श्रीगोंदे तालुक्यात दरोडय़ांचे सत्र सुरूच असून आज मध्यरात्री तालुक्यातील कोरेगाव (चिखली) येथे दरोडेखोरांनी जबर मारहाण करीत धुमाकूळ घातला. मारहाणीत चौघेजण जखमी झाले असून नागरिकांत घबराट पसरली आहे.
कोरेगाव येथे आज मध्यरात्री दरोडेखोरांनी दोन वस्त्यांवर दरोडा घातला. त्यांनी केलेल्या मारहाणीत  साहेबराव पवार व त्यांची पत्नी कमलबाई व कोळेकर वस्तीवरील विजय कोळेकर व शोभा कोळेकर हे चौघे गंभीर जखमी झाले. मारहाणीत शोभा कोहेकर यांचा कान तुटला असून रावसाहेब पवार यांना नगर येथे हलविण्यात आले आहे.
विजय रघुनाथ कोळेकर (वय ४५) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ते आपल्या छपरात झोपले असताना मध्यरात्री तीन दरोडेखोरांनी घरावर हल्ला केला. मारहाण करताना दरोडेखोरांचे चेहरे आपण पाहिले. त्याच वेळी पत्नी शोभा जागी झाली. दरोडेखोरांनी अमानुषपणे तिच्या कानातील सोन्याच्या रिंगा ओरबडल्या. त्यात तिचा कानच तुटला. येथून दरोडेखोरांनी ६७ हजारांचा ऐवज चोरून नेला. त्यानंतर दरोडेखोरांनी पवार वस्तीकडे मोर्चा वळवला. साहेबराव पवार यांच्या घराच्या मागील खिडकीतून दरोडेखोर आत घुसले व त्यांनी घरात झोपलेल्या वृद्ध साहेबराव पवार (वय ७०) यांच्या डोक्यात गज मारला. तसेच त्यांची पत्नी कमलाबाई हिलाही मारहाण केली. येथून ४५ हजारांचे दागिने त्यांनी  काढून नेले.
आज घटनास्थळी उप्पर पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी भेट दिली. बेलंवडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विश्वास निंबाळकर यांनी गावाजवळ असलेल्या पालांवर छापा टाकून दोघांना संशयीत म्हणून अटक केली आहे.