टोल आकारणीसाठी आणलेल्या कर्मचाऱ्यांना पिटाळल्याच्या कारणावरून गुरुवारी पोलिसांनी टोलविरोधी कृती समितीच्या १८ प्रमुख कार्यकर्त्यांना अटक केली. आणखी १५ अज्ञात लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या या कारवाईला टोलविरोधी कृती समितीने आज जोरदार आक्षेप घेतला. राजेश क्षीरसागर व चंद्रदीप नरके या शिवसेनेच्या आमदारद्वयांनी पोलीस उपअधीक्षक महेश सावंत यांना कोणीही उठून कृती समितीच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल करीत असाल तर ते सहन केले जाणार नाही, पोलिसांच्या अन्यायी कारवाईविरुद्ध विधिमंडळात आवाज उठविला जाईल असे स्पष्टपणे सांगितले.
 कोल्हापूर शहरातील अंतर्गत रस्त्यांवर टोल लागू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आयआरबी कंपनीने नाक्यांवरील बूथ उघडून त्याची सफाई चालू केली आहे. शिवाय मोठय़ा प्रमाणात कर्मचाऱ्यांची नियुक्तीही केली आहे. याची माहिती मिळाल्यानंतर टोलविरोधी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी मार्केट यार्ड, सरनोबत वाडी व आर. के. नगर येथील टोल नाक्यांच्या बूथची केबीन झाकण्यास भाग पाडले. तर उचगाव येथे राहणाऱ्या १५० कर्मचाऱ्यांना कोल्हापुरी हिसका दाखवत पिटाळून लावले.    
टोलविरोधी कृती समितीने केलेली ही कृती पोलिसांच्या दृष्टीने गंभीर बनली. टोल वसुलीचा ठेका घेतलेल्या नितीन वसंतराव भोईटे (मूळ रा. डोंबिवली, सध्या. उचगाव) यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना टोलविरोधी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण करून हुसकावून लावले, अशी फिर्याद गांधीनगर पोलीस ठाण्यात दिली. तर कॉन्स्टेबल विद्यानंद विलास कुंभार यांनी सरनोबतवाडी येथील जकात नाका कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी जबरदस्तीने झाकला व आयआरबीच्या कर्मचाऱ्यांना पिटाळून लावल्याची तक्रार दिली. याशिवाय कॉन्स्टेबल तुकाराम हिंदुराव पाटील यांनी अशाच प्रकारची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये दाखल केली.    
या तिन्ही तक्रारींची दखल घेत पोलिसांनी टोलविरोधी कृती समितीच्या कार्यकर्त्यांवर गुरुवारी कारवाई करण्याची भूमिका घेतली. पोलिसांच्या हालचाली कळताच कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी स्वत:हूनच आम्हाला अटक करावी, अशी मागणी केली. यासंदर्भात राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये पोलीस अधिकारी व कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा झाली. पोलीस उपाधीक्षक महेश सावंत, पोलीस निरीक्षक यशवंत केडगे यांनी फिर्याद दाखल झाल्यामुळे कारवाई करणे अपरिहार्य असल्याचे आंदोलकांना सांगितले. त्यावर सामान्य माणसाने तक्रार केली तरी पोलीस चौकशी करूनच कारवाई करतात. आम्ही सनदशीर मार्गाने आंदोलन करीत असताना कोणीही उठून केवळ तक्रार दाखल करतो म्हणून कारवाई करणे चुकीचे असल्याचे आंदोलकांनी ठणकावून सांगितले. चर्चेत भाग घेताना आमदार क्षीरसागर, आमदार नरके यांनी पोलिसांच्या कारवाईबाबत तीव्र नाराजी व्यक्त करून अन्यायी कारवाईबद्दल सभागृहात आवाज उठवणार असल्याचे सांगितले.    
दरम्यान पोलिसांनी टोलविरोधी कृती समितीच्या १८ कार्यकर्त्यांना अटक केली. निमंत्रक निवास साळोखे, रामभाऊ चव्हाण, बाबा इंदुलकर, दिलीप देसाई, बाबा पार्टे, दीपाली पाटील, मनीषा पाटील, रमेश पोवार, जयकुमार शिंदे आदींचा यामध्ये समावेश आहे. या सर्वाना सायंकाळी न्यायालयात उभे केले होते. त्यांच्या वतीने अ‍ॅड. अजित मोहिते, अ‍ॅड. शिवाजीराव राणे यांनी काम पाहिले. दरम्यान, शुक्रवारी केंद्रीय अबकारी आयुक्त कार्यालय येथे कृती समितीचे कार्यकर्ते जाणार आहेत. आयआरबी कंपनीने या विभागाचा कर चुकविला असून त्याच्या तपासामध्ये दिरंगाई होत असल्याचा जाब विचारला जाणार आहे.