इचलकरंजीतील यंत्रमाग कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला ८५ पैसे मजुरीचा प्रस्ताव मान्य असल्याचे गुरुवारी स्पष्ट केले. मात्र बोनसच्या विषयाला त्यांनी बगल दिली. आठ तास पाळी, हजेरी कार्ड या मागण्यांसाठी कामगार नेते आग्रही राहिले.
इचलकरंजीतील यंत्रमाग कामगारांनी मजुरीवाढीसाठी गेल्या २१ जानेवारीपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी बैठक घेतली असता बोनससह प्रतिमीटर ८५ पैसे मजुरी व बोनसविरहित ९९ पैसे मजुरी असे दोन प्रस्ताव ठेवले होते. त्यातील ८५ पैसे मजुरीचा प्रस्ताव कामगार संघटनांनी मान्य केला. त्याची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी यंत्रमाग कामगारांनी कोल्हापुरात मोर्चा काढला.
यंत्रमाग कामगार संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वाखाली मोर्चाला सुरुवात झाली. ताराबाई पार्कातून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. मोर्चात ५ हजारांहून अधिक यंत्रमाग कामगार सहभागी झाले होते. मोर्चाचे नेतृत्व कॉ. दत्ता माने, प्रा. सुभाष जाधव, मिश्रीलाल जाजू, श्यामराव कुलकर्णी, सचिन खोंद्रे, सुखदेव लाखे, मदन मुरगुडे, भरमा कांबळे आदींनी केले.
जिल्हाधिकारी माने यांच्याशी चर्चा करताना कामगार नेत्यांनी ८५ पैसे मजुरी मान्य असल्याचे सांगितले. आठ तास पाळीचा त्यांनी आग्रह धरला असता माने यांनी सहायक कामगार आयुक्त बी. डी. गुजर यांना आठ तास पाळीचा कायदा असताना त्याचे उल्लंघन करणाऱ्या यंत्रमागधारकांवर खटले भरावेत, असा आदेश दिला. जिल्हाधिकाऱ्यांनी इचलकरंजीच्या प्रांताधिकाऱ्यांना या प्रश्नी सायंकाळी बैठक घेण्यास सांगितले असल्याचे स्पष्ट केले. त्यानुसार सायंकाळी साडेसहा वाजता बैठक सुरू झाली होती.