स्वत: मार्शल आर्ट शिकलेला अक्षयकुमार आता मार्शल आर्टवरच सिनेमा करणार आहे. बॉलीवूडमध्ये प्रवेश केल्यापासून मार्शल आर्ट लोकप्रिय करण्याचा प्रयत्न अक्षयकुमारने केला आहे. अखेर आता तो सिनेमाद्वारे मार्शल आर्ट प्रेक्षकांसमोर आणणार आहे. मार्शल आर्ट्सच्या स्पर्धा भरविण्यासाठीही यापूर्वी अक्षयकुमारने पुढाकार घेतला होता.
बँकॉक येथे जाऊन मार्शल आर्टचे शिक्षण अक्षयकुमारने घेतले आहे. मार्शल आर्ट सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी अक्षयकुमार मुंबईत आला. सुरुवातीला मार्शल आर्ट शिकवीत असताना एका विद्यार्थ्यांने त्याला मॉडेलिंगसाठी प्रयत्न करण्याचे सुचविले. तेव्हापासून मॉडेलिंग आणि अल्पावधीतच बॉलीवूडच्या चंदेरी दुनियेत अभिनेता म्हणून अक्षयकुमारने पदार्पण केले. परंतु स्टंटबाजी, हाणामारीची दृश्ये स्वत: करणे, खेळांची आवड आणि मार्शल आर्टचे प्रेम यामुळे आपण आधी एक फायटर आहोत आणि नंतर अभिनेता आहोत, असे अक्षयकुमारने म्हटले होते.
‘हरी ओम एण्टरटेन्मेंट’ या स्वत:च्याच बॅनरतर्फे तो मार्शल आर्टवरील सिनेमाची निर्मिती करणार असला तरी त्यात तो स्वत: मुख्य भूमिका साकारणार नाही, असेही त्याने स्पष्ट केले. मार्शल आर्ट नेमक्या आणि वास्तव पद्धतीने दाखविता यावे यासाठी पटकथेवर काम सुरू आहे. कलावंत तसेच दिग्दर्शक यांसारख्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी अद्याप निश्चित व्हायच्या आहेत, असे तो म्हणाला.