हॅरी पॉटर, बॅटमॅन, सुपरमॅन, क्रिश, रजनी, गझनी या टेक्नोकॅट्र अवलियांपूर्वीच्या काळात ‘रॉबिन हुड’ नामक म्होरक्या आणि त्याची फौज लोकप्रिय होती. याच माणसाच्या नावाने एक सकारात्मक चळवळ फोफावत आहे. व्हायरल म्हणजे नंबर क्रंचिंग आलंच. पण काही वेळेला नंबरांपल्याडचा विचार आणि मनाच्या सांदीकोपऱ्यात हळूहळू झिरपणाऱ्या व्हायरल गोष्टींची दखल घेणं आपलं काम.
शीर्षक वाचून चकित झालात ना.. नोस्टॅलजिक वगैरे झालात ना.. आमचंही तसंच झालेलं! इंग्लंडच्या लोकसाहित्यामधला ‘रॉबिन हुड’ नायक विलक्षण लोकप्रिय. बाराव्या शतकात नॉटिंगहमशायर परगण्यात वावरणारा जनतेचा नेता. जुलुमी धनदांडग्या श्रीमंतांना लुटणारा, मात्र गोरगरीब जनतेच्या मदतीला धावून जाणारा मसिहा. रानावनात राहून तीरकमठय़ाच्या जोरावर प्रस्थापित राजेशाहीला आव्हान देणारा शूरवीर. तो आणि त्याच्या जिवाला जीव देणाऱ्या सवंगडय़ांच्या कहाण्या अनेकांच्या बालपणीचा ठेवा होता. ‘रॉबिन हुड’ नावाचा वल्ली खरंच होता की या सगळ्या मनघडत कहाण्या हे इतक्या वर्षांनंतरही गुलदस्यात आहे. पण व्यवस्थेला आवाज देण्याची, ठगांना वठणीवर आणण्याची आणि गरजू जनतेला उपयोगी पडण्याच्या वृत्तीमुळे ‘रॉबिन हुड’ आजही जगभरातल्या चाहत्यांच्या मनात घर करून आहे. याच ‘रॉबिन हुड’ विचारातून भारतात एक चळवळ रुजते आहे. त्यांचं नावच मुळी असं आहे- ‘रॉबिन हुड आर्मी.’ ते हिंसक काही करत नाहीत. प्रस्थापित व्यवस्थेवर टीका करण्याऐवजी ते व्यवस्थेला पूरक असा उपक्रम राबवतात. अन्न पर्यायाने भूक ही प्राथमिक गरज. विविध कारणांमुळे अनेकांना तेही मिळत नाही. या गरजूंना अन्न पुरवण्याचं काम ही मंडळी करतात.

या ‘आर्मी’चे नियमही कठोर असे आहेत. या नियमांमध्येच त्यांच्या कामाचं यश दडलं आहे. हुड आर्मी कोणाकडूनही पैशाच्या स्वरूपात देणगी स्वीकारत नाहीत. पैशाचा व्यवहारच नाही. त्यामुळे इंटरेस्ट, वेस्टेड इंटरेस्ट, कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट रुजायला वावच नाही. तुम्ही जे अन्न स्वत: खाऊ शकता तेच अन्न दुसऱ्याला द्यायचं. याचा अर्थ भपकेबाज सोहळ्यांमध्ये असंख्य पदार्थ हारीने मांडलेले असतात. पदार्थाची संख्या पाहूनच माणूस दमतो आणि प्रत्यक्षात कमी खातो. तर अशा समारंभामध्ये उरलेलं आणि पर्यावरणद्रोही प्लॅस्टिकच्या पत्रावळ्यांमधून वाहणारं अन्न चालत नाही. मुळातच घर, हॉटेल, ऑफिस काहीही असो-तुम्हाला नकोय म्हणून टाकून दिलेलं अन्न हुड आर्मीला चालत नाही. नील घोस आणि आनंद सिन्हा या २७ वर्षांच्या युवा जोडगोळीच्या डोक्यातून साकारलेली ही संकल्पना. कामाच्या निमित्ताने नील पोर्तुगालमध्ये होता. तिथे रीफूड नावाचा उपक्रम चालतो. विविध ठिकाणी तयार झालेलं अतिरिक्त अन्न स्वयंसेवकांच्या माध्यमातून गरजूंना पुरवलं जातं. नीलने पोर्तुगालमध्ये आपलं काम सांभाळून रीफूडचा स्वयंसेवक म्हणून काम केलं. त्यांची कामाची पद्धत समजून घेतली. मायदेशी परतल्यानंतर मित्र आनंदच्या साह्य़ाने त्याने ‘रॉबिन हुड आर्मी’ची स्थापना केली. दिल्लीतून सुरू झालेली ही चळवळ देशभरातल्या २२ शहरांत पसरली आहे. पलीकडच्या पाकिस्तानातही या आर्मीची शाखा निर्माण झाली आहे.

upsc student surprised father with upsc 2023 result in his office then what happened you will get cry watch viral video
या आनंदाला तोड नाही! UPSC निकालानंतर वडिलांच्या ऑफिसमध्ये पोहोचला लेक अन्…; VIDEO पाहून पाणावतील तुमचेही डोळे
What Mahua Moitra Said?
“S*X…” तुम्हाला उर्जा कुठून मिळते? महुआ मोइत्रांच्या कथित उत्तराचा व्हिडीओ व्हायरल
How to restrict WhatsApp media downloads
‘गुड मॉर्निंग’च्या फोटोने गॅलरी फुल? WhatsApp सेटिंगमधील ‘हा’ एक बदल करील तुम्हाला मदत; पाहा टिप्स….
randeep surjewala made controversial remarks on hema malini
हेमा मालिनी यांच्याबाबत रणदीप सुरजेवालांचं वादग्रस्त वक्तव्य, कंगनाची तिखट शब्दांत प्रतिक्रिया, “द्वेष आणि तिरस्कार..”

वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणारी माणसं असल्याने रविवारचा दिवस अन्नदानासाठी मुक्रर केला जातो. या आठवडय़ात दिल्लीतल्या कालिंदी कुंज भागातल्या रोहिंग्या अर्थात संक्रमण वस्तीत हुड आर्मी दाखल झाली. सातत्याने अतिक्रमण, विस्थापन, बेघर असे शब्द कानावर पडणाऱ्या चिंतातूर मंडळींना सुग्रास वाफाळतं भोजन देण्यात आलं. आपल्या मूळ ठिकाणापासून विलग झालेल्या या मंडळींना जुगाडवाल्या दिल्लीत कोणी विचारत नाही. पण हुड आर्मीने त्यांच्या चेहऱ्यावर ‘अन्नदाता सुखी भव’ पाहिले. साप्ताहिक उपक्रम दैनंदिन करण्यासाठी आर्मीला स्वयंसेवक आणि दात्यांची आवश्यकता आहे.

मार्च महिन्यापासून जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात हुड आर्मीने आपल्या कामाचं सादरीकरण दिलं. खाच असलेला चौकोनी डबा घेऊन खंडणीरूपी देणगीसाठी लुटारू भिक्षेकरी फिरतात तसं नव्हे. ‘आम्ही आपापले व्याप सांभाळून असं काम करतो. अन्नाची गरज असणारे खरे गरजू कोण? अन्न कोण पुरवू शकतं? त्याचा दर्जा सांभाळला जातोय ना? अन्नाची स्वच्छ आणि सुरक्षित ने-आण कशी होईल? अशा स्वरूपाची कामं असतात. पैसा आम्ही गोळा करतच नाही. देशातल्या व्यवस्थेवर टीका करण्यापेक्षा आपण किंचित काही करू शकतो का हे आजमावण्याचा हा प्रयत्न’, या छोटय़ा पण अर्थपूर्ण निवेदनाने जामिया मिलिया विद्यापीठातून असंख्य हात हुड आर्मीशी जोडले गेले. आजकालची पिढी म्हणजे गॅझेट्स आणि सोशल मीडिया अशा टीकेला त्यांनी फेसबुक, ट्विटर, व्हॉट्स अपचा सकारात्मक उपयोग करून प्रत्युत्तर दिलं आहे.

कामाचं विकेंद्रीकरण हा रॉबिन हुड आर्मीचा परवलीचा शब्द. नजीकच्या परिसरातल्या हॉटेलांना अतिरिक्त अन्न गरजू व्यक्तींना देण्यासाठी समजावणे आणि खऱ्याखुऱ्या गरजूंचा शोध घेणे यासाठी छोटय़ा टीम्स तयार केल्या जातात. सुरुवातीला हॉटेलवाली मंडळी आढेवेढे घेत. ‘रॉबिन हुड आर्मी’ आणि गरजूंना जेवण हे कॉम्बिनेशन ऐकल्यावर विचित्र नजरेने बघत. आम्ही अन्न देऊ पण तुम्ही नेणार कसं, केव्हा असे नानाविध प्रश्न विचारत. हुड आर्मीच्या पाठपुराव्यानंतर देशभरातली मोठ्ठी हॉटेल्स त्यांच्याशी संलग्न झाली आहेत. सुट्टीच्या दिवशी हा उपक्रम होत असल्याने एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्स अप ग्रुप आहे. त्याचं नावही भन्नाट आहे- ‘बॉयलर रूम’. एकटय़ा दिल्लीत ३० रेस्तराँनी बिर्याणीपासून ब्राऊनीपर्यंत हुड आर्मीला अन्न पुरवले आहे. रॉबिन हुडची प्रतिमा असलेले हिरवे टीशर्ट आणि जीन्स पोशाखातले हुड आर्मीचे स्वंयसेवक परिसरात दिसू शकतात. ‘अच्छे दिन’च्या लाटेतही या आर्मीची समाजाला गरज आहेच..
(जिज्ञासूंनी भा.रा. भागवत यांचे ‘रॉबिन हुड आणि त्याचे रंगेल गडी’ पुस्तक आवर्जून वाचावे. न जाणो तुम्हालाही प्रेरणा मिळायची.)

– पराग फाटक