22 November 2017

News Flash

दहशतवाद्यांची माहिती देण्यासाठी ४० दूरध्वनी; ठोस माहिती मात्र नाही

इंडियन मुजाहिद्दिनचा म्होरक्या यासिन भटकळसह चार दहशतवाद्यांबद्दल माहिती देणाऱ्यास राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने १० लाखांचे

प्रतिनिधी, मुंबई | Updated: February 22, 2013 12:36 PM

इंडियन मुजाहिद्दिनचा म्होरक्या यासिन भटकळसह चार दहशतवाद्यांबद्दल माहिती देणाऱ्यास राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने १० लाखांचे इनाम जाहीर केल्यानंतर माहिती देण्यासाठी गेल्या आठवडय़ाभरात ४० दूरध्वनी आले. मात्र त्यापैकी एकाही दूरध्वनीचा ठोस माहिती मिळविण्यासाठी फायदा झाला नाही. दूरध्वनी करणाऱ्या काहींनी केवळ मिस्ड कॉल दिला. या क्रमांकावर एटीएसने चौकशी केली तेव्हा दूरध्वनी क्रमांक बरोबर आहे का, हे पाहण्यासाठी दूरध्वनी केल्याचे सांगण्यात आले.
  मुंबईत १३ जुलै २०११ रोजी झालेल्या बॉम्बस्फोटांप्रकरणी पाचजणांना तर पुण्यात गेल्या वर्षी १ ऑगस्ट रोजी झालेल्या बॉम्बस्फोटांप्रकरणी आठजणांना अटक करण्यात आली होती. मात्र या बॉम्बस्फोटामागील प्रमुख सूत्रधार यासिन भटकळसह अन्य दहशतवाद्यांविरुद्ध पाठपुरावा करूनही पोलिसांना तपासात फारशी प्रगती करता आलेली नव्हती. या पाश्र्वभूमीवर एटीएसने पुणे स्फोटांप्रकरणी मोहम्मद अहमद मोहम्मद झरार सिद्धीबाबा ऊर्फ यासिन भटकळ ऊर्फ इम्रान उर्फ शाहरुख (३०) याच्यासह असदुल्ला अख्तर जावेद अख्तर उर्फ हड्डी उर्फ तबरेज उर्फ शाकीर उर्फ डॅनियल (२६) आणि वकास उर्फ अहमद (२६) या तिघांना पुण्यातील स्फोटाप्रकरणी तर मुंबईतील बॉम्बस्फोटाबाबत तहसीन अख्तर वसीम अख्तर शेख उर्फ मोनू उर्फ हसन (२३) याला फरार घोषित करण्यात आले आहे. या बाबतची माहिती ०२२-२३७९१६१९ किंवा ९६१९१२२२२२ / ०८६५२०१२३४५ या मोबाईल क्रमांकावर किंवा atswantedaccused@gmail.com  किंवा atswantedaccused@yahoo.co.in  या मेल आयडीवर संपर्क साधावा, असे आवाहन एटीएसचे अतिरिक्त महासंचालक राकेश मारीया यांनी केले आहे.

First Published on February 22, 2013 12:36 pm

Web Title: 40 telephone for giving information of terrorise but not a concrete information