दुष्काळामुळे शेतकरी आधीच हैराण झाला आहे. त्याला दिलासा देण्याचे काम करण्याऐवजी सरकार त्याला त्रासदायक ठरणारे निर्णयच घेत आहे. यात बदल झाला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा काढण्याचा इशारा आमदार शिवाजी कर्डिले यांनी नगर व पाथर्डी तालुक्यातील दुष्काळासंबंधी आयोजित सर्वपक्षीय बैठकीत दिला.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत शिंदे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संपतराव म्हस्के, बाजार समितीचे सभापती हरिभाऊ कर्डिले, जि. प. सदस्य बाळासाहेब हराळ, बाजीराव गवारे, शिवसेना तालुकाध्यक्ष संदेश कार्ले, अनिल कराळे, रंगनाथ निमसे, नारायण आव्हाड, शरद झोडगे, संजय जगताप, भाऊसाहेब काळे, संजय गिरवले, परसराम भगत आदी यावेळी उपस्थित होते.
छावणीतील जनावरांमागे चाऱ्यापोटी फक्त ६० रूपये देण्याचा निर्णय चुकीचा आहे. त्यात किमान ८० ते १०० रूपये प्रत्येक जनावरामागे असा बदल करावा, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. शशिकांत गाडे यांनी छावण्यांमध्ये छावणीचालक नाही तर प्रशासनच भ्रष्टाचार करत आहे असा आरोप केला. म्हस्के, हराळ, गवारे, कर्डिले आदींची यावेळी भाषणे झाली. येत्या १५ दिवसांत सरकारने चाऱ्यापोटीची रक्कम वाढवली नाही, रोजगार हमीची कामे सुरू केली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा काढण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.