शासनाने नेमलेल्या वारकरी समन्वय समिती सदस्यांबरोबर चर्चा केल्या शिवाय जादू टोणा, अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक संमत केल्यास महाराष्ट्रभर सर्व वारकरी संघटना आंदोलन करतील, असे ह. भ.प. बद्रीनाथ महाराज तनपुरे, ह.भ.प. रामेश्वर शास्त्री वारकरी सांप्रदायाचे भीष्माचार्य निवृत्ती महाराज वक्ते यांनी शनिवारी दुपारी मुक्ताबाई मठात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
या वेळी बोलताना ह.भ.प. तनपुरे महाराज म्हणाले,‘‘मुळातच वारकरी सांप्रदाय जादुटोणा अंधश्रद्धा विरोधात आहे. वारकरी सांप्रदाय सोज्वळ, उज्ज्वल तत्त्वज्ञान देणारा आहे. असे असताना शासन त्यांनी नेमलेल्या समन्वय समिती सदस्यांना सोडून हा कायदा पास करण्याबाबत चर्चा करत आहे यास विरोध  आहे.
शासनानेच वारकरी समन्वय समिती नेमली, त्यात ह.भ.प. वासकर महाराज, जवंजाळ महाराज, तुणतुणे महाराज, बोधले महाराज, वक्ते महाराज, संपत महाराज, कुंभार गावकर, रामेश्वर शास्त्री असे विविध वारकरी संघटनांचे महाराज तसेच शासनाचे म्हणून समन्वय साधण्यासाठी विभागीय आयुक्त, माजी मंत्री बबनराव पाचपुते, गृहमंत्री आर. आर. पाटील, अशी समिती गठित केली. नावालाच बैठका झाल्या, असे रामेश्वरशास्त्री यांनी सांगितले.
या बैठकीत शासनाला इशारा देण्यात आला, की शासनाने नेमलेल्या समन्वय समितीबरोबर जादूटोणा, अंधश्रद्धा विधेयका संबंधीचर्चा करून मगच विधेयक संमत करावे अन्यथा राज्यभर आंदोलन करण्यात येईल.
वारकरी परिषदेच्या सदस्यांनी दिले राजीनामे
वारकरी साहित्य परिषदेचे वारकरी म्हणवून घेणारे विठ्ठल पाटील यांनी परिषदेच्या लेटरपॅडवर ह.भ.प. निवृत्ती वक्ते, बंडातात्या कराडकर, जवजाळ महाराज, ढवळीकर महाराज, ह.भ.प. बद्रीनाथ महाराज तनपुरे आदींची नावे न विचारताच घालून त्याचा वापर केल्याने सर्वानी राजीनामे दिले आहेत.
समस्त वारकरी संघटना वारकरी साहित्य परिषदेच्या विरोधात असून या वारकरी साहित्य परिषदेत वारकरी सांप्रदायाची कोणतीच ध्येयधोरणे, तत्त्वे नसल्याने वारकरी, महाराज मंडळी यातून बाहेर पडल्याचा राग मनात ठेवून वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी ह.भ.प. बापूमहाराज रावकर यांना भ्रमणध्वनीवरून मारण्याची धमकी दिली. या घटनेचा धिक्कार बैठकीत करण्यात आला असून या बाबत सातारा शहर पो. स्टे. गुन्हा दाखल केला असून याची चौकशी पो. ना. गवारी हे करत आहेत.
या बैठकीस अनिल महाराज बडवे, पाटणे, यांचेसह महाराज मंडळी, वारकरी मोठय़ा संख्येने हजर होते.