चणकापूर उजव्या कालव्याची मंजूर असलेली १७५ क्युसेसची वहनक्षमता खऱ्या अर्थाने कार्यान्वित झाल्यास संपूर्ण देवळा तालुक्यातील सिंचन क्षेत्रासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. यासाठी सर्वपक्षीय जोडे बाजुला ठेवून एकत्रित लढा देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन आ. शिरीषकुमार कोतवाल यांनी केले. पाणी टंचाई व त्यावरील उपाययोजना याचा आढावा घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. चणकापूर धरणापासून रामेश्वपर्यंत चणकापूर उजवा कालवा आहे. त्याची वहनक्षमता १७५ क्युसेसची मंजूर आहे. परंतु, कालव्याचे काम करताना लक्ष न दिल्याने सद्यस्थितीत कालव्याद्वारे ९० क्युसेस पाणी चणकापूर धरणातून सोडले जाते. जवळपास ३८ किलोमीटरच्या या कालव्याची गळती लक्षात घेता अवघे ३० ते ३५ क्युसेस पाणी रामेश्वर धरणापर्यंत पोहोचते. त्यामुळे धरण भरण्यासाठी जवळपास ३८ दिवस लागतात. मंजूर असलेल्या १७५ क्युसेसने कालवा वाहिल्यास अवघ्या आठवडाभरात रामेश्वर धरण भरले असते. उर्वरीत कालावधीत रस्त्यातील पाझर तलाव, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, लघुपाटबंधारे तलाव भरून पाणी थेट पुढील वाढीव कालव्याद्वारे झाडी-एरंड गावापर्यंत पोहोचण्यास काही अडचण नव्हती. परंतु, सद्यस्थितीत चणकापूर उजव्या कालव्यास पाणी सोडल्यानंतर रस्त्यातच पाटचाऱ्यांची मागणी पुढे येते. अशावेळी संबंधितांची गरज व मागणी रास्त असली तरी पाटचाऱ्यांना पाणी सोडण्यासाठी ज्या पद्धतीने गावे पुढे येत आहेत, त्यांच्यात वाद होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. या पाश्र्वभूमीवर, उजवा कालवा पूर्ण वहनक्षमतेने पूर्णत्वास करण्याच्या विषयावर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे. जमीन हस्तांतरीत न करता कालव्याची रुंदी वाढू शकते. कमी खर्चात कालव्याचे विस्तारीकरणाचे काम पूर्णत्वास येणार असल्याने निधी मंजुरीसाठी कोणतीही अडचण येणार नाही, असे आ. कोतवाल यांनी नमूद केले. संपूर्ण तालुक्याच्या सिंचनासाठी वरदान ठरणाऱ्या या कालव्याची वहन क्षमता विस्तारण्यासाठी आपण पुढाकार घेणार असून सर्वानी राजकीय जोडे बाजुला ठेऊन सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.