नवी दिल्लीची भारतीय कृषी अनुसंधान परिषद पुरस्कृत व सोलापूरच्या शबरी कृषी प्रतिष्ठान संचलित कृशी विज्ञान केंद्रांच्या वतीने येत्या २२, २३ व २४ जानेवारी रोजी कृषी विज्ञान तंत्रज्ञान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सोलापूर विद्यापीठाजवळ हिरज गावच्या शिवारात आयोजित या महोत्सवात दुष्काळग्रस्त सोलापूर जिल्हय़ातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अशा प्रकारची कमी पाण्यावरील आधुनिक व सुधारित शिफारशींवर आधारित ६३ कृषी तंत्रज्ञान प्रात्यक्षिके पाहावयास मिळणार आहेत. याशिवाय विविध सात चारा पिकांच्या बारा वाणांची लागवडही पाहावयास मिळणार आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन दि. २२ रोजी सकाळी १०.३० वाजता दक्षिण सोलापूरचे काँग्रेसचे आमदार दिलीप माने यांच्या हस्ते होणार आहे. शबरी कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पी. जे. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या उद्घाटन सोहळय़ाप्रसंगी ‘आत्मा’चे संचालक डॉ. के. व्ही. देशमुख, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संचालक (विस्तार शिक्षण) डॉ. हरिभाऊ मोरे आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याबाबतची माहिती सोलापूर कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. एल. आर. तांबडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या महोत्सवांतर्गत शेतकऱ्यांसाठी कृषी व कृषिपूरक विविध विषयांवर तांत्रिक चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले असून, यात प्रामुख्याने बदलत्या हवामानानुसार पीक नियोजन व कोरडवाहू तंत्रज्ञान, एकरी शंभर टन ऊस उत्पादनाचे तंत्र, केळी, डाळिंब व कोरडवाहू फळपिके लागवड तंत्रज्ञान, शेतकरी गटसंघटन व कृषिपूरक उद्योग, रब्बी पिके लागवड तंत्रज्ञान व आधुनिक दुग्ध व्यवस्थापन, गट संघटनांद्वारे कृषिपूरक  व्यवसायातून महिला सबलीकरण आदी विषयांवर प्रसिद्ध कृषिशास्त्रज्ञ, यशस्वी कृषी उद्योजक व विक्रमी पीक उत्पादन घेणारे शेतकरी यांची व्याख्याने होणार आहेत. या महोत्सवात सुमारे पंधरा हजार शेतकऱ्यांचा सहभाग अपेक्षित असल्याचे डॉ. तांबडे यांनी सांगितले. या वेळी विषयतज्ज्ञ प्रा. प्रदीप गोंजारी हे उपस्थित होते.