scorecardresearch

सफरनामा: घळीचा थरार!

‘घळ’ हा निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार आहे. कात्राबाईची घळ ही सह्याद्रीमधील सर्वात खोल घळ आहे. घळीची सैर करणे म्हणजे अत्यंत कठीण काम.

Loksatta viva Safarnama Nature Katrabai Ghal is the deepest ghal in Sahyadri
सफरनामा: घळीचा थरार!

मितेश रतिश जोशी

‘घळ’ हा निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार आहे. कात्राबाईची घळ ही सह्याद्रीमधील सर्वात खोल घळ आहे. घळीची सैर करणे म्हणजे अत्यंत कठीण काम. दोन्ही बाजूला उंचच उंच अजस्र कडे आणि त्यात मानव म्हणजे जणू मुंगीच.. पण तिथून सह्याद्रीच्या रांगडय़ा रूपाचे आणि नितांतसुंदर निसर्गाचे दर्शन मात्र घडते.

Loksatta Chaturang mother father career job Psychological effects on children themselves
मुलांना हवेत आई आणि बाबा!
Todays parents are literally living two lives how and why
सांदीत सापडलेले.. ! एका जगण्यात दोन आयुष्यं!
Loksatta viva The ways of celebrating Valentine Day changed rapidly with time
जुनंच प्रेम, नवं सेलीब्रेशन
varsity jackets for collegevarsity jacket in youth college life varsity jackets in style
फॅशन आठवणींच्या कप्प्यातली..

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा.. ही ओळ महाराष्ट्राचे रांगडे रूप दाखवते. महाराष्ट्रात भ्रमंती करताना अशा एका उंच टोकावर आल्यावर सह्याद्रीचे रौद्र रूप दिसते. त्यासोबत असतो मनाला आनंद देणारा निसर्ग! अशा या नितांतसुंदर पण तितकेच रौद्र रूपाचे दर्शन आपल्या भटकंतीतून घेतलेल्या तरुण तुर्काचा सफरनामा आज पाहू या. दोन्ही बाजूला भिंतीसारखे डोंगर असून मधल्या भागात असलेल्या अत्यंत अरुंद दरीला घळ असे म्हणतात. पावसाच्या पाण्याच्या क्षरणकार्यामुळे जमिनीवर, विशेषत: डोंगरउतारावर, तयार झालेला खोल, अरुंद, लांब व बहुधा वाकडातिकडा भूभाग. पाण्याबरोबर आलेल्या दगडगोटय़ांच्या घर्षणामुळे घळ अधिकच खोल व रुंद होत जाते. पावसाळय़ानंतर घळ कोरडी पडते. ती शेवटी नदीनाल्यास मिळते किंवा सपाटीवर संपते. घळीच्या बाजूंवर कधी कधी गवत किंवा झुडपे उगवलेली दिसतात. वेडय़ावाकडय़ा, कोरडय़ा घळीत आणि तिच्या कपारीत वन्य श्वापदांना किंवा एकांतप्रिय माणसांना आसरा मिळतो. गाळजमिनीत प्रवाहांमुळे खोल घळी तयार होऊन शेवटी उत्खातभूमी बनते. सपाट जमिनीवरही वनस्पतीचे आच्छादन नसेल, तर पावसाच्या पाण्याने मातीचे कण वाहून जाऊन तिच्यावर लहान लहान नाळी पडतात. शेजारशेजारच्या नाळी एकत्र होऊन घळ बनते. अशा या सह्याद्रीमधील सर्वात खोल कात्राबाईच्या घळीची सैर मुंबईच्या सूरज मालुसरे या तरुणाने व त्याच्या तीन साथीदारांनी केली आहे.    

हा सफरनामा इतर सफरनामांपेक्षा निश्चितच कठीण आणि संघर्षमय होता. सर्वात पहिला संघर्ष होता तो म्हणजे पिण्याच्या पाण्याचा. या घळीमध्ये येण्यासाठी सूरजने सर्वप्रथम पिण्याच्या पाण्याची सोय केली. घळ खाली उतरताना रतनगडाच्या चौफुल्याच्या वाघ टाक्याचे ४० ते ५० लिटर पाणी कॅनमध्ये भरून घेतले. नाही तर पाण्यासाठी रांजण सुळक्याच्या खाली साधारण दीड तासानंतर पाणी मिळाले असते. मधल्या सहा रॉक पॅचेसमध्ये कुठेच पाण्याचा अंश नाही. खालून पाणी चढवायचे कामही खूप जिकिरीचे आहे. एखाद्या डोंगरमाथ्यावर पाणी पोहोचवणे तसे खूप सोपे असते, पण घळीमध्ये पाणी पोहोचवणे किंवा जेवण घेऊन जाणे महामुश्कील आहे. जी व्यक्ती जेवण किंवा पाणी घेऊन येतेय तिला गिर्यारोहणासारखे साहस स्वत:हून जमले पाहिजे तरच काही तरी होऊ शकते. त्यामुळे सूरज व त्याच्या साथीदारांनी पाण्याबरोबरच गुळपोळी, सफरचंद, संत्री, मॅगी, चहा, कॉफी, खिचडीचे सर्व सामान एकत्र करून बॅगेत अक्षरश: कोंबले होते.    

घळीची सैर एकूण तीन दिवसांची होती. रतनगडाच्या दक्षिण बाजूने बघितले की समोरील करवतीच्या पात्यासारखी कातरलेली डोंगररांग म्हणजे कात्राबाईची डोंगररांग होय. सात डोंगर करवतीच्या पात्याप्रमाणे तयार झाले आहेत, कात्राबाईचे सौंदर्य खरे तर पावसाळय़ात व हिवाळय़ात पाहायला खूप छान वाटते. धुक्याने अंथरलेल्या ढगांच्या आच्छादनात यांचे रूप बघताना देहभान विसरायला होते. पहिल्या दिवशी शाही नदीपात्राच्या बाजूने सुरू झालेली वाट उंचच उंच अजस्र कडय़ांपाशी येऊन थांबली. निसर्गाच्या नजीक नदीपात्रातील जेवणाची पंगत म्हणजे कोणत्याही फिरस्त्यासाठी स्वर्गसुखच! अशा या सुखाचा अनुभव घेऊन रतनगडला मागच्या बाजूला ठेवून सर्वानी रांजणच्या दिशेने कूच केली. सूर्यास्ताआधी रांजण सुळक्याच्या पायथ्याला मुक्कामाची जागा निश्चित करून पाण्याची सोय कुठे करता येईल का, याची चाचपणी करून प्लास्टिक पिशवीच्या साहाय्याने टोपात पाणी जमा करायचे काम केले, असे सूरज सांगतो. त्यानंतर सूरज व त्याच्या साथीदार प्रमोदने एक जुगाड केला. सूर्य मावळायला काही मिनिटे बाकी असताना पहिल्या रॉक पॅचच्या खाली जाऊन पाहणी केली. एका रबरी बॉलला नायलॉनची दोरी लावून चोक स्टोनच्या वरती टाकण्याचा प्रयत्न केला. दोन वेळा अपयश आले, पण तिसऱ्या वेळेला बॉल बरोबर त्या गॅपमधून बाहेर आला. लगेच दहा एमएमचा रोप लावून दुसऱ्या बाजूला खेचून घेतला. त्यामुळे उगाच त्या कातळाला ड्रिलने चैन ब्लोटिंग करून चढाई करावी लागली नाही. निसर्गाला आपल्या आनंदासाठी त्रास नको या विचाराने हा जुगाड केल्याचे त्याने सांगितले. सहा जण खाली बेस कॅम्पला थांबले. सूरजबरोबर सचिन मदने, प्रसाद सावंत, वसंत यादव असे चौघे जण हा थरार अनुभवत होते.      

दुसऱ्या दिवशी सकाळी कातळाची पूजा करून प्रस्तरारोहणाला त्यांनी सुरुवात केली. उंच किंवा उभ्या कडय़ांवर एखाद्या उपकरणाच्या मदतीने चढण्याची क्रिया म्हणजे प्रस्तरारोहण होय. सर्वात पहिले २० फूट डोंगराची खडकाळ उतरण होती. त्यानंतर सूरजने जुमारिंग सुरू केले. जुमारिंग म्हणजे गिर्यारोहाणामध्ये उपयुक्त अशी दांडा असलेली पकड, ती ज्या दोराला अडकवलेली असते त्या दोराच्या वरच्या बाजूला सहजपणे सरकते, पण खालच्या दिशेने दाब देताच ती स्थिर होते. अंदाजे २० फुटांवरती जुमारिंग करत पहिला बोल्ट मारून हँगर प्लेटमध्ये क्विक ड्रॉ टाकून सूरजने स्वत:ला लीड क्लायिम्बगच्या रोपने सुरक्षित केले. सूरजला खालून सचिनने  belay दिला होता. अजून १५ फूट जुमारिंग करून चोक स्टोनच्या खाली दुसरा बोल्ट मारला. मजल दरमजल करत पहिल्या रॉक पॅचचा माथा आम्ही गाठला, असे सूरजने सांगितले. अशा एकूण सहा पॅचमधून त्यांना प्रवास करायचा होता. वर काही आणीबाणी आलीच तर खालची टीम हा टप्पा चढून वर पोहोचू शकेल या हेतूने सूरजने रोप यू करून खाली सोडून दिले. दुसरा आणि तिसरा रॉक पॅच तसा एकमेकांना लागून होता. त्यात दुसऱ्या पॅचखाली मुबलक पाणी वाहत होते. सूरज व त्याच्या साथीदारांचा दुसऱ्या दिवशीचा मुक्काम एका कपारीत होता.     

तिसऱ्या दिवशी सकाळी तिसरा रॉकपॅच सर करण्याची त्यांची धडपड सुरू झाली. धडपड हा शब्दच इथे योग्य राहील. कारण इथे सूरज दोन वेळा पाय ठेवताना घसरला. त्याला इतर साथीदारांनी धीर दिला व त्याने अखेर तिसऱ्या रॉकपॅचवर पाऊल ठेवले. तासाभरात चौथा व पाचवा रॉकपॅचही त्यांनी सर केला. शेवटचा व सहावा रॉकपॅच सर करायला सुरुवात केली. समोर कात्राबाईचा माथा दिसत होता. आता काहीही झाले तरी पण आपण आजच्या आज कात्राबाईचा माथा गाठायचा असा सर्वानी निर्धारच केला. दुपारचे चार वाजून गेले होते. शेवटचा पॅच गिर्यारोहणासाठी उत्तम होता. मोहिमेचा शेवटचा टप्पा दिसत होता. त्यामुळे सर्वाच्या अंगात बळ आले. मागोमाग क्रमाने सर्व वरती आले. कात्राबाईचा माथा गाठल्यानंतर सर्वानी ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा देत जल्लोष साजरा केला. अशा प्रकारे ही घळमोहीम फत्ते झाली.    

निसर्गाच्या सान्निध्यात, आभाळाच्या उघडय़ा छताखाली सूरज व त्याच्या साथीदारांचे तीन दिवस नितांतसुंदर गेले. ही घळमोहीम अत्यंत कठीण व तितकीच जीवघेणी होती. आमच्यातल्या एकाला जरी डॉक्टरची आवश्यकता लागली असती तर डॉक्टरला आमच्यापर्यंत यायलाच दोन दिवस गेले असते. त्यात तो डॉक्टरही ट्रेकर असायला हवा ही किमान अट. ट्रेकिंग, पदभ्रमण, गिरिभ्रमण किंवा गिर्यारोहण या साऱ्या भ्रमंतीच्या चढत्या भाजण्या आहेत. या साऱ्या प्रवासाचे विश्वच निराळे, याची जीवनशैली निराळी. इथे रुजण्यासाठी, बहरण्यासाठी काही गोष्टींची सवय, अभ्यास, जाणीव, काळजी असावी लागते. ‘घळ उतरणे निराळे व घळ चढणे निराळे. आम्ही घळ उतरलो नाही, तर आम्ही घळ चढलो. कात्राबाईची घळ इतर घळीप्रमाणे सलग चढाई करू देत नाही. एक रॉक पॅच संपल्यावर दुसऱ्या रॉक पॅचवर जाताना मध्ये पायथा गाठण्यासाठी पंधरा मिनिटांची चाल आहे. त्यामुळे घळ सर करणे म्हणजे गिर्यारोहण नाही. आणि केवळ चालणेही नाही’ असे सूरज सांगतो. 

घळ उतरणे जेवढे अवघड त्याच्या दहापट अवघड घळ चढणे आहे. त्यामुळे हा सफरनामा म्हणजे आपली वाट आपल्यालाच शोधायला भाग पाडणारी लय अवघड गोष्ट आहे.

viva@expressindia.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Loksatta viva safarnama nature katrabai ghal is the deepest ghal in sahyadri amy

First published on: 09-02-2024 at 03:39 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×