निफाड तालुक्यातील करंजगाव येथील संपूर्ण दारूबंदी नियंत्रण व देखरेख समितीचे अध्यक्ष खंडू बोडके यांना धमकाविल्याप्रकरणी निफाड पोलिसांनी अवैध मद्यविक्री करणाऱ्या संजय पवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी संजय पवार व सूर्यभान पवार यांना ताब्यात घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई केली.
करंजगावात संजय पवार काही वर्षांपासून अवैध दारूविक्रीचा व्यवसाय करत होता. दोन महिन्यांपूर्वी बोडके यांच्या पुढाकाराने श्रीराम मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे तक्रार करून अवैध मद्यसाठा पकडून दिला होता. या घटनेनंतर संशयिताने कोठुरे शिवारात गोदावरी नदीपात्रालगत अनधिकृत हॉटेल थाटून अवैध मद्यविक्री सुरू केली. ही विक्री बंद करण्याबाबत समितीचे अध्यक्षांनी समज दिली असता पवार पिता-पुत्राने दूरध्वनीव्दारे शिवीगाळ करून धमकावले. बोडके यांनी तक्रार दिल्यानंतर निफाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी संजय व सूर्यभान पवार यांना ताब्यात घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई केली.
करंजगाव व कोठुरे शिवारातील अवैध मद्यविक्री तात्काळ बंद न झाल्यास तहसील व पोलीस ठाण्यासमोर मद्यपींना गुलाबपुष्प देऊन गांधीगिरी मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा करंजगाव दारूबंदी समिती व श्रीराम मित्रमंडळाने दिला आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार मनोज खैरनार व पोलिसांना देण्यात आले.