बेतलेली ग्राफिक डिझायिनग, व्हिडीओ एडिटिंग, कन्टेन्ट जनरेशनची अ‍ॅप्लिकेशन असतील. तुम्ही योग्य कमांड द्यायची खोटी आणि अवघ्या काही सेकंदात तुम्हाला अपेक्षित रिझल्ट तुमच्यासमोर असतो. अगदी १०० शब्दांच्या लेखापासून ते १०० पानांच्या पुस्तकापर्यंत सगळय़ा गोष्टी क्षणार्धात समोर असतात आणि त्याही अगदी म्हणाल त्या भाषेत!

आजच्या आपल्या अतिजलद झालेल्या आयुष्यासाठी ही प्रगती सोयीची असली, तरीसुद्धा याचे होणारे परिणाम हे दूरगामी आहेत! येणाऱ्या काळात शिक्षण, नोकऱ्या, जीवनशैली ही प्रत्येक गोष्टच या बदलत्या तंत्रज्ञानाने प्रभावित होणार आहे आणि कदाचित याच्या दावणीला बांधली जाणार आहे.

‘एआय’शी निगडित संशोधन मोठय़ा प्रमाणात होत आहे. यात अगदी मोबाइलपासून ऑटोमोबाइलपर्यंत सर्वच क्षेत्र समाविष्ट आहेत. आज अनेक बडय़ा कंपन्यांमध्ये दैनंदिन कामात होणारा ‘एआय’चा वापर वाढला आहे. परिणामी ‘एआय’ हाताळू शकणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले जात आहे. अनेक विद्यापीठे, शिक्षणसंस्था या ‘एआय’ विषयातील शिक्षण अथवा विशेष कोर्सेस उपलब्ध करून देताना दिसत आहे. याबद्दल बोलताना अपग्रॅड या ऑनलाइन लर्निग प्लॅटफॉर्मचे सहसंस्थापक आणि मॅनेजिंग डायरेक्टर, मयंक कुमार यांनी सांगितले की ‘बदलत्या काळानुसार नोकरीच्या बाजारात नवीन गरजा निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नवीन कौशल्ये आत्मसात करण्याची गरज आहे, जेणेकरून तरुणांसाठी करिअरच्या नव्या वाटा खुल्या होतील. आज आमच्या प्लॅटफॉर्मवर ‘एआय’ विषयातले अनेक वेगवेगळे कोर्सेस उपलब्ध आहेत ज्याला कॉलेज विद्यार्थ्यांपासून ते आठ-दहा वर्षांचा अनुभव असलेल्या नोकरदारांपर्यंत सर्व स्तरांतून मागणी आहे. यात अगदी मोठमोठय़ा कंपन्यांमध्ये उपाध्यक्ष, संचालक किंवा सीईओसारख्या पदांवर काम करणारे लोकसुद्धा आहेत. ही वाढती मागणी लक्षात घेता अनेक विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्था त्यांच्या  टइअ किंवा डिजिटल मार्केटिंगसारख्या कोर्सेसच्या अभ्यासक्रमात बदल करून ‘एआय’विषयक अभ्यासाचा समावेश करत आहेत. ही खरच एक सकारात्मक बाब आहे’.

जगभर सुरू असलेल्या या ‘एआय’ क्रांतीत भारताचे स्थान आणि भूमिका महत्त्वाची असणार आहे. आज जेव्हा आपण जगातली तिसरी सगळय़ात मोठी अर्थव्यवस्था होण्याबद्दल बोलतो तेव्हा या प्रवासात येणाऱ्या काळात ‘एआय’ क्षेत्राचा वाटा महत्त्वाचा असणार आहे. आज भारतात आरोग्य सुविधा, शेती, अर्थ तंत्रज्ञान अशा अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये ‘एआय’चा वापर वाढला आहे. पुणे, बंगलोर, मुंबई अशा महत्त्वाच्या शहरांमध्ये ‘एआय’ क्षेत्रातले स्टार्टअप्स वाढत आहेत. अनेक बडय़ा कंपन्या आणि भांडवलदार या क्षेत्रात गुंतवणूक करायला उत्सुक दिसत आहेत. गव्हर्नन्समध्ये ‘एआय’चा प्रभावी वापर कशा प्रकारे होऊ शकतो याची चाचपणी सरकारकडून केली जात आहे. यासाठी ‘इंडिया  AI’ सारखे पोर्टल भारत सरकारच्या मार्फत चालवले जात आहे. या पोर्टलवर ‘एआय’ विषयातल्या बातम्या, लेख, सरकारची भूमिका, धोरणे, ‘एआय’ला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारच्या पुढाकाराने झालेल्या गोष्टी, कौशल्य विकासाच्या योजना या बाबींची माहिती उपलब्ध आहे.

पुण्यातील  E42 या  AI क्षेत्रातील स्टार्टअपचे सहसंस्थापक अनिमेश सॅम्युअल यांच्या मते, ‘आज मार्केटिंग, सेल्स, फायनान्स, कस्टमर सव्‍‌र्हिस या सर्वच शाखांमध्ये ‘एआय’चा वापर होऊ लागला आहे. याचे अनेक फायदे आहेत. सेवांचा दर्जा उंचावला आहे, उत्पादकता वाढली आहे, कमी वेळात अधिक काम आणि तेही अचूक! हे ‘एआय’मुळे साध्य होत आहे. आज भारताची तरुण लोकसंख्या, युवा प्रतिभा या आपल्या जमेच्या बाजू आहेतच. पण जोडीला बीपीओ आणि सॉफ्टवेअर आऊटसोर्सिगसारख्या क्षेत्रातले आपले जागतिक स्थान लक्षात घेता भारताकडे जगाचे ‘एआय’ हब बनण्याची क्षमता आहे. अ‍ॅक्सेंचुअर कंपनीच्या एका अहवालानुसार ‘एआय’च्या माध्यमातून, भारताच्या एकूण उत्पादनात २०३५ सालापर्यंत ९५३ बिलियन डॉलर्सची भर पडू शकते. त्यामुळे जगात सुरू असलेल्या या ‘एआय’ क्रांतीत भारताला कोणीही डावलू शकत नाही.’ पण या तंत्रज्ञानाची एक दुसरी बाजू ही आहे जी फारशी बरी नाही.

‘एआय’च्या माध्यमातून अनेक क्षेत्रांमध्ये जी प्रगती झाली आहे त्यामुळे अनेक ठिकाणची मानवी गरज ही संपण्याची भीती आहे. ज्यामुळे अनेक नोकऱ्यांवर टांगती तलवार आहे. एका वृत्तवाहिनीने गेल्या वर्षी प्रकाशित केलेल्या एका वृत्तानुसार २०२३ च्या मे महिन्यात तब्बल ४००० लोकांना ‘एआय’मुळे त्यांची नोकरी गमवावी लागली होती. त्यामुळे वाढत्या ‘एआय’च्या वापरामुळे नोकरकपातीचा धोका नक्कीच मोठा आहे. काही दिवसांपूर्वी केरळच्या एका शाळेत कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ‘आयरिस’ नावाच्या एका रोबोटने विद्यार्थ्यांना धडे दिले होते. असे नावीन्यपूर्ण प्रयोग जवळपास प्रत्येक क्षेत्रातच होत आहेत. २०१० साली प्रदर्शित झालेल्या रजनीकांतच्या रोबोट या चित्रपटात एका गरोदर बाईची प्रसूती शस्त्रक्रिया करताना रोबोट दाखवला होता. विचार करा भविष्यात असे शिक्षक किंवा डॉक्टर झालेले रोबोट जर कार्यरत झाले तर नोकरदारांसाठी हे किती मोठे आव्हान असेल. आज याच तंत्रज्ञानाचा वापर करून डीपफेक व्हिडीओज बनवून समाजमाध्यमांवर प्रसारित केले जातात. ज्यात अगदी चेहरा, आवाज, चेहऱ्यावरचे हावभाव या सर्व गोष्टी अगदी हुबेहूब टिपल्या जातात. काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध सिनेअभिनेत्री रश्मिका मंदानाचा एक डीपफेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अभिनेत्री कटरिना कैफ, नोरा फतेही यांचे देखील असे व्हिडीओ तयार करण्यात आले आहेत. नुकत्याच समोर आलेल्या एका प्रकरणात इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मिलोनी यांचा एक अश्लील व्हिडीओ डीपफेक तंत्रज्ञानातून तयार केला आणि एका वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आला. या प्रकरणात दोन आरोपींना अटक झाली असून न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे.

या उदाहरणांतून पुन्हा एकदा राइट टू प्रायव्हसी आणि डाटा प्रोटेक्शनसारखे महत्त्वाचे विषय ऐरणीवर आले आहेत.

‘एआय’विषयक हे संभाव्य धोके लक्षात घेता या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करताना जनजागृती करणे किती आवश्यक आहे हे अधोरेखित होते. आज हे तंत्रज्ञान अगदी सहज आणि मोफत उपलब्ध आहे. पण ते वापरत असतानाच त्याबद्दलच्या जबाबदारीची जाणीव असणेही तितकेच गरजेचे आहे.

viva@expressindia.com