दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी भीषण संकटात असताना शासन संवेदनशील नसेल आणि सोलापूर जिल्ह्य़ातील पाणी प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका अन्यायाची असेल तर त्यांना सोलापूर जिल्ह्य़ात प्रवेशबंदी केली जाईल,असा इशारा जनसेवा संघटनेचे डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी दिला. त्यांचे पिताजी तथा माजी राज्यमंत्री प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनीही दुष्काळ प्रश्नावर शासनाच्या विरोधात संघर्षांची भूमिका स्पष्ट केली.
उजनी धरणातून शेतीसाठी पाणी सोडावे, उजनी धरणात पुणे जिल्ह्य़ातील धरणांतून पाणी सोडावे, या मागणीसाठी जनसेवा संघटनेच्यावतीने मोहिते-पाटील पिता-पुत्राच्या नेतृत्वाखाली सोलापूर-पुणे महामार्गावर टेंभुर्णी येथे करमाळा चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्या वेळी आयोजित सभेत मोहिते-पाटील पिता-पुत्रांनी दुष्काळ प्रश्नावर शासनाच्या बोटचेपे धोरणावर आक्रमक पध्दतीने हल्ला चढविला. या रास्ता रोको आंदोलनात हजारो  शेतकरी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. या माध्यमातून जनसेवा संघटनेचे जणू शक्तिप्रदर्शन पाहावयास मिळाले.
सोलापूर जिल्ह्य़ाची वरदायिनी समजल्या जाणाऱ्या उजनी धरणात यंदा पाणी साठा नसल्याने पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. उजनी धरणाच्या वरील भागात पुणे जिल्ह्य़ात अनेक धरणे बांधल्याने उजनी धरणात पाणी येत नाही. पाण्याअभावी कोटय़वधींची शेती पिके शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत जळू लागली आहेत. शेतकऱ्यांचे दु:ख पाहावत नाही. शेतीसाठी उजनी धरणात पुणे जिल्ह्य़ातून पाणी सोडले गेले नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सोलापूर जिल्ह्य़ात फिरू देणार नाही, असा सज्जड इशारा डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी देताच उपस्थित आंदोलक शेतकऱ्यांनी अजित पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी करून प्रतिसाद दिला.
जिल्ह्य़ात यंदा पाणी नसल्याने शेती धोक्यात आली असताना त्याकडे लक्ष देण्याऐवजी शासन झोपेचे सोंग घेत असल्याची टीका प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी केली. शासनाला सगळे कळते, फक्त दुष्काळाचे प्रश्न कळत नाहीत. मंत्रालयात फायली जाळायच्या व कोटय़वधींचे घोटाळे करायचे, हे कसे सुचते,असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला. दुष्काळाच्या प्रश्नावर खरे तर सत्ताधारी राष्ट्रवादीच्या आमदारांना आंदोलन करावे लागते ही बाब खेदजनक असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी नोंदविली. या आंदोलनात दशरथ कांबळे, शंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक दीपक पाटील यांचीही भाषणे झाली. या आंदोलनात जनसेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शिंदे, रफीक मोहोळकर, सुधीर रास्ते, वैभव पाटील, रणधीर जगताप, तानाजी नागटिळक, चंद्रकांत शिंदे, सी. बी. शिंदे, सोनाजी पाटील आदींचा प्रामुख्याने सहभाग होता. माढय़ाचे तहसीलदार उत्तम दिघे यांना आंदोलनस्थळी मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.