वसरेवा ते घाटकोपर या भागात धावणाऱ्या मेट्रो पुलाखालील परिसरातील अस्वच्छता आणि अव्यवस्थापन याबाबत एमएमआरडीएने आपले हात झटकले असून ती जबाबदारी पालिका आणि एमएमओपीएलची असल्याचे स्पष्ट केले आहे.
मुंबई मेट्रोच्या खालच्या परिसराची देखभालीअभावी दुरवस्था झाली आहे. व्यवस्थापनाअभावी या परिसरात भिकारी, गर्दुल्ले यांनी बस्तान मांडले आहे. तसेच, या ठिकाणी बेशिस्तपणे गाडय़ा लावल्या जातात. काही ठिकाणी या परिसराची दुरुस्ती आणि सुशोभीकरण करणे आवश्यक आहे. परंतु, ही जबाबदारी कुणी घ्यायची याबाबत स्पष्टता नसल्याने माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी एमएमआरडीएकडे खुलासा मागविला होता.
त्यात वर्सोवा ते घाटकोपर या भागात धावणाऱ्या मेट्रोखालील रस्ते, पदपथ, गटार नलिकांची दुरुस्ती आदी कामे मुंबई महानगरपालिकेचे असून सुशोभीकरणाचे काम एमएमओपीएलचे आहे, असे स्पष्ट  करण्यात आले आहे. मेट्रो ज्यावर उभी आहे त्या खांबाच्या मधल्या भागाचे सुशोभीकरण केलेले नाही. हे कामही मुंबई मेट्रो-१ प्रा. लिमिटेडने करायचे आहे, असे एमएमआरडीएतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
मुळात कंपनीने सुशोभीकरणासाठी एमएमआरडीएकडे परवानगीही मागितली होती. परंतु, १७ ऑक्टोबर, २०१२ रोजी परवानगी दिल्यानंतर कंपनीने गेले २९ महिने काहीच काम केलेले नाही. एमएमआरडीएतील परिवहन आणि दळणवळण विभागाचे प्रमुख पी. आर. के. मूर्ती यांनी १५ अटी घालून ही परवानगी दिली होती. परंतु, कामच न केल्याने ३ मार्च, २०१३ रोजी त्यांनी पुन्हा आपल्या पत्राची आठवण करून सुशोभीकरणाचे काम ताबडतोब सुरू करण्याची सूचना कंपनीला केली आहे.
‘गारेगार मेट्रोमधून फिरताना स्वर्गात असल्याचा अनुभव प्रवाशांना येत असला तरी मेट्रोच्या खालचा परिसर मात्र देखभालीअभावी उजाड झाला आहे. परिणामी मेट्रो कंपनीवर एमएमआरडीएने तातडीने कारवाई करावी,’ अशी मागणी गलगली यांनी केली आहे. गलगली यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पत्र लिहून सर्वसामान्य नागरिकांचे होणारे हाल थांबविण्याची मागणी केली आहे.