scorecardresearch

Wear हौस: स्टेटमेंट स्लीव्ह्ज

ऐकताना हे थोडं विचित्र वाटेल, पण तयार कपडय़ांची खरेदी करताना मी पहिल्यांदा ड्रेसच्या स्लीव्ह्ज पाहते.

ऐकताना हे थोडं विचित्र वाटेल, पण तयार कपडय़ांची खरेदी करताना मी पहिल्यांदा ड्रेसच्या स्लीव्ह्ज कशा आहेत हे पाहते. अनेक जणींचं नकळतपणे बाह्य़ांवर लक्ष जात असतं, तरीही बाह्य़ांची आपण वेगळी दखल खरेदी करताना घेतोच असं नाही. स्लीव्ह, बाही, आस्तीन, हात.. काहीही म्हणा या नावांपेक्षा जास्त वैविध्य त्यांच्या प्रकारात आहे. अगदी स्लीव्हलेस म्हणजेच बिनबाह्य़ांच्या ड्रेसपासून ते हाफ स्लीव्ह, पफ स्लीव्ह, बलून स्लीव्ह, थ्री-फोर्थ स्लीव्ह, फुल स्लीव्ह असे किती प्रकार आणि त्याचे उपप्रकार तुम्हाला पाहायला मिळतात. गंमत म्हणजे बाह्य़ांच्या प्रकारावरून तुम्हाला काळानुसार बदलत आलेल्या फॅशन ट्रेण्ड्सची सांगड सहज घालता येते. बलून किंवा घेरदार स्टाइलच्या व्हिक्टोरियन स्लीव्ह्ज एकोणीसाव्या शतकापर्यंत सगळीकडे दिसायच्या. वीसाव्या शतकात त्यात क्रांतिकारी बदल झाला आणि फ्लॅपर ड्रेसच्या स्लीव्हलेस स्टाइलमध्ये त्याचं रूपांतर झालं. पुढे पन्नासाव्या दशकातील लांब बाह्य़ांचा रोमँटिसिझम आला. साठच्या दशकातल्या शॉर्ट स्लीव्ह, सत्तरच्या दशकातील बेल स्लीव्ह्ज इथपासून नव्वदीच्या दशकातील क्रिस्प शर्ट स्लीव्हपर्यंत अख्खा कपडय़ांच्या फॅशनचा इतिहास फक्त स्लीव्ह्जच्या वेगवेगळ्या प्रकारांवरून सांगता येईल. म्हणूनच कपडय़ाच्या स्टाइलमध्ये आणि फॅशनमध्ये बाह्य़ा महत्त्वाची भूमिका बजावतात.

सध्याचा ट्रेण्ड ‘स्टेटमेंट स्लीव्ह’चा आहे, असं म्हणायला हरकत नाही. अर्थात स्लीव्ह नेहमीच तुमच्या कपडय़ाचं स्टेटमेंट बनू शकते यात वादच नाही. एक साधा, सिंपल शर्ट शिवताना शर्ट स्लीव्हऐवजी बलून स्लीव्ह शिवून बघा, शर्टचा लुक लगेच बदलेल. अगदी एका कुर्त्यांतसुद्धा फक्त स्लीव्हच्या प्रकाराने तुम्ही किती बदल आणू शकता. कॉटन, सिल्क, जॉर्जेट, लायक्रा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कापडांच्या एकाच प्रकारच्या ड्रेसवर एकाच प्रकारची स्लीव्ह वेगवेगळा परिणाम साधू शकते. त्यामुळे पुढच्या वेळी ड्रेस शिवताना स्लीव्हवर थोडं जास्तीच लक्ष द्या. यंदाच्या सीझनमध्ये बेल स्लीव्हचा बोलबाला आहे. पूर्ण बाह्य़ांच्या या प्रकारात बाह्य़ांना पुढे झालर असते. त्यामुळे तिचा आकार घंटेप्रमाणे दिसतो. स्ट्रेट स्लीव्हमध्ये मनगटापासून स्लिट असलेला स्लीव्हचा प्रकार सध्या ट्रेंडमध्ये आहे. या बाह्य़ा हातापेक्षा थोडय़ा लांब असतात आणि स्लिटपासूनच्या भागाला फ्लेअर दिलेला असतो. त्यामुळे ड्रेसला केपचा लुक मिळतो. घागरा चोलीमध्येही हा प्रकार तुम्हाला पाहायला मिळेल. एकूणच व्हिक्टोरियन स्लीव्ह्ज यंदा पुन्हा पाहायला मिळतील. या सर्व स्लीव्ह्ज फुल स्लीव्हच्या प्रकारात मोडतात. बलून स्लीव्ह (मनगटापाशी घेरदार), एंजल (बेल स्लीव्हपेक्षा घेरदार), किमोनो स्लीव्ह, ट्रम्प्लेट स्लीव्ह (मध्यापर्यंत स्ट्रेट आणि नंतर घेरा असलेल्या) असे वेगवेगळे प्रकार तुम्हाला यंदा पाहायला मिळतील. फॅशनमध्ये सत्तरीचे दशक नव्या स्वरूपात यंदा पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सत्तरीच्या दशकातील हिंदी सिनेमातील फुलाफुलांचे लांब बाह्य़ांचे शर्ट पुन्हा बाजारात आले तर आश्चर्य मानायला नको. आखूड बाह्य़ांच्या चाहत्यांसाठीसुद्धा या ट्रेंडमध्ये पफ स्लीव्ह(आखूड बलून स्लीव्ह), कॅप स्लीव्ह (२-३ इंच लांबीचा स्लीव्ह), बटरफ्लाय स्लीव्ह (मध्यम उंचीचा अँजल स्लीव्ह) असे बरेच पर्याय आहेत. एक ट्विस्ट म्हणून स्लीव्ह्ज कपडय़ांमध्ये सजावटीप्रमाणे वापरायचा प्रयत्न काही डिझायनर्सनी या वर्षी केला आहे. त्यामुळे गाठ मारलेल्या स्लीव्हचा स्कर्ट, एकाच वेळी तीन-चार स्लीव्ह असलेले टय़ुनिक असे भन्नाट प्रयोगही रॅम्पवर पाहायला मिळतील. तुमच्या बॉडीशेप, ड्रेसच्या प्रकारावरून योग्य स्लीव्ह निवडणं महत्त्वाचं असतं. ड्रेसची बाही तुमच्या व्यक्तिमत्त्वावर खूप परिणाम करू शकते. त्यामुळे याबाबतीत थोडी काळजी घेणं गरजेचं आहे.

छायाचित्रे अनुक्रमे :
१ आाणि २.- बलून स्लीव्ह, एंजल स्लीव्ह हे व्हिक्टोरियन स्टाइल स्लीव्हचे प्रकार यंदा ट्रेंडमध्ये आहेत. त्यामुळे आखूड बाह्य़ांना रजा देऊन परत लांब बाह्य़ांकडे वळण्याचा हा सीझन आहे. ३. – स्लीव्हमध्ये लेअरिंग, दोन वेगवेगळ्या रंगांच्या स्लीव्ह वापरणे असे अनेक प्रयोग यंदा आंतरराष्ट्रीय रॅम्पवर केले गेले. आपल्याकडेसुद्धा हे प्रयोग पाहायला मिळतील. ४. – आखूड स्लीव्ह्जमध्ये बटरफ्लाय स्लीव्ह, पफ स्लीव्ह अशा घेरदार स्लीव्हचा विचार यंदा नक्कीच करा. ५. -स्लीव्ह ड्रेसची आडवी रेषा निश्चित करतात. त्यामुळे मध्यम किंवा थ्रीफोर्थ स्लीव्ह्ज निवडताना स्ट्रेट, कमीतकमी घेरा असलेल्या स्लीव्ह्ज निवडा.

* शॉर्ट किंवा कॅप स्लीव्ह सगळ्याच बॉडी टाइपवर खुलून दिसते. त्यामुळे बाजारातील बहुतेक ड्रेसेस, ब्लाउजना याच स्लीव्ह असतात. अशा वेळी तुमच्या स्लीव्हला लटकन, पायपिंगने खुलवायला विसरू नका. दोन लेअरच्या शॉर्ट स्लीव्हसुद्धा दिसायला छान असतात. बटरफ्लाय, पफ स्लीव्ह हे प्रकार थोडा वेगळा पर्याय म्हणून नक्कीच वापरून पाहा.
* स्लीव्ह तुमच्या शरीरावर कपडय़ांची आडवी रेष निश्चित करते. त्यामुळे बॉडी टाइपनुसार स्लीव्हची लांबी निवडणं गरजेचं आहे. तुमच्या पोटाचा घेरा जास्त असल्यास मध्यम लांबीच्या स्ट्रेट स्लीव्ह निवडू नका. त्यामुळे फोकस पोटावर येईल. पेअर शेप बॉडी असलेल्या मुलींनी अति घेरदार फुल स्लीव्ह घातल्यास फोकस हिप्सवर येतो.
* थ्री-फोर्थ स्लीव्ह्जमुळे तुमची उंची अधिक दिसायला मदत होते तर फुल स्लीव्ह्जमुळे उंची कमी दिसते.
* तुमच्या ड्रेसमध्ये स्लीव्हला फोकस देणार असाल तर नेकलाइन सिंपल ठेवा. वर्तुळाकार नेकलाइन कधीही उत्तम. फुल स्लीव्हसोबत बंद गळा किंवा चायनीज कॉलर निवडल्यास तुम्ही जाड दिसू शकता.
* स्लीव्हवर प्रिंट निवडतानाही काळजी घेणं गरजेचं आहे. आडवे पट्टे, मोठे प्रिंट यामुळे स्लीव्ह अधिक घेरदार वाटतात. तर सरळ पट्टय़ांमुळे उंची अधिक दिसायला मदत होते.

मराठीतील सर्व Wearहौस ( Wear-haus ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Statement sleeves

ताज्या बातम्या