सोलापूर-बार्शी रस्त्यावर शहराच्या हद्दीत बाळे येथे बोलेरो जीप व पिकअप गाडीची समोरासमोर धडक बसून घडलेल्या अपघातात बोलेरो गाडीतील दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य पाचजण जखमी झाले. फौजदार चावडी पोलिसांनी बोलेरोचालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी मध्यरात्री पावणेबाराच्या सुमारास हा अपघात झाला. यातील मृत व जखमी हे सर्व कळमण (ता. उत्तर सोलापूर) येथील रहिवासी आहेत.
विश्वनाथ उद्धव लंबे (वय ३२) व राजेश दत्तू माळी (वय ३५) अशी दोघा मृतांची नावे आहेत. कल्याण रंगनाथ साळुंखे (वय ५०), सुरेश अभिमान पाटील (वय ३३), विश्वनाथ सीताराम वाघमोडे (वय ४१), किसन रामा क्षीरसागर (वय ४०) व नीलेश अनंतराव पाटील (वय २४) यांचा जखमींमध्ये समावेश आहे. हे सर्वजण सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा विक्री करून काही वेळ थांबले व रात्री उशिरा गावाकडे परत निघाले होते. पंरतु शहर सोडताना बाळेजवळ समोरून येणाऱ्या पिकअप गाडीला या बोलेरोची धडक बसली. यात बोलेरोचालकाचा दोष असल्याचे दिसून आल्याने त्याच्याविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.