प्रभाग क्र.६६ मधील पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याने तेथील महिला शनिवारी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरल्या होत्या. आंदोलनस्थळी आलेल्या महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना शिवसैनिक व महिलांनी धारेवर धरले. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन अधिकाऱ्यांनी आठवडाभरात पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. आंदोलनस्थळी मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.    
संभाजीनगर बसस्थानक परिसरात असलेल्या प्रभाक क्र.६६ मध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न गेल्या बऱ्याच काळापासून गंभीर बनला आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून या भागातील पाणीपुरवठा विस्कळीत कसा होईल, याचे डावपेच केले जातात असा आरोप येथील शिवसेनेच्या नगरसेविका अरूणा टिपुगडे यांनी सभागृहात केला होता. तरीही या प्रश्नाकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. यामुळे संतप्त झालेल्या भागातील महिलांनी शनिवारी वाशीनाका रस्त्यावर दुपारी रास्ता रोको आंदोलन सुरू केले. रिकाम्या घागरी व भांडी रस्त्यावर ठेवून आंदोलन करणाऱ्या महिलांनी महापालिकेच्या नावाने ठणाणा सुरू केला.
आंदोलनस्थळी उपजल अभियंता गायकवाड, पी.डी.माने आले होते. महापालिका या भागातील पाणीप्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असल्याबद्दल त्यांना धारेवर धरले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, माजी नगरसेवक दत्ता टिपुगडे, अरूणा टिपुगडे, चंदा माने, कमलाकर जगदाळे आदींनी आक्रमक भूमिका घेतली.अखेर आठवडय़ाभरात पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन देऊन अधिकाऱ्यांनी अंग काढून घेतले.