यावल तालुक्यातील किनगाव येथील बँक दरोडय़ातील संशयित अद्याप फरार असताना जळगावपासून जवळच राष्ट्रीय महामार्गावर पारोळा येथील एका व्यापाऱ्याला पिस्तुलचा धाक दाखवून तब्बल ५३ लाख रुपयांना लुटण्यात आले.
पारोळा येथील रोहित जिनिंग अ‍ॅण्ड प्रेसिंगचे मालक अनिल सोमाणी यांचा पुतण्या योगेश सोमाणी आपल्या दोन सहकाऱ्यांसह सोमवारी सायंकाळी जळगावच्या बँकेतून काढलेले ५३ लाख रुपये घेऊन कारने पारोळ्याकडे निघाले होते. राष्ट्रीय महामार्गाने एरंडोलकडे ते जात असताना मागून आलेल्या एका स्कॉर्पिओ गाडीने त्यांना पुढे जाऊन अडविले. त्यातून उतरलेल्या तिघा जणांनी पिस्तुलचा धाक दाखवून योगेश सोमाणीकडून संपूर्ण रक्कम हिसकावून घेतली. तसेच सोमानी यांच्या सहकाऱ्या जवळील मोबाईल व गाडीच्या चाव्या ताब्यात घेत फरार झाले. या घटनेनेतर संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदी करण्यात आली. परंतु संशयित सापडले नाहीत.
जिल्ह्यासह जळगाव शहरात चोऱ्या, घरफोडय़ांचे सत्र अव्याहतपणे सुरू आहे. सर्वत्र अवैध धंदे बोकाळले आहेत. कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याने पोलिसांचा कोणताच धाक उरला नसल्याचे स्पष्ट होत आहे.