मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मातोश्री, काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षा प्रेमलाकाकी चव्हाण व माजी केंद्रीय मंत्री अ‍ॅड. डी. आर. तथा आनंदराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त सोमवारी (दि. ८) विविध उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कराडच्या पाटण कॉलनी येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दरवर्षीप्रमाणे प्रेमलाकाकी व आनंदराव चव्हाण (काका) यांच्या प्रतिमेस आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम पार पडेल.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते सकाळी साडेदहा वाजता मलकापूर नगरपंचायतीतर्फे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थिनींना मोफत बसपास वाटप व बससेवा उपक्रमाचा शुभारंभ होणार आहे. या कन्या सुरक्षा अभियान समारंभातच प्रियदर्शनी कन्यारत्न अभियानांतर्गत ठेव पावत्यांचे वितरण, शेतकऱ्यांना बायोगॅस अनुदान व शाळकरी मुलांना वह्यांचे वाटप होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख राहणार असून, राज्याचे गृह राज्यमंत्री सतेज पाटील, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व माजी आमदार भास्करराव शिंदे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार आनंदराव पाटील, परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांची उपस्थिती राहणार असल्याचे कार्यक्रमाचे संयोजक व मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
यानंतर दुपारी १ वाजता वेणुताई चव्हाण सभागृहात जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व वह्या वाटप कार्यक्रम पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली तर शिवाजीराव देशमुख यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी मंत्री सतेज पाटील यांच्यासह स्थानिक नेतेमंडळींची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचे कार्यक्रमाचे संयोजक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील यांनी सांगितले.
श्रीमती प्रेमलाताई चव्हाण मेमोरियल प्रथम राज्यस्तरीय ज्युनिअर निवड बॅडमिंटन स्पध्रेचा बक्षीस वितरण सोहळा दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते तर महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप गंधे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती संयोजक राहुल चव्हाण यांनी दिली. दरम्यान, कुंभारगावसह कराड व पाटण तालुक्यात विविध कार्यक्रम पार पडणार आहेत.