नंदुरबारसह नाशिक विभागातील अन्य चार जिल्ह्य़ांत २००६पासून सुरू असलेल्या ग्रामस्थ दिनाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक बुधवारी होणाऱ्या ग्रामस्थ दिनासाठी निरीक्षकांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी ओमप्रकाश बकोरिया यांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत बकोरिया बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए. एस. आर. नायक, अतिरिक्त जिल्हाधिकारी गुलाब खरात, उपजिल्हाधिकारी कुंदनकुमार सोनवणे, निवासी उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज आदी उपस्थित होते. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थ दिनात प्रामुख्याने ग्रामपातळीवरील सर्व विभागांचा आढावा घेणे, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, हागणदारी मुक्ती योजना, जलसंधारण व पाणलोट आराखडय़ाची अंमलबजावणी, महिला बचत गट, सर्वशिक्षा अभियान, अक्षय प्रकाश योजना, आपत्कालीन व्यवस्थापन या ग्रामसहभागावर आधारित सप्तसूत्रीवर चर्चा करण्यात येईल. उपस्थित ग्रामस्थांच्या तक्रारी अडचणी ऐकून त्या सोडविल्या जातील. विविध शासकीय सेवा योजनांच्या लाभार्थ्यांकडून अर्ज शक्यतो त्याच ठिकाणी भरून घेतले जातील असेही ते म्हणाले.
ग्रामस्थ दिनाच्या नियंत्रणासाठी ग्रामपालकांची नियुक्ती केली असून त्यांची कार्यपद्धतीही निश्चित करण्यात आलेली आहे.
जिल्ह्य़ातील सहा तालुक्यांतील ४६६ गावांमध्ये जानेवारी व फेब्रुवारीमध्ये ग्रामस्थ दिन होणार असून त्यासाठी   ७०    अधिकाऱ्यांची निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.